एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांतून डच्चू देण्यात आला आहे. आगामी आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार असून या स्पर्धासाठीच्या भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या वेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी न केल्याचा फटका डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला बसला असून त्याचा विचार आशिया चषकासाठी केला गेला नाही, पण ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये मात्र त्याला संधी देण्यात आली आहे. आशिया चषकातील संघात रैनाच्या जागी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आली आहे.
आशिया चषक २५ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीमध्ये होणार आहे, तर ट्वेन्टी-२० विश्वचषक १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणार आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा सध्याचा फॉर्म चांगला नसला तरी त्याला ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. युवा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे, अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि वेगवान गोलंदाज वरुण आरोन यांना एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी निवड समितीच्या बैठीकीनंतर दिली.
सलामीवीर गौतम गंभीर आणि फिरकीरपटू हरभजन सिंग सध्या इराणी चषकाच्या संघातून खेळत असले तरी त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने त्यांचा विचार दोन्ही संघाच्या निवडीसाठी करण्यात आला नाही. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर निवड समितीने विश्वास कायम ठेवत त्यांना दोन्ही संघांत स्थान दिले आहे.
इशांतला एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर रैनाला गेल्या २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त एकच अर्धशतक झळकावता आल्याने त्याला एकदिवसीय संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताचे संघ पुढीलप्रमाणे :
ट्वेन्टी-२० संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, रवींद्र  जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, मोहित शर्मा आणि वरुण आरोन.
आशिया चषकासाठीचा संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, रवींद्र  जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, ईश्वर पांडे आणि वरुण
आरोन.

Story img Loader