भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर युवराज सिंगच्या इंडिया ‘ब्ल्यू’ संघाने एनकेपी साळवे चॅलेंजर चषकाला गवसणी घातली. पहिल्यांदा फलंदाजी करताना मनीष पांडेच्या अर्धशतकाच्या जोरावर ‘ब्ल्यू’ संघाने २७४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव २२४ धावांवर संपुष्टात आला आणि ‘ब्ल्यू’ संघाने ५० धावांनी अंतिम फेरी जिंकली.
नाणेफेक जिंकून ‘ब्ल्यू’ संघाने फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण ठरावीक फरकाने त्यांचे फलंदाज परतल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही, पण पांडेने ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. पीयूष चावलानेही ३२ चेंडूंत ४२ धावांची खेळी साकारत संघाची धावसंख्या फुगवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीकडून परविंदर अवाना आणि रजत भाटिया यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले.
‘ब्ल्यू’ संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला भुवनेश्वर कुमारने दोन्ही सलामीवीरांना बाद करत जोरदार धक्के दिले. त्यानंतर भुवनेश्वरला विनय कुमारची सुयोग्य साथ लाभली आणि या दोघांनी दिल्लीचा डाव २२४ धावांवर संपुष्टात आणला. मिलिंद कुमार आणि पुनित बिश्त यांनी अर्धशतके झळकावली खरी, पण त्यांना दिल्लीला विजय मिळवून देता आला नाही. ‘ब्ल्यू’ संघाकडून भुवनेश्वरने ३९ धावांत ४ बळी मिळवत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.