भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने दुबईच्या ‘फेम पार्क’ येथील प्राण्यांसोबतचे आपले काही गंमतीदार व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्यात तो आणि त्याचे मित्र चक्क एका ‘लायगर’ सोबत रस्सीखेच खेळताना दिसत आहे. युवराज आणि त्याचे काही मित्र दोरीचं एक टोक ओढत आहेत तर दुसऱ्या टोक ‘लायगर’च्या तोंडात आहे. हे दुसरं टोक पकडून लायगर अगदी आरामात उभा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, खूप ताकद लावून आणि दमून अखेर युवराज आणि त्याच्या मित्रांनी आपल्या बाजूची दोरी सोडून आपला पराभव मान्य केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे. दरम्यान, हे व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. त्यावर भरपूर कमेंटही येत आहेत. एका चाहत्याने तर लिहिलं आहे की, “चला, युवराज सिंग करू शकत नाही अशी एकतरी गोष्ट मिळाली.”

युवराज सिंगने आपल्या या सफरीबद्दल लिहून काही माहिती देखील दिली आहे. “फेम पार्क हे एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. जिथे सर्व प्राण्यांची काळजी घेतली जाते. त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवलं जातं. ते यामार्फत एका संरक्षित ठिकाणी असतात आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी खूप चांगले प्रशिक्षित आणि सुसज्ज केअरटेकर असतात. त्याचप्रमाणे, हे व्हिडिओ बनवत असताना कोणत्याही प्राण्याला इजा झालेली नाही,” असं युवराजने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, यावेळी युवराजने आपल्या गळ्यात एक प्रचंड साप देखील घेतला. त्याचसोबत; युवराजने लायगर, अस्वल, माकड आणि इतर जंगली जनावरांनाही खाऊ देखील घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. युवराजचा हा अनोखा अंदाज पाहून त्याचे चाहतेही खुश झाले आहेत.

अलीकडच्या काळात युवराज सिंग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाला आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या युवराज सिंगने देशासाठी अनेक ऐतिहासिक विक्रम केले आहेत. युवीने २००७ च्या पहिल्या टी २० विश्वचषकात ६ चेंडूत सलग ६ षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. जो कोणीही विसरू शकत नाही. दरम्यान, येत्या १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये पुन्हा एकदा टी -२० विश्वचषक सुरू होणार आहे.