माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. सोशल मीडियावर स्वत: केलेल्या पोस्ट आणि इतर खेळाडूंच्या पोस्टवर मिश्किल कमेंट्स केल्यामुळे तो सतत चर्चेत असतो. आता देखील तो आपल्या एका कमेंटमुळे चर्चेत आला आहे. त्याने आपली पत्नी हेझलच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करून एक प्रश्न विचारला आहे.
सहा महिन्यांपूर्वी युवराज आणि हेझल एका मुलाचे पालक झाले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘ओरियन’ असे ठेवले आहे. ओरियन नुकताच सहा महिन्यांचा झाला आहे. हेझलने आपल्या इन्स्टाग्रामवर त्याचा एक अतिशय गोंडस फोटो पोस्ट केला आहे. युवीच्या मुलाचा गोंडसपणा बघून चाहतेही आनंदी झाले आहेत. चाहत्यांनी कमेंट्स करून ओरियनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मात्र, सर्वात जास्त चर्चा युवराज सिंगच्या कमेंटची सुरू आहे.
हेझलने इन्स्टाग्रामवर बाळाचा फोटो पोस्ट करून त्याला भावस्पर्शी कॅप्शन दिले आहे. “माझा प्रकाशाचा छोटा किरण सहा महिन्यांचा झाला आहे. तुला दररोज नवीन गोष्टी शिकताना बघून खूप आनंद होतो. मला आई बनवल्याबद्दल धन्यवाद. सहा महिन्यांचा झाल्याबद्दल शुभेच्छा, ओरियन!”, असे कॅप्शन तिने दिले आहे. त्यावर युवराजने, ‘ये किसका बच्चा है?’, अशी कमेंट केली आहे.
अर्थात युवराजची ही कमेंट गमतीचा एक भाग आहे. युवराजचे नाव आणि त्याचा लूक अगदी विदेशी आहे. साहजिकच मुलगा परदेशी मूळ असलेल्या आईवर गेला आहे. म्हणून, युवराजने मजेशीर कमेंट करून हेझलची फिरकी घेतली आहे. युवराज व्यतिरिक्त, झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे, गायिका नीती मोहन आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांनीही हेझलच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.