‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्या दोघांवर कारवाई करण्यात आली होती. या मुद्द्यामुळे या दोघांची प्रचंड बदनामी झाली होती. हे प्रकरण तापले असतानाच दोघांनी माफी मागितली होती. या प्रकरणावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने आपले सडेतोड मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाला युवराज?

इन्स्टाग्रामवर युवराज लाईव्ह आला होता. त्यावेळी रोहित शर्माने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना युवराजने हार्दिक पांड्याच्या ‘त्या’ प्रकरणावर मत सांगितलं. पूर्वीच्या आणि आताच्या क्रिकेटपटूंमध्ये काय फरक वाटतो? असा सवाल रोहितने युवराज केला होता. त्यावर युवराज म्हणाला, “पूर्वीचे खेळाडू म्हणजेच जेव्हा मी किंवा तू (रोहित) संघात नव्याने दाखल झालो, तेव्हा आपण वरिष्ठांचा आदर करायचो. आपल्या वागण्या-बोलण्यात वरिष्ठ खेळाडूंबाबत बोलताना विनम्रपणा होता. तुम्ही भारताचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करता याची जाणीव ठेवून पूर्वीचे खेळाडू वागायचे. कशाप्रकारे राहावे, प्रसारमाध्यमांशी बोलताना किंवा मुलाखती देताना कसे बोलावे या सगळ्याची एक ठरलेली पद्धत होती. पण सध्या मात्र तसं दिसत नाही.”

“पूर्वी सोशल मीडियाचा तितकासा प्रभाव नव्हता. त्यामुळे खेळाडू आपल्या जबाबदाऱ्या ओळखून वर्तणुक करायचे. पण आताचे खेळाडू मात्र काहीसे वाहावत जातात आणि त्यामुळे सारेच गणित बिघडते. हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचा कॉफी विथ करण’ मधला प्रसंग आमच्या वेळच्या क्रिकेटपटूंच्या बाबतीत झाला नसता”, असे सडेतोड मत युवराजने व्यक्त केले.

काय होतं प्रकरण?

‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना करण जोहरने एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना या दोघांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे या दोघांवर प्रचंड टीका झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. पण या दोघांपुढील अडचणी संपलेल्या नव्हत्या, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावली होती.

या प्रकरणात BCCI ने पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकलेली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका आणि न्यूझीलंड दौरा होण्याआधी हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. BCCI वर लोकपाल (ओमडसमन) नेमण्यात आला नव्हता, त्यामुळे त्यांच्यावरील बंदी तात्पुरती मागे घेण्यात आली होती. पण लोकपालांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर या दोघांना १० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले.

Story img Loader