सिक्सर किंग युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. युवराजने आज ३७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने कॅन्सरग्रस्त मुलांना मदतीचा हात दिला आहे. युवराज सिंगने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्याने ही माहिती दिली आहे. युवराज सिंगने आपण गरिब कुटुंबातील 25 कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या YouWeCan संस्थेमार्फेत ही मदत करणार असल्याचं युवराजने सांगितलं आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत युवराज सिंगने म्हटलं आहे की, ‘मित्रांनो आज माझा वाढदिवस आहे. आज मी आयुष्याने मला दिलेली एक मौल्यवान भेट साजरी करत आहे. कॅन्सरशी लढा देण्यासाठी मला बळ दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आज आपल्या देशात अनेक लोक आहेत ज्यांना कॅन्सरच्या उपचाराचा खर्च परवडत नाही. माझी संस्था YouWeCan मार्फेत ही पोकळी भरुन काढण्याची मोहीम मी हाती घेतली आहे’.

पुढे त्याने सांगितलं आहे की, ‘आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी गरिब कुटुंबातील 25 कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचाराचा खर्च उचलण्याची प्रतिज्ञा घेत आहे. या 25 मुलांना आपण आयुष्याची एक मौल्यवान भेट देऊया’, असं युवराज सिंगने ट्विटरवर म्हटलं आहे’.

युवराज सिंगने मदत करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना ट्विटर व्हिडीओत लिंक दिली आहे. या लिंकवरुन जाऊन इच्छुक आर्थिक मदत करु शकतात.

मैदानात गोलंदाजांवर तुटून पडत भारतीय संघाला अनेक सामने जिंकून देणारा युवराज सिंग मैदानाबाहेरही खरा हिरो ठरला होता. कॅन्सरवर मात करत आयुष्यातील एक मोठा सामना त्याने जिंकला. कॅन्सरशी लढा दिल्यापासून युवराज सिंग कॅन्सरग्रस्तांना मदतीचा हात देत आहे.

युवराज सध्या भारतीय संघाचा अविभाज्य घटक नाही. मात्र, तो आपल्या जिवाची पर्वा न करता भारतीय संघासाठी लढला. २०११ च्या विश्वचषकादरम्यान कॅन्सर झाला असतानाही त्याने मैदान सोडले नाही. तो खेळला आणि त्याने जिंकले.. असेच काही युवराज सिंगच्या बाबतीत म्हणता येईल. २०११ आणि २००७ च्या विश्वचषकात भारताच्या विजयात युवीचा मोलाचा वाटा होता.

Story img Loader