Yuvraj Singh revealed Sachin Tendulkar’s advice to Team India 2011: एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकाचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेतील भारताच्या मोहिमेबाबत अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. युवराज सिंगने २०२३ विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच हा खुलासा केला आहे.
२०११ च्या विश्वचषक विजयात युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या स्पर्धेत त्याने बॉल आणि बॅट या दोन्हीने चमकदार कामगिरी केली. युवराजला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, त्या विश्वचषकात टीम इंडियाला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता.
भारताला ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने मोठा धक्का बसला होता. या पराभवानंतर मीडियाने भारतीय संघावर जोरदार टीका केली. त्या तणावपूर्ण परिस्थितीत क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने भारतीय संघाची धुरा सांभाळली. त्यानी खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये, म्हणून संपूर्ण संघाला महत्त्वाचा सल्ला दिला होता. आता युवराज सिंगला २०२३ च्या विश्वचषकापूर्वी सचिन तेंडुलकरचा सल्ला आठवला आहे.
हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकासाठी सर्व १० संघ जाहीर; पाहा कोणत्या संघात कोणाला मिळाली संधी?
सचिनच्या एका सल्ल्याने भारताने जिंकला २०११ चा विश्वचषक –
द वीकशी बोलताना युवराज सिंग म्हणाला की, “आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो आणि विश्वचषक स्पर्धेत आम्ही दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झालो. हा सामना आम्ही जिंकायला हवा होता. कारण त्यामुळे मीडिया वेडा झाला. यानंतर सचिन टीमसोबत बसला आणि म्हणाला, टीव्ही पाहणे बंद करा, वर्तमानपत्र वाचणे बंद करा. जेव्हा आपण विमानतळावर चाहत्यामधून जात असतो, तेव्हा तुमचे हेडफोन वापरा. फक्त विश्वचषकावर लक्ष केंद्रित करा. संघाने त्याच्या सल्ल्याशी सहमती दर्शविली, आम्ही फक्त त्याचे पालन केले आणि त्याने खरोखर कार्य केले.”
हेही वाचा – World Cup 2023: रोहित शर्मा विश्वचषकात शतक झळकावताच रचणार इतिहास, मोडणार सचिन तेंडुलकरचा ‘हा’ मोठा विक्रम
युवराज सिंग पुढे म्हणाला, “भारताची समस्या ही आहे की लोकांना वाटते की फक्त भारतीय संघच जिंकेल. हा एक मोठा विश्वचषक आहे, तेथे बरेच चांगले संघ आहेत. त्यामुळे आम्हाला खरोखर आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल.”