Yuvraj Singh said I played two matches with dengue and played World Cup with cancer: आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे शुबमन गिल अहमदाबादला पोहोचला आहे. १२ ऑक्टोबरला त्याने फलंदाजीचा सरावही केला. दरम्यान, शुबमन गिलबाबत युवराज सिंगचे मोठे वक्तव्यही समोर आले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला आशा आहे की भारताचा सलामीवीर शुबमन गिल वेळेत बरा होईल. तसेच तो नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यासाठी सज्ज होईल. १२ ऑक्टोबर रोजी गुरुग्राममध्ये एएनआयशी बोलताना युवराज सिंग म्हणाला, ‘मी शुबमन गिलला बळ दिले आहे. मी त्याला म्हणालो, मी डेंग्यूत दोन सामने खेळले आहेत आणि मी कॅन्सर असतानाही विश्वचषक खेळलो आहे, त्यामुळे तू तयार रहा. आशा आहे की, तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सज्ज असेल.’
कॅन्सरशी झुंज देत असतानाही २०११ च्या विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवण्यात युवराज सिंगने मोलाची भूमिका बजावली होती. युवराज सिंग म्हणाला की, जेव्हा तुम्ही तापाने त्रस्त असाल, तेव्हा सामना खेळणे खरोखर कठीण आहे. युवराज म्हणाला, ‘तुम्हाला ताप आणि डेंग्यू असताना क्रिकेट सामना खेळणे खरोखरच अवघड असते आणि मी ते अनुभवले आहे. त्यामुळे मला आशा आहे की तो तंदुरुस्त असेल तर तो नक्कीच खेळेल.”
हेही वाचा – AUS vs SA: स्टॉयनिसला आऊट देणे चुकीचे होते का? थर्ड अंपायरच्या निर्णयावर समालोचकांनी उपस्थित केले प्रश्न
भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. त्याला डेंग्यू झाला होता. युवराज पुढे म्हणाला की, ‘दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी (भारत विरुद्ध पाकिस्तान) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कारण दोन्ही संघांनी त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. इतक्या वर्षांनंतर भारतात हा सामना होत आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखाहून अधिक लोक हा सामना पाहण्यासाठी येतील. हे दोन्ही संघांसाठी चांगले आहे. मी म्हणेन ही वेळ परत येणार नाही. त्यामुळे याचा आनंद घ्या. केवळ हा सामना नाही, यानंतर आणखी सामने होतील. आशा आहे की तो एक चांगला सामना होईल.’
रोहितच्या नेतृत्वाखाली भारत घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकेल –
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत मायदेशात आयसीसी २०२३ चा विश्वचषक जिंकेल अशी आशा युवराज सिंगला आहे. युवराज सिंगने रोहित शर्माला क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक म्हटले आहे. युवराज म्हणाला की, भारतीय कर्णधार रोहितमध्ये इतकी क्षमता आहे की तो कोणताही विक्रम मोडू शकतो.
हेही वाचा – AUS vs SA: स्टॉयनिसला आऊट देणे चुकीचे होते का? थर्ड अंपायरच्या निर्णयावर समालोचकांनी उपस्थित केले प्रश्न
रोहित शर्मा कोणताही विक्रम मोडू शकतो –
युवराज सिंग म्हणाला, ‘रोहित शर्माने अनेक मोठे विक्रम मोडले आहेत, मला वाटते की त्याच्यात कोणताही विक्रम मोडण्याची क्षमता आहे. तो नक्कीच या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने ३१ एकदिवसीय शतके झळकावली आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे. कर्णधार म्हणून तो भारताला विश्वचषक जिंकून देईल, अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या लेगमध्ये त्याने ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजावली. याआधी तो मधल्या फळीत खेळायचा.’