Yuvraj Singh Big Statement About Young Player Rinku Singh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. युवीने दीर्घकाळ भारतासाठी मधल्या फळीत चमकदार कामगिरी केली. फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीतही उपयुक्त ठरला. त्याच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला युवीसारखा चांगला खेळाडू सापडलेला नाही. पण भारतीय संघाला आता युवराजसारखा आणखी एक खेळाडू मिळाला आहे, ज्याची अलीकडची कामगिरी चांगली झाली आहे. भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवी स्वतः कोणत्या खेळाडूमध्ये त्याचे प्रतिबिंब पाहतो, जाणून घेऊया.
खरे तर सध्याच्या भारतीय क्रिकेट संघात असा एक युवा खेळाडू आहे, ज्याच्यात युवराजला स्वतःची झलक दिसते. तो दुसरा-तिसरा कोणी नसून उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू रिंकू सिंग आहे. नुकत्याच कोलकात्यातील एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंगने हा खुलासा केला. जेव्हा युवीला विचारण्यात आले की, तुम्ही मधल्या षटकांमध्ये जलद धावा काढायचा. सध्या रिंकूने ही जबाबदारी घेतली आहे. या युवा फलंदाजाबद्दल तुमचे मत काय आहे? तुम्ही रिंकूला तुमचा योग्य उत्तराधिकारी म्हणून पाहत आहात का?
“फक्त रिंकू सिंगच माझी जागा घेऊ शकतो”- युवराज सिंग
या प्रश्नाला उत्तर देताना युवराज सिंग म्हणाला, “जर माझी जागा कोणी घेऊ शकत असेल, तर तो फक्त रिंकू सिंग असेल. त्याला कोणत्याही सुधारणेची गरज नाही. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आवश्यक ते करतो, मधल्या षटकांमध्ये वेगाने धावा करतो आणि गरज पडेल तेव्हा डाव पुढे नेतो. माझ्या मते त्याने तिन्ही फॉरमॅट खेळायला हवे. तो फक्त टी-२० क्रिकेटपुरता मर्यादित राहू नये.”
हेही वाचा – IPL 2024 : “दोन खेळाडू एकत्र खेळतात तेव्हा…”, रोहित-हार्दिकमधील कथित वादावर युवराज सिंगची प्रतिक्रिया
“रिंकू हा भारतीय संघाचा सर्वोत्तम डावखुरा खेळाडू आहे “- युवराज सिंग
युवराज सिंग पुढे म्हणाला, “तो सध्या भारतीय संघातील सर्वोत्तम डावखुरा खेळाडू आहे. तो मला माझी आठवण करून देतो, आक्रमण केव्हा करायचे, कधी स्ट्राइक रोटेट करायची हे त्याला माहीत आहे. त्याचबरोबर दबावाखाली तो कमालीचा हुशारीने खेळतो. तो आपल्या सामना जिंकवू शकतो. मला त्याच्यावर दबाव आणायचा नाही, पण मला खरोखर विश्वास आहे की फिनिशर होण्यासाठी जे करायचे असते, ते करण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे. तो पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करतो.”
हेही वाचा – VIDEO : विराटचे जोकोविचशी पहिल्यांदा कसे झाले होते संभाषण? स्वत: किंग कोहलीने सांगितला किस्सा
रिंकू सिंगने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले –
उल्लेखनीय म्हणजे रिंकू सिंगने यंदाच्या आयपीएलसह भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. सर्वप्रथम, आयपीएलमधील त्याच्या झंझावाती कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. त्यानंतर टीम इंडियामध्येही त्याने हीच कामगिरी कायम ठेवली. या २५ वर्षीय युवा फलंदाजाने आपल्या अलीकडच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. डाव चालण्याबरोबर सामना संपवण्याची क्षमताही त्याच्यात आहे. क्षेत्ररक्षणातही तो उत्कृष्ट आहे. रिंकू सिंगच्या या कामगिरीमुळे तो या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातही स्थान मिळवण्याची दाट शक्यता आहे.