भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील नववा टी-२० विश्वचषक खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखालील संघाने ही आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे करावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्याचप्रमाणे रोहितचा सर्वात जवळचा मित्र आणि माजी सहकारी असलेल्या युवराज सिंगलाही रोहितच्या हाती आयसीसी ट्रॉफी पाहायची आहे. युवराज सिंग यंदाच्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यादरम्यान युवराज सिंगने रोहितबद्दल बोलताना तो एक कर्णधार म्हणून भारतासाठी किती मोठी भूमिका बजावू शकतो आणि खेळाडू ते कर्णधारपद अशा यशस्वी प्रवासानंतरही रोहित कसा आहे, हे युवीने सांगितले.
रोहित शर्मा आणि युवराज सिंग या दोघांची घट्ट मैत्री आहे. रोहित आणि युवराज हे २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमधील सहकारी आहेत. तेव्हापासून ते आतापर्यंतच्या एवढ्या मोठ्या काळानंतरही या दोघांचं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे. रोहित शर्माबद्दल बोलताना युवी म्हणाला, “मला खरंच रोहित शर्माला विश्वचषक ट्रॉफी आणि विश्वचषक पदकासह पाहायचे आहे आणि तो यासाठी पात्र आहे.”
पुढे सांगताना युवराज सिंग म्हणाला, टी-२० विश्वचषकासाठी रोहितची उपस्थिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. माझ्या मते भारतीय संघाला खरोखर चांगला कर्णधार हवा आहे, एक समंजस कर्णधार जो दबावपूर्ण परिस्थितीतही चांगले निर्णय घेऊ शकतो आणि असे निर्णय घेणारा रोहित शर्माचं आहे. भारतीय संघ २०२३ च्या वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला तेव्हा तो कर्णधार होता. कर्णधार म्हणून त्याने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. मला वाटते की भारताचा कर्णधार म्हणून आम्हाला त्याच्यासारखाच एखादा नेता हवा आहे.”
२००७ मध्ये भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या रोहितचा प्रवास युवराजने जवळून पाहिला आहे. रोहितसोबतच्या पहिल्या भेटीच्या आठवणीबद्दल विचारले असता युवराज गमतीच्या स्वरात म्हणाला, ‘त्याचं इंग्रजी खूप वाईट आहे. रोहित एक खूप मजा मस्ती करणारा मुलगा आहे. बोरिवलीवरून (रोहित मूळचा मुंबईतील आहे) आम्ही त्याला नेहमी चिडवतो. पण मनाने एक चांगला माणूस. आतापर्यंत रोहितने खूप यश मिळवले आहे पण तरी माणूस म्हणून तो कधीही बदलला नाही. हिच रोहितची खासियत आहे. मस्ती करणारा, मुलांसोबत नेहमी मजा करतो, मैदानातील एक उत्कृष्ट नेता आणि क्रिकेटमधील माझा सर्वात जवळचा मित्र,” युवराज पुढे म्हणाला.
युवराजच्या रोहितवरील या वक्तव्याने रोहित आणि विराट कोहली या दोघांशीही त्याचे नाते किती वेगळे आहे हे समोर आले. युवराज रोहितचा खास मित्र असला तरी त्याचे कोहलीसोबतचे समीकरण थोडे वेगळे आहे. गेल्या वर्षी एका पॉडकास्ट दरम्यान, युवराजने खुलासा केला की विराट व्यस्त असल्यामुळे तो कोहलीशी जास्त बोलत नाही आणि आजचा विराट कोहली आणि पूर्वीचा कोहली यातील त्याने फरक सांगितला.
“खर तर नाही,” युवराजने टीआरएस पॉडकास्टमध्ये तो कोहलीच्या संपर्कात आहे का असे विचारले असता म्हणाला, “तो (विराट) व्यस्त असल्याने मी त्याला जास्त त्रास देत नाही. तरुण विराट कोहलीचे नाव चीकू होते आणि आजचा चीकू हा विराट कोहली आहे; यामध्ये खूप फरक आहे.”
वनडे वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी विराट आणि युवराज सिंग एकत्र दिसले होते, दोघेही मैदानात एकमेकांशी गप्पा मारताना दिसले होते.