Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Update: भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे विभक्त झाल्याच्या आणि त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या रोज येत आहेत. दरम्यान मुंबई उच्च न्यायालय आज या प्रकरणी निर्णय देणार आहे. ज्यासाठी चहल कोर्टात पोहोचला आहे. दरम्यान धनश्रीही कोर्टात पोहोचल्याचे व्हीडिओ समोर आले आहेत.
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर सुनावणीसाठी गुरुवारी, २० मार्च रोजी मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात पोहोचले. इंडियन प्रीमियर लीग २०२५ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चहल मास्क घालून कोर्टाच्या आवारात प्रवेश करताना दिसला. चहल आणि धनश्री दोघेही घाईघाईने आत जात असताना व्हीडिओमध्ये दिसत आहेत.
बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला आयपीएल २०२५ मध्ये खेळणार असल्याने २० मार्चपर्यंत खटल्याचा निकाल देण्याचे निर्देश दिल्यानंतर चहल चंदीगडवरून मुंबईत आला आणि गुरुवारी दुपारी न्यायालयात पोहोचला. सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी त्याने पंजाब किंग्सच्या सराव सत्रातून ब्रेक घेतला आहे.
चहल आणि धनश्री यांनी ५ फेब्रुवारी रोजी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण कुटुंब न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी सहा महिन्यांचा अनिवार्य कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्यास नकार दिला. लग्नानंतर १८ महिन्यांनी म्हणजेच जून २०२२ पासून हे दोघेही वेगळे राहत होते. चहल आणि धनश्री यांनी कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात संयुक्त याचिकेद्वारे आव्हान केले. हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ ब अंतर्गत, घटस्फोट देण्यापूर्वी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी अनिवार्य आहे परंतु जर जोडप्यामध्ये समेट होण्याची शक्यता नसेल तर तो रद्द केला जाऊ शकतो.
चहलकडून धनश्री वर्माला किती कोटींची पोटगी मिळणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात पोटगीबाबत करार झाला आहे. या करारानुसार युजवेंद्र चहल धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपये पोटगी म्हणून देणार आहे. त्यापैकी २.३७ कोटी रुपये त्याने सुरूवातीला दिले आहेत, तर उर्वरित रक्कम नंतर देणार आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची प्रेमकहाणी जवळपास ५ वर्षांपूर्वी सुरू होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. पण काहीच वर्षांमध्ये त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सध्या युजवेंद्र चहलचे नाव आरजे महवशसह जोडले जात आहे. या दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. चहलने धनश्रीची फसवणूक केल्याचेही अनेकांचे मत आहे. मात्र, धनश्रीने केवळ पैशासाठी चहलशी लग्न केल्याचेही चाहते त्यांच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.