Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Reason Revealed: भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला असून दोघेही विभक्त झाले आहेत. २० मार्चला या दोघांच्या संमतीने त्यांचं नातं संपुष्टात आलं आहे. पण या दोघांमध्ये घटस्फोट का झाला याबाबत जोरदार चर्चा सुरू असली तरी कारण समोर आलं नव्हतं. चहलकडून धनश्रीने घेतलेल्या पोटगीवरून तिला नाव ठेवली जात आहेत. पण अशातच एका रिपोर्टमध्ये चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाबाबत माहिती समोर आली आहे.

चहल आणि धनश्री दोघांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर गुरुवारी, २० मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाने दोघांचे घटस्फोटाचे अपील मंजूर केले. यासह ४ वर्ष आणि ३ महिन्यांनंतर दोघेही विभक्त झाले आहेत. युझवेंद्र चहलचे वकिल नितीन गुप्ता यांनी वक्तव्य गेत चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले.

चहल आणि धनश्री २४ डिसेंबर २०२० रोजी विवाहबंधनात अडकले होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले, तर एकमेकांचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावरून डिलीट केले होते. अफवा सुरू असतानाच गेल्या महिन्यातच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्याचे समोर आले. पण आता त्यांच्या घटस्फोटाचं कारण समोर आलं आहे.

आयपीएल २०२५ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात २० मार्च रोजी या जोडप्याचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाअंतर्गत युजवेंद्र चहलला धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपये द्यावे लागले, रिपोट्सनुसार, चहलने धनश्रीला २.3३७ कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कम नंतर देण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट का झाला? कारण आलं समोर

मनोरंजन बीटचे पत्रकार विक्की लालवानी यांच्या म्हणण्यानुसार, चहल आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यासाठी त्यांच्या राहण्याचे ठिकाण कारणीभूत ठरले. दोघांचेही त्यांच्या राहण्याच्या जागेबाबत एकमत नव्हते, त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२० मध्ये लग्नानंतर धनश्री चहल आणि त्याच्या आई-वडिलांसह हरियाणामध्ये राहायला गेली. पण, काही दिवसांनी धनश्रीने मुंबईत राहण्याची इच्छा व्यक्त केली. रिपोर्टनुसार, चहल याच्याशी सहमत नव्हता.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा

विकी लालवानीने त्याच्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, चहलशी लग्न केल्यानंतर धनश्री हरियाणामध्ये त्याच्या घरी राहत होती. तिच्या कामासाठी किंवा इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी ती मुंबईला यायला भाग पडत असे. मुंबई-हरियाणामध्ये राहण्यावरून झालेले हे भांडण त्यांचे नाते संपुष्टात येण्याचे कारण ठरले. चहल आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास तयार नव्हता. त्याला त्यांच्याबरोबरच हरियाणामध्ये राहायचे होते.

धनश्री-चहल यांच्या घटस्फोटाबाबत या दाव्याला चहल-धनश्री किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून दुजोरा मिळालेला नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या अधिकृत विधानात असे म्हटले आहे की त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.