Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर युट्यूबर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. गेले अनेक महिने त्यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चा होत्या. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. वांद्रे इथल्या फॅमिली कोर्टात गुरुवारी या दोघांनी घटस्फोटाशी संबंधित औपचारिकता पूर्ण केली. विभक्त होण्यासंदर्भात विचारलं असता या दोघांनी एकमेकांशी जुळवून घेता येणं कठीण झाल्याने हा निर्णय घेतल्याचं दोघांनी सांगितलं. परस्पर सामंजस्याने दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटस्फोटासंदर्भात अनेक वावड्या पसरत असताना चहलने इन्स्टाग्रामवर उपरोधिक पोस्ट शेअर केली. २० फेब्रुवारीला गुरुवारी चहलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘देवाने मला अनेकदा संकटातून बाहेर काढलं आहे. त्याने मला किती वेळा तारलं आहे याची मी मोजदादही ठेऊ शकत नाही. देवा, तुझे खरंच आभार. तू नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभा असतोस. अनेकदा तुझं असणं मला जाणवतही नाही पण हीच तुझी ताकद आहे. आमेन’, असं चहलने पोस्टमध्ये म्हटलं आहे. चहलने घटस्फोटाचा किंवा धनश्रीचा उल्लेख केला नाही पण पोस्टची वेळ निर्णायक आहे.

योगायोग म्हणजे धनश्रीही इन्स्टाग्रामवर व्यक्त झाली आहे. तिने लिहिलं, ‘आत्यंतिक तणावातून आता मुक्त वाटत आहे. देव आपल्याला संकटातून बाहेर काढतो आणि मार्ग दाखवतो हे किती किमयागार आहे. तुम्ही आज एखाद्या गोष्टीची चिंता करत असाल, तुम्ही चिंता करत राहू शकता किंवा देवावर विश्वास ठेऊन वाटचाल करू शकता. देवाप्रति श्रद्धेत प्रचंड ताकद आहे. तो तुमच्यासाठी सगळं काही जुळवून आणू शकतो’, असं धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

घटस्फोटासंदर्भात दोघांनीही औपचारिक पातळीवर कोणतीही माहिती दिलेली नाही. घटस्फोटासंबंधी बातम्या येऊ लागल्यानंतर दोघांनीही प्रश्नांना उत्तर देणं टाळलं. गेल्या महिन्यातही चहलने उपरोधिक स्वरुपाची पोस्ट शेअर केली होती. मेहनत, निष्ठा आणि चारित्र्य यासंदर्भात त्याने भाष्य केलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून चारित्र्यासंदर्भात टीका करणाऱ्यांचा धनश्रीने समाचार घेतला होता.

चहल आणि धनश्री यांचं डिसेंबर २०२० मध्ये गुडगाव इथे लग्न झालं. कोरोना काळात धनश्रीचे नृत्याचे व्हीडिओ चहलने पाहिले. यातूनच त्यांच्यात संवाद सुरू झाला. डान्स शिकण्यासंदर्भात त्याने विचारणा केली. सोशल मीडियावर हे दोघं प्रचंड लोकप्रिय झाले. त्या दोघांच्या व्हीडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत असे.

३४ वर्षीय चहलने ७२ एकदिवसीय आणि ८० ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावण्याचा मान चहलच्या नावावर आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. क्रिकेटच्या मैदानावर नैपुण्य दाखवण्याआधी चहलने बुद्धिबळात आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाचा चहल भाग होता.