Yuzvendra Chahal on Team India: कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, पण कसोटी संघात स्थान मिळवण्यात फार कमी खेळाडू यशस्वी होतात. टीम इंडियातही असाच एक खेळाडू आहे, ज्याच्या कारकिर्दीला टीम इंडियात ७ वर्षे झाली आहेत, पण त्याला एकदाही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियासाठी एकही कसोटी सामना न खेळता आल्याने युजवेंद्र चहलने आपले मनातील दुख: बोलून दाखवले आहे. त्याने आपल्या कसोटी पदार्पणावरच मोठे वक्तव्य केले आहे.
युजवेंद्र चहल हा गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. २०१६ मध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून, चहलने ७२ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि १२१ विकेट्स घेतल्या आहेत तसेच, त्याने ७५ टी२० मध्ये ९१ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, या स्टार लेगस्पिनरने आतापर्यंत भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. यादरम्यान रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची भारतीय संघात निवड झाली असून त्यांनी काही कसोटी सामने खेळले आहेत.
कसोटी संघात संधी न मिळाल्याने चहलने मनातील दुखः व्यक्त केले
टीम इंडियाचा जादुई फिरकीपटू युजवेंद्र चहलने एकदिवसीय आणि टी२० फॉरमॅटमध्ये संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये तो एकही सामना खेळलेला नाही. युजवेंद्र चहल हा टी२० मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. नुकतेच युजवेंद्र चहलने कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याच्या स्वप्नाबाबत वक्तव्य केले आहे. हे विधान देताना चहलने सांगितले की, “त्याचे अजूनही कसोटी पदार्पणाचे स्वप्न आहे, त्याच्या चेकलिस्टमध्ये कसोटी क्रिकेटचा समावेश ती लवकर पूर्ण होण्याची वाट पाहत आहे.”
भारतीय कसोटी संघात संधी मिळण्याची आशा आहे
क्रिकट्रॅकर या वेबपोर्टलच्या संभाषणात युजवेंद्र चहल म्हणाला, “प्रत्येकजण आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहतो. माझे स्वप्न देखील असेच काहीसे आहे. मी टी२० आणि वन डे क्रिकेटमध्ये खूप काही साध्य केले आहे पण कसोटी क्रिकेट अजूनही माझ्या चेकलिस्टमध्ये आहे. माझ्या नावासमोर कसोटी क्रिकेटपटू हे बिरूद लावण्याची वाट पाहतो आहे. मी देशांतर्गत क्रिकेट आणि रणजीमध्ये माझे सर्वोत्तम देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो, जेणेकरून माझे स्वप्न पूर्ण होईल. मला आशा आहे की लवकरच मला भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळेल.”
चहलने टी२० विश्वचषकात भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही आणि तेही त्याच्यासारख्या अनुभवी फिरकीपटूसाठी मोठे आव्हान असणार आहे. टी२० विश्वचषक खेळण्याबद्दल तो म्हणाला, “ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. काही गोष्टी तुमच्या हातात नसतात, त्यामुळे मी त्याबद्दल जास्त विचार करत नाही. मी खेळत आहे तोपर्यंत माझे सर्वोत्तम देणे आणि चांगली कामगिरी करत राहणे यावर माझे लक्ष असते. कोणताही सामना असो, माझे १००% देण्याचे उद्दिष्ट असते. निवड ही अशी गोष्ट आहे जी आपल्या हातात नसते. तुम्ही खेळत असलात किंवा नसलात, एकदा तुम्ही निळी जर्सी घातली आणि संघाचा भाग झालात की तो नेहमी आत्मविश्वास देतो. किमान तू तिथे आहेस आणि जे काही घडणार आहे त्यासाठी तुला तयार राहावे लागेल.”