रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने आयपीएल २०२२साठी केवळ तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना कायम ठेवले आहे. आरसीबी संघात हर्षल पटेल, यजुर्वेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल असे खेळाडू होते, ज्यांची मागील कामगिरी उत्कृष्ट होती पण त्यांना कायम ठेवण्यात आले नाही. चहल अनेक वर्षांपासून आरसीबीची महत्त्वाचा भाग होता, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचे नाव आहे. असे असूनही त्याला संघाकडून सोडण्यात आले.

पुढील आयपीएल भारतात होणार आहे, अशा स्थितीत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे चहलवर मेगा ऑक्शनमध्ये मोठी बोली लागण्याची चिन्हे आहेत. चहलने आरसीबीच्या निर्णयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इतक्या वर्षांच्या पाठिंब्याबद्दल त्याने आरसीबीचे आभार मानले. तो ट्विटरवर म्हणाला, “आरसीबी सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.”

चहलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला, ”अविस्मरणीय प्रवास. या संघात आठ अद्भुत वर्षे राहिल्यामुळे मला प्रचंड अनुभव मिळाला, अनेक टप्पे गाठले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब मिळाले. आम्ही फक्त खेळू शकतो आणि आमचे सर्वोत्तम देऊ शकतो, बाकीचे नशीब आहे. चिन्नास्वामी स्टेडियम आणि माझ्या लाडक्या चाहत्यांनो, तुमची आठवण येईल. मला प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार. दुसऱ्या बाजूला भेटू.”

आयपीएलच्या नव्या हंगामाच्या लिलावापूर्वी आरसीबीने विराट कोहलीला १५ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलला ११ कोटी आणि मोहम्मद सिराजला ७ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. चौथ्या खेळाडूचा पर्यायही आरसीबीकडे होता, पण त्यांनी फक्त तीन नावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – असं कुठं ऐकलंय का..! क्रिकेटच्या मैदानावर घडली अनोखी घटना; चालू सामन्यात खिशातून पडला फलंदाजाचा मोबाईल अन्…

आता प्रश्न पडतो की, चहलला एवढा महत्त्व असतानाही संघात का राखले नाही? याचे उत्तर मीडिया रिपोर्ट्समधून मिळते. आरसीबीला चहलला कायम ठेवायचे होते, पण हे प्रकरण पैशांमुळे अडकले. चहलला जास्त किंमत हवी होती, अशा स्थितीत चहलला रिटेन करणे शक्य नव्हते.
आता चहल कोणत्या संघाच्या लिलावात जातो, याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याची किंमत किती असेल. जर चहल आरसीबीमध्ये चौथा रिटेंशन असता, तर त्याला ६ कोटी रुपये मिळाले असते, जर तिसरा रिटेंशन असता, तर ८ कोटी आणि दुसरा रिटेंशन असता तर १२ कोटी रुपये मिळाले असते. लखनऊ किंवा अहमदाबादचा संघ त्याला आपल्या संघात सामावून घेण्याचा प्रयत्न करेल, अशीही शक्यता आहे.

Story img Loader