Harbhajan Singh on Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिका आणि क्रिकेट विश्वचषक २०२३साठी भारतीय संघातून युजवेंद्र चहलला वगळण्यात आल्याने निराश झाला आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकी त्रिकुटासह भारताने आशिया चषक खेळला होता, मात्र अक्षरच्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरचा आशिया चषक २०२३च्या अंतिम फेरीसाठी संघात समावेश करण्यात आला होता. दुसरीकडे, आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
युजवेंद्र चहलला संधी न देण्याच्या निर्णयाने हरभजन आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की, “संघात किंवा व्यवस्थापनाशी त्याचे भांडण झाले असावे किंवा चहलने एखाद्याला असे काही सांगितले असेल ज्यामुळे त्याच्या निवडीच्या शक्यतांवर परिणाम झाला असेल.” हरभजनच्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली. भज्जीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी रिस्ट स्पिनर युजवेंद्र चहल संघात असायला हवा होता, मात्र त्याला संधी देण्यात आली नाही. हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. माझ्यामते एकतर तो कोणाशी भांडला किंवा त्याने कोणाला काही सांगितले असावे. मला माहित नाही पण कदाचित चहलचे संघातील मोठ्या व्यक्तीशी भांडण झाले असावे.”
हरभजन पुढे म्हणाला, “जर आपण फक्त त्याच्या कौशल्याबद्दल बोललो तर त्याचे नाव या संघात असायला हवे होते कारण, टीम इंडियाचे बरेच खेळाडू विश्रांती घेत आहेत.” हरभजनने असेही निदर्शनास आणून दिले की, वॉशिंग्टन सुंदर आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांचाही विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या प्लॅनमध्ये समावेश नव्हता आणि यामुळे संघ व्यवस्थापन ऑफस्पिनरच्या शोधात आहे.
माजी खेळाडू म्हणाला, “प्रथम वॉशिंग्टन सुंदरला आशिया कप फायनलसाठी बोलावण्यात आले होते जो आशिया कपच्या मूळ संघात नव्हता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आणखी एका खेळाडूची भर पडली आहे आणि तो म्हणजे आर. अश्विन. त्यामुळे कुठेतरी टीम इंडिया ऑफस्पिनर्सच्या शोधात आहे. संघात ऑफ-स्पिनर न निवडण्यात आपली चूक बहुधा निवडकर्त्यांच्या लक्षात आली असेल आणि त्यांच्यासमोर बरेच डावखुरे फलंदाज आले तर आमचे गोलंदाज अडचणीत येऊ शकतात, असे त्यांना वाटले असावे.”
भज्जी म्हणाले, “हे सर्व विनाकारण का केले जात आहे? माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. जेव्हा तुम्ही तीन फिरकीपटू निवडले होते, तेव्हा तुम्ही अशा फिरकीपटूंना इतक्या कमी वेळात वर्ल्डकप योजनेत का समाविष्ट करत आहात? खरतर स्पर्धेला फार कमी वेळ शिल्लक आहे. संघ व्यवस्थापन आपली पूर्वीची चूक सुधारण्यासाठी आणखी एक चूक करणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिका २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबरला मोहालीमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना २४ सप्टेंबरला इंदोरमध्ये आणि तिसरा एकदिवसीय सामना २७ सप्टेंबरला राजकोटमध्ये होणार आहे. विश्वचषकानंतर दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० मालिकाही खेळणार आहेत.