Yuzvendra Chahal shared a video : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १७ डिसेंबरपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी युजवेंद्र चहलचाही टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. चहल बराच काळ संघाबाहेर होता. आता चहल दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. आफ्रिकेत पोहोचताच त्याने कुलदीप यादवला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आज (१४ डिसेंबर) कुलदीपचा वाढदिवस आहे. चहलने कुलदीपसोबतचा एक डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
चहलने कुलदीपसोबतचा व्हिडीओ केला शेअर –
वास्तविक चहलने कुलदीपसोबतचा एक डान्स करतानाचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत कुलदीपला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने हॅशटॅग वापरून व्हिडीओ शेअर केल्याबद्दल माफीही मागितली आहे. कुलदीप आणि चहलची जोडी काही काळासाठी टीम इंडियासाठी खूप फायदेशीर ठरली आहे. या दोघांमुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५ विकेट्सने विजय मिळवला. आता तिसरा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. त्याचा पहिला सामना १७ डिसेंबरला तर दुसरा सामना १९ डिसेंबरला होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. या कसोटी सामन्याच्या मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा – IPL 2024 : लिलावापूर्वी केकेआर संघात मोठा बदल, श्रेयस अय्यर आणि नितीश राणाला मिळाली नवी जबाबदारी
युजवेंद्र चहलच्या वनडे गोलंदाजीची आकडेवारी –
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, निवडकर्त्यांनी चहलकडे दुर्लक्ष केले होते. निवडकर्त्यांनी तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनची निवड केली होती, ज्याला विश्वचषकातील फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. ३३ वर्षीय युजवेंद्र चहलने ७२ सामन्यांच्या ६९ डावांमध्ये १२१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ५.२६ च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या आहेत. चहलने ५ वेळा एका डावात ४ विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात दोन वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ :
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल. राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.