* दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही गंभीरकडे दुर्लक्ष
* अंबाती रायुडूला कसोटीसह एकदिवसीय संघातही स्थान
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानने जवळपास एक वर्षांच्या कालावधीनंतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. मात्र पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सलामीवीर गौतम गंभीरकडे निवड समितीने दुर्लक्ष केले आहे. मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याला भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या झहीरला काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून डच्चू देण्यात आला होती. तरीही तंदुरुस्तीशी लढा देणाऱ्या ३५ वर्षीय झहीरने भारताच्या १७ जणांच्या कसोटी संघात स्थान मिळवले आहे. मात्र त्याला एकदिवसीय संघात जागा मिळाली नाही. झहीरने या मोसमात रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत आतापर्यंत १३ बळी मिळवले आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग या भारताच्या अनुभवी खेळाडूंना दोन्ही संघात स्थान मिळवता आले नाही. रणजी स्पर्धेत काही दिवसांपूर्वी शतक झळकावूनही गंभीरसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंदच राहिले. मुंबईकर अजिंक्य रहाणेला कसोटी आणि एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहे.
कसोटी संघात महेंद्रसिंग धोनीसाठी राखीव यष्टीरक्षम म्हणून वृद्धिमन साहाची निवड करण्यात आली आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकलेला फिरकीपटू रवींद्र जडेजा संघात परतला आहे. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांच्यानंतर तो कसोटी संघातील तिसरा फिरकीपटू असणार आहे.
एकदिवसीय संघात इशांत शर्माचा समावेश करण्यात आला, याचेच सर्वाना आश्चर्य वाटले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तीन सामन्यांत १८९ धावा देणारा इशांत एका षटकांत तब्बल ३० धावा देऊन मोहालीतील सामन्यात पराभवास कारणीभूत ठरला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता. पण मोहम्मद शामीच्या सुरेख कामगिरीमुळे त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. जयदेव उनाडकट आणि विनय कुमार यांच्या जागी एकदिवसीय संघात इशांत आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा