भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वन-डे सामन्यांची मालिका भारतीय संघाने ३-० ने गमावली. न्यूझीलंडच्या संघाने टी-२० मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढत मालिकेत दमदार पुनरागमन केलं. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ तरुण खेळाडूंच्या सोबत मैदानावर उतरला होता. मात्र या खेळाडूंनी पुरती निराशा केली. याचसोबत गोलंदाजीत भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळू शकली नाही. भारतीय संघाच्या पराभवामागचं हे प्रमुख कारण मानलं जातंय. भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खानने याप्रसंगात जसप्रीत बुमराहला मोलाचा सल्ला दिला आहे.

अवश्य वाचा – BLOG : या पराभवाची संघाला गरज होती !

“जसप्रीतची सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची इमेज आहे, ती सांभाळायला त्याला झगडावं लागणार आहे. सध्या प्रतिस्पर्धी संघ असा विचार करत आहेत की, ठीक आहे बुमराहच्या गोलंदाजीवर आम्हाला ३०-३५ धावा मिळाल्या तरी खूप झाल्या…आम्ही इतर गोलंदाजांकडून धावा वसुल करु. पण बुमराहच्या गोलंदाजीवर बचावात्मक खेळून त्याला विकेट मिळू द्यायची नाही. त्यामुळे आपल्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी फलंदाज बचावात्मकच खेळणार हे समजून बुमराहला आक्रमक व्हावं लागेल. विकेट मिळवण्यासाठी बुमराहला आता नवीन पर्यायांचा विचार करावा लागेल, फलंदाज त्याला सहजासहजी विकेट देणार नाही”, झहीर Cricbuzz संकेतस्थळाशी बोलत होता.

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ मार्च महिन्यात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Story img Loader