Ishant Sharma on Virat Kohli: भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक धक्कादायक खुलासा करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. एक मोठा खुलासा करताना इशांत शर्माने सांगितले की, “धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने भारताचा महान वेगवान गोलंदाज झहीर खानची कारकीर्द संपवली.” झहीर खानने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने क्षेत्ररक्षणादरम्यान झहीर खानच्या एका चेंडूवर धोकादायक किवी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमचा झेल सोडला. त्यानंतर ब्रेंडन मॅक्युलमने ३०२ धावांची ऐतिहासिक खेळी खेळून भारताविरुद्धचा सामना ड्रॉ केला.
भारतीय गोलंदाज इशांत शर्माने खुलासा केला की, “भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान भारतीय फलंदाज विराट कोहलीने झेल सोडल्यामुळे भारतासाठी १०० कसोटी सामने खेळू शकला नाही.” जिओ सिनेमाच्या तज्ञ पॅनेल चर्चेत, इशांत शर्माने फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने कसा झेल सोडला याची एक मनोरंजक कथा शेअर केली, त्यानंतर झहीर खानने आपली कारकीर्द संपल्याची घोषणा केली.
विराट कोहलीमुळे झहीर खानची कारकीर्द संपुष्टात आली- इशांत शर्मा
इशांत शर्माने हा एवढा मोठा खुलासा जिओ सिनेमाच्या पॅनल डिस्कशन दरम्यान केला आहे. इशांत शर्माने बोलताना म्हटले की, “आम्ही न्यूझीलंडमध्ये खेळत होतो. ब्रेंडन मॅक्क्युलमने ३०० धावा केल्या होत्या आणि विराट कोहलीने जेव्हा झेल सोडला तेव्हा मला आठवते की, भारतीय संघ लंचच्या आसपास होता. विराट कोहलीने झहीर खानला सॉरी म्हटले. त्यानंतर झहीर खान म्हणाला, ‘काळजी करू नका, आम्ही त्याला आऊट करून लवकर बाहेर काढू.’ मग चहापानाच्या वेळी विराट कोहलीने पुन्हा झहीर खानला सॉरी म्हटले आणि जॅकने त्याला काळजी करू नकोस असे सांगितले. जेव्हा तिसऱ्या दिवशी चहापानाच्या वेळी विराट कोहलीने झहीर खानची माफी मागितली तेव्हा जॅक म्हणाला, ‘तू माझे करिअर संपवले आहेस.’ मी ही त्यावेळी तिथेच होतो आणि मलाही जरा थोडे वाईट वाटले.”
यानंतर झहीरने आपली बाजू मांडली. तो म्हणाला, “मी तसे बोललो नाही. मी म्हणालो की फक्त दोनच खेळाडू होते, पहिला किरण मोरे ज्याने ग्रॅहम गूचला बाद केले आणि त्याने ३०० धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आहे, ज्याने झेल सोडला आणि कोणीतरी ३०० धावा केल्या. त्यांनी मला असे बोलू नकोस असे सांगितले. साहजिकच त्यांना ते चांगले वाटणार नाही. झेल सोडला आणि धावा झाल्या.” डावाच्या सुरुवातीला जीवदान मिळाल्यानंतर मॅक्युलमने त्रिशतक झळकावले. माजी किवी फलंदाजाला झहीर खानने बाद करण्यापूर्वी ३०२ धावा केल्या होत्या. झहीरने त्या इनिंगमध्ये ५ विकेट्स घेतल्या, पण मॅक्क्युलमने त्याच्या या कामगिरीवर पाणी फिरवले आणि शेवटी हा सामना अनिर्णित राहिला.
या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला पहिल्या डावात १९२ धावांवर गारद केले, त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ४३८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी ९४ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या, पण ब्रेंडन मॅक्क्युलमचा एक झेल विराट कोहलीने ९ धावांवर असताना सोडला, त्यानंतर या फलंदाजाने ३०२ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली आणि भारताविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडने ६८०/८ धावा करून दुसरा डाव घोषित केला होता.