आंतरराष्ट्रीय खेळाडू संघात नसल्यावर कशी वाताहत होऊ शकते, याचा नमुना तळाच्या झारखंडविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईकडून पाहायला मिळाला आणि हाच का तो अव्वल स्थानावर विराजमान झालेला मुंबईचा संघ, अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. दुसऱ्या दिवशीही मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत सौरभ तिवारीने द्विशतक झळकावले आणि संघाला ३५१ धावांपर्यंत मजल मारून दिली, त्यांच्या गोलंदाजांनीही भेदक मारा करत मुंबईवर अंकुश कायम ठेवला. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद २१० अशी मजल मारली आहे. मुंबई सामना जिंकणे दूरच दिसत असून पहिल्या डावात आघाडी मिळवेल का, हा यक्षप्रश्न आहे. त्यामुळे मुंबईच्या संघावर आलेले हे धावांच्या अंधाराचे जाळे फिटणार का, याचीच उत्सुकता असेल.
सकाळच्या सत्रात तिवारीने तडाखेबंद फलंदाजी करत द्विशतक झळकावले, दुसऱ्या दिवशी त्याने ६३ धावा कमावल्या त्या ८ चौकार आणि ४ षटकारांच्या ५६ धावांच्या जोरावर. विशाल दाभोळकरने त्याला त्रिफळाचीत करत त्याचा काटा काढला. तिवारीने एकूण २६ चौकार आणि १२ षटकार लगावत २३८ धावांची अद्भुत खेळी साकारली, तर एस. एस. रावबरोबर (नाबाद २३) नवव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी रचली.
वेगवान गोलंदाज वरुण आरोनने पहिल्याच स्पेलमध्ये मुंबईच्या डावाला खिंडार पाडत २ बाद ३० अशी अवस्था केली. फॉर्मात असलेल्या आदित्य तरेने (६७) अर्धशतकी खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला मोठी धावसंख्या उभारून देता आली नाही.
चहापानाच्या काही मिनिटांपूर्वी मुंबईची ५ बाद ११४ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर हिकेन शाह (खेळत आहे ४६) आणि सूर्यकुमार यादव (खेळत आहे ४९) यांनी संयमी खेळी साकारल्यामुळे मुंबईला दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २१० अशी मजल मारता आली असून ते अजूनही १४१ धावांनी पिछाडीवर आहेत.
संक्षिप्त धावफलक
झारखंड (पहिला डाव) : १०२.१ षटकांत सर्व बाद ३५१ (सौरभ तिवारी २३८; जावेद खान ४/७९) वि. मुंबई (पहिला डाव) : ६९ षटकांत ५ बाद २१० (आदित्य तरे ६७; वरुण आरोन २/२८).