ZIM vs PAK 2nd T20I Sufyan Moqim break Umar Gul Records : पाकिस्तान क्रिकेट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या यजमानपदासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सतत चर्चेत आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाकडून दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी-२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेवर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात सुफियान मुकीमने महत्त्वाची भूमिका बजावत इतिहास घडवला आहे.
पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर झिम्बाब्वे संघाला शरणागती पत्करावी लागली. झिम्बाब्वेच्या खराब फलंदाजीचा अंदाज यावरून लावता येतो की संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि केवळ १२.४ षटकांत ५७ धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेचा हा टी-२० मधील सर्वात कमी धावसंख्या आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्ध ८२ धावा केल्या होत्या, मात्र वर्षाच्या अखेरीस हा लज्जास्पद विक्रमही मोडीत निघाला.
२५ वर्षीय गोलंदाजाने लिहिला इतिहास –
संपूर्ण झिम्बाब्वे संघाला इतक्या कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात फिरकी गोलंदाज सुफियान मुकीमचा मोठा वाटा होता. २५ वर्षीय सुफियानने एकट्याने अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे या गोलंदाजाने २.४ षटकात केवळ ३ धावा देऊन ५ फलंदाजांना बाद केले. अशा प्रकारे पाकिस्तानच्या टी-२० आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात मोठा विक्रम मोडला गेला.
हेही वाचा – SMAT 2024 : मुंबईच्या विजयात सूर्या-शिवम आणि शार्दुल चमकले, तर पृथ्वी शॉने पुन्हा केले निराश
u
१५ वर्षे जुना विक्रम मोडला –
सुफियान मुकीमची ही कामगिरी आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाकिस्तानची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. याआधी सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम उमर गुलच्या नावावर होता. उमर गुलने २००९ आणि २०१३ मध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. उमर गुलने या काळात केवळ ६-६ धावा खर्च केल्या होत्या. आता सुफियानने आपल्या ७व्या सामन्यात उमर गुलचे दोन्ही विक्रम एकाच झटक्यात मागे टाकले आहेत.
या सामन्यापूर्वी सुफियानने ६ टी-२० सामन्यात ९ विकेट्स घेतल्या होत्या. आता सातव्या सामन्यात ५ विकेट्स घेतल्यानंतर त्याच्या विकेट्सची संख्या १४ झाली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या. आता तिसऱ्या सामन्यात त्याची गोलंदाजी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.