ZIM vs PAK 1st ODI Result: अंतर्गत बंडाळ्या आणि खराब कामगिरीच्या गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला रविवारी आणखी एक धक्का बसला. ऑस्ट्रेलियाहून झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. बुलावेयो इथे झालेल्या पहिल्या वनडेत झिम्बाब्वेने पाकिस्तानवर ८० धावांनी खणखणीत विजय मिळवला.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिचर्ड नकाराग्वाने ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अनुभवी सिकंदर रझाने ६ चौकारांसह ३९ धावांची खेळी केली. बाकी खेळाडूंना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. पाकिस्तानतर्फे सलमान अघा आणि फैझल अक्रम यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या. आमीर जमाल, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

झिम्बाब्वेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फॉर्मात असलेल्या सईम अयुबला ११ धावाच करता आल्या. अब्दुला शफीक केवळ एक धाव करू शकला. कामरान गुलाम, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सलमान अघा यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. २१ षटकात ६०/६ अशी पाकिस्तानची घसरगुंडी उडाली. यानंतर पावसाचे आगमन झाले. पाऊस वाढत गेल्याने खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार झिम्बाब्वेचा संघ आघाडीवर असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. या विजयासह झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. पाकिस्तानी संघ आपला पहिलाच सामना हरला असून, त्यानंतर आता मालिका गमावण्याचा धोकाही आहे. मालिकेतील दुसरा सामना २६ नोव्हेंबरला तर मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना २८ नोव्हेंबरला होणार आहे.