करोनाचा परिणाम क्रिकेट आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर सातत्याने होत आहे. आता झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत या जीवघेण्या विषाणूच्या विळख्यात आले आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर त्यांना एका हॉटेलमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे. यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी झिम्बाब्वे संघाला मोठा धक्का बसला आहे.
श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे, तर दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे १८ आणि २१ जानेवारीला खेळवला जाईल. श्रीलंकेचे डॉक्टर अर्जुन डी सिल्वा यांनी राजपूत करोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. ६० वर्षीय राजपूत देखील आयसोलेशन प्रोटोकॉलमुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांचा भाग बनू शकणार नाही. डगआऊटमध्ये त्याची अनुपस्थिती क्रेग इर्विनच्या नेतृत्वाखालील संघासाठी कठीण होऊ शकते.
हेही वाचा – आयपीएलनं VIVOला म्हटलं ‘टाटा’..! लीगला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर
लालचंद राजपूत यांनी भारतासाठी २ कसोटी आणि ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांचे कोचिंगच्या जगात ते एक मोठे नाव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २००७ टी-२० विश्वचषक जिंकला. राजपूत यांना १० दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. संघातील एकाही खेळाडूची करोना चाचणी अद्याप पॉझिटिव्ह आलेली नाही, ही झिम्बाब्वेसाठी दिलासादायक बाब आहे.