Zimbabwe defeated India by 13 runs : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टी-२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा १३ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडिया या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडली आहे. २०२४ मधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचा हा पहिला पराभव होता. यापूर्वी भारताने सर्व मालिका आणि विश्वचषकातील सामने जिंकले होते. आता झिम्बाब्वेने भारताची सलग १२ सामन्यांची विजयी मालिका खंडीत केली आहे. तसेच भारताला झिम्बाब्वेविरुद्ध ८ वर्षानंतर पराभव पत्करावा लागला आहे. याआधी २०१६ साली भारतीय संघ पराभूत झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून ११४ धावा केल्या. या काळात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अप्रतिम होती. टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरने दोन, मुकेश कुमार आणि आवेश खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

टीम इंडियाची यंग ब्रिगेड अपयशी ठरली –

सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियासमोर विजयासाठी केवळ ११६ धावांचे लक्ष्य होते. जे भारतीय संघ अगदी सहज साध्य करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. मात्र, भारतीय संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि १९.५ षटकात १०२ धावांवर सर्वबाद झाला. या काळात कर्णधार गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने २९ चेंडूत ३१ धावा केल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने २७ आणि आवेश खानने १२ चेंडूत १६ धावा केल्या. तरीही टीम इंडियाने शेवटच्या षटकात सामना गमावला.

हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 : भारतीय संघात तीन युवा खेळाडूंनी केले पदार्पण, शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मिळाली संधी

टीम इंडियाने शेवटच्या षटकात गमावला सामना –

टीम इंडियाला शेवटच्या षटकात झिम्बाब्वेविरुद्ध विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांची गरज होती. भारताच्या ९ विकेट्सही पडल्या होत्या, पण वॉशिंग्टन सुंदर एका टोकाकडून फलंदाजी करत होता. तेव्हा भारत हा सामना जिंकू शकेल, अशी आशा निर्माण झाली होती. पण वॉशिंग्टनने सर्वांची निराशा केली आणि शेवटच्या षटकात केवळ दोन धावा काढता आल्या. यासह भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या इतिहासातील फक्त तिसरा टी-२० सामना गमावला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zimbabwe create history after 8 years with a 13 run victory in a t20 match against india vbm