Zimbabwe Creates History: झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुलावायो येथे खेळवला जात आहे. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात त्यांच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली. या तीन फलंदाजांच्या शतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वे क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिला आहे.
झिम्बाब्वे संघाने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या डावात ५८६ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेची कसोटी क्रिकेटमधील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे. यजमान झिम्बाब्वेकडून शॉन विल्यम्सने १७४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १५४ धावा केल्या.
विल्यम्सनंतर कर्णधार क्रेग इर्विनने १७६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०४ धावांची शतकी खेळी खेळली. या दोघांनंतर ब्रायन बेनेटनेही शानदार फलंदाजी केली. या सामन्यात ब्रायनने १२४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११० धावांची नाबाद खेळी केली. या तीन शतकांच्या जोरावर झिम्बाब्वे संघाने ५८६ धावांची मोठी धावसंख्या उभारली.
झिम्बाब्वे संघाने मोडला २३ वर्षे जुना विक्रम
विक्रमी धावसंख्येसह झिम्बाब्वे क्रिकेट संघाने आपला २३ वर्षे जुना विक्रम मोडित काढला आहे. या संघाने यापूर्वी २००१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ५६३ धावा केल्या होत्या. आता झिम्बाब्वेने हा विक्रम मागे टाकत ५८६ धावा केल्या आहेत. झिम्बाब्वे संघाच्या उत्कृष्ट फलंदाजीनंतर संघाची स्थितीही अधिक मजबूत दिसत आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनाही चांगली सुरूवात केली आहे.
हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचा दुर्मिळ विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज
झिम्बाब्वेने अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने २ बाद ९५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी डावाची सुरूवात करतील.
तर अफगाणिस्तानकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या एएम गझनफरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. तर नवीद झादरान, झाहिर खान, रहमन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतले. तर अझमतुल्लाने १ विकेट घेतली. अफगाणिस्तानचा संघ आता फलंदाजीत कशी कामगिरी करणार आणि पुनरागमन करणार यावर तिसऱ्या दिवशी सर्वांच्या नजरा असतील.