सोची हिवाळी ऑलिम्पिकमधील यजमान रशियाच्या भरघोस पदकांच्या कमाईमागे उत्तेजकं असावीत असा  संशय आहे. रशियाच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. ग्रिगोरी रॉडचेन्को यांच्या मुलाखतीमुळे या संशयाला दुजोराच मिळाला आहे.

खेळात व्यावसायिकता आल्यानंतर ओघाओघाने अहमहमिका वाढली व येनकेनप्रकारेण झटपट यश मिळविण्याकडे खेळाडूंचा कल वाढू लागला. त्याचे अनिष्ट पर्यवसान उत्तेजक सेवन करीत प्रसिद्धी व पैसा मिळविण्याच्या दिशेने वाटचाल दिसू लागली. रशियन खेळाडू व संघटकांनी झटपट यश मिळविण्यासाठी उत्तेजकाचा मार्ग स्वीकारला आणि दुर्दैवाने तेथील शासनकर्त्यांचे त्यांना अप्रत्यक्ष सहकार्य असल्याचे अलीकडे आढळून आले आहे. साहजिकच हा देश म्हणजे शापित खेळाडूंचा देश आहे अशीच जगभर प्रतिमा झाली आहे.

रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकपूर्वी रशियन खेळाडू उत्तेजक सेवन करीत असतात व त्यांना खोटे दाखले मिळविण्यासाठी तेथील संघटक तसेच शासनकर्त्यांचीही अप्रत्यक्षरीत्या मदत मिळते असे आढळून आले. त्यानंतर  जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) रशियाचे काही धावपटू उत्तेजक घेत असल्याचे व त्यांना तेथील राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सहकार्य असल्याचे जाहीर केले. त्याआधारे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाची संलग्नता तात्पुरती स्थगित केली, तसेच रशियाच्या धावपटूंवरही बंदी घातली. या निर्णयामुळे साऱ्या जगात खळबळ माजली. रशियाच्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. ग्रिगोरी रॉडचेन्को यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना या वृत्तास दुजोरा दिला. इतकेच नाही तर उत्तेजकाबाबत खेळाडूंना व संघटकांना सहकार्य करावे अशी आपल्याला तेथील शासनाकडूनच सूचना केली जात होती असेही सांगितले. अर्थातच वाडाने केलेल्या विधानास सज्जड पुरावाच लाभला. ऑलिम्पिक स्पर्धेतील वेटलिफ्टिंग, कुस्ती, ज्युदो, अ‍ॅथलेटिक्स आदी खेळांमध्ये रशियन खेळाडूंचे प्राबल्य असते. रिओ ऑलिम्पिकमध्ये रशियन खेळाडूंचा प्रभाव राहू नये म्हणून हे आरोप केले जात आहेत. अमेरिका, चीन आदी देशांनी संगनमत करीत आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकपासून वंचित करण्यासाठी हे कुभांड रचले गेले आहे अशी टीका रशियन संघटकांकडून करण्यात आली.

सोची येथे झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये यजमान रशियाने भरघोस पदकांची कमाई केली. त्यांचे यश अन्य देशांच्या डोळ्यांत खुपसणारे होते. रशियन खेळाडूंनी उत्तेजकाची मदत घेतली असावी असा संशय अन्य देशांच्या अनेक संघटकांना आला. त्याला खतपाणी घातले गेले ते रॉडचेन्को यांनी केलेल्या जाहीर आरोपांमुळेच. वाडा संस्थेने या आरोपांची शहानिशा करण्यासाठी कॅनडातील कायदेतज्ज्ञ रिचर्ड मॅक्लारेन यांची समिती नेमली. या समितीने केलेल्या पाहणीत रशियाच्या किमान पंधरा खेळाडूंनी उत्तेजक सेवन केले असल्याचे निष्पन्न झाले. वाडा संस्थेच्या निरीक्षकांनी मॉस्को येथील उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची तपासणी केली. त्यामध्ये अनेक संशयास्पद बाबी आढळल्यानंतर त्यांनी या प्रयोगशाळेची मान्यता काढून घेतली. केवळ खेळाडू नव्हे तर रशियन क्रीडा संघटक व शासनकर्त्यांचे अप्रत्यक्ष आदेश यामुळे तेथील क्रीडा क्षेत्र उत्तेजकाच्या विषामुळे पोखरले गेले आहे. अलीकडे रशियाची धावपटू युलिया स्टेपानोव्हा हिने अनेक प्रशिक्षकांकडूनच धावपटूंवर उत्तेजक घेण्याबाबत दडपण आणले जाते असा आरोप केला होता. पुराव्यासाठी तिने स्ट्रिंग ऑपरेशन्स करीत प्रशिक्षक व खेळाडू यांच्यातील संवादाचे ध्वनिमुद्रण सादर केले होते.

रशियन खेळाडूंनी उत्तेजकाचा आधार घेतला. त्याला बरीच कारणे आहेत. मध्यंतरी रशियातील गंभीर अर्थव्यवस्थेमुळे खेळाडूंना प्रायोजक मिळणे कठीण जात होते. प्रसिद्धी व पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पैसा मिळविण्यासाठी क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च यश मिळविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ते झटपट यशाचा मार्ग स्वीकारतात. काही वेळा उत्तेजकाबाबतचे अज्ञानही कारवाईस कारणीभूत ठरते. प्रत्येक वर्षी वाडा संस्थेकडून कोणती औषधे बंदी अंतर्गत येतात याची यादी जाहीर केली जाते. साधारणपणे दोन हजारपेक्षा जास्त औषधांचा त्यामध्ये समावेश असतो. ही यादी वेबसाइटवर उपलब्ध असली तरी त्याची अद्ययावत माहिती घेणे हे अनेक खेळाडू व त्याच्या प्रशिक्षकांच्या मर्यादेपलीकडचे असते. खरंतर या खेळाडूंच्या वैद्यकीय सल्लागाराने ही माहिती मिळविणे अपेक्षित असते. मात्र त्यांच्याकडून त्याबाबत फारशी काळजी व तत्परता घेतली जात नाही. त्याचाच फटका रशियाची सौंदर्यवती टेनिसपटू मारिया शारापोवा हिला बसला. यंदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या वेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत ती दोषी आढळली. तिच्या शरीरात जे उत्तेजक औषधाचे नमुने आढळले, ते औषध गेली अनेक वर्षे वैद्यकीय सल्लागारांच्या सल्ल्यानेच व अजाणतेपणाने घेतले जात असल्याची तिने कबुली दिली.  साहजिकच तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये बंदीच्या कारवाईस सामोरे जावे लागले आहे. मात्र कीर्तीच्या शिखरावर असतानाच तिच्या नशिबात कुप्रसिद्धी आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिस जगतासाठी हा खरोखरीच मोठा धक्का होता. शारापोवा ही रशियातील आदर्श असलेली खेळाडू असल्यामुळे रशियातील सर्वच क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

उत्तेजक औषधे उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडूनही अनेक वेळा क्रीडा संघटक किंवा प्रशिक्षकांना हाताशी धरून खेळाडूंवर उत्तेजकाचा मारा केला जातो. उत्तेजक चाचणीच्या वेळी ही उत्तेजक औषधे शरीरात सापडू नयेत यासाठीही त्यांच्याकडे औषधे असतात. जागतिक स्तरावर हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. रशियन महासंघातील अनेक देशांमधील अ‍ॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, कुस्ती आदी खेळांमधील अनेक प्रशिक्षक अन्य देशांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात. हे प्रशिक्षकदेखील अनेकदा अशा उत्तेजक औषधांच्या व्यवसायात अनधिकृत दलाल म्हणून काम करीत असतात.

काही वेळा अहमहमिकेपोटी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करण्याच्या ईर्षेमुळेही खेळाडू उत्तेजकाचा आधार घेतात. कॅनडाचा वेगवान धावपटू बेन जॉन्सन याचे एकच ध्येय होते ते म्हणजे कार्ल लुइस या अमेरिकन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याची सद्दी संपविण्याचे. सेऊल येथे १९८८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या वेळी त्याने लुइसवर विजय मिळविला, मात्र त्याने उत्तेजक सेवन केल्याचे निष्पन्न झाले व त्याचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले. त्यानंतर तो कधीही अ‍ॅथलेटिक्समध्ये चमकू शकला नाही.

उत्तेजक सेवनामुळे कालांतराने शरीरावर खूप अनिष्ट परिणाम होत असतात. हे माहीत असूनही खेळाडू तो मार्ग स्वीकारतात. काही महिला खेळाडूंमध्ये कालांतराने या उत्तेजक सेवनामुळे पौरुषत्वाची लक्षणे आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. काही खेळाडूंनी त्यामुळे बदनामी टाळावी म्हणून आपले जीवनच संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. भारतातदेखील काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वेळा एखाद्या खेळाडूला आयुष्यातून उठविण्यासाठी त्याच्या आहारात उत्तेजक पदार्थ मिसळण्याच्या घटना झाल्या आहेत. महाराष्ट्राचा मल्ल नरसिंग यादव हे त्याबाबतचे बोलके उदाहरण आहे. परदेशातही अशा घटना घडल्या आहेत.

उत्तेजकाचा विषवृक्ष मुळापासूनच उचकटून टाकण्याची आवश्यकता आहे. रशियन शासनाकडून उत्तेजक प्रतिबंधक अधिकाऱ्यांना तपासणीबाबत सर्वाधिकार देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना पुरेसे संरक्षण देण्याचेही आदेश आहेत. असे असूनही अजूनही रशियात उत्तेजक सेवनाच्या मोठय़ा प्रमाणावर घटना घडत आहेत. सध्या केवळ त्यांच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रास मोठा फटका बसला आहे. त्यांच्या अ‍ॅथलेटिक्स महासंघावरील बंदीची व्याप्ती अन्य क्रीडा प्रकारांमध्येही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठेच लागल्यानंतर आता तरी शहाणे होण्याची वेळ रशियन संघटकांवर आली आहे. अन्य देशांमधील क्रीडा संघटकांनीही याबाबत आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपल्या देशातील क्रीडा क्षेत्र उत्तेजकविरहित आहे ना याची खात्री त्यांनी केली पाहिजे. त्याकरिता खेळाडू, संघटक व प्रशिक्षक यांनी एकमेकांना  विश्वासात घेतले पाहिजे. उत्तेजकविरहित आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्र कसे होईल व खेळाडूंना खऱ्या अर्थाने त्यांच्या निव्वळ क्षमतेच्या जोरावरच कसे यश मिळेल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. शालेय स्तरापासूनच उत्तेजकाबाबतची माहिती दिली जाण्याची गरज आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader