उत्तम संघबांधणी, योग्य व्यूहरचना आणि सांघिक ऐक्य या जोरावर खरं तर फ्रान्स युरो चषकाचा प्रबळ दावेदार होता, पण नशीब पोर्तुगालच्या बाजूने होते.

फिफा विश्वचषक स्पध्रेनंतर फुटबॉलप्रेमींची सर्वाधिक पसंती असलेल्या युरो चषक स्पध्रेची रविवारी सांगता झाली. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पध्रेत प्रथेप्रमाणे नवा जेता मिळाला. केवळ स्पेनने या प्रथेला तडा देत सलग दोनदा जेतेपद पटकावले, परंतु या वेळी त्यांना उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. युरो चषक २०१६ स्पध्रेत कोण विजयी झाले, कुणाचे पारडे जड होते, कोणी उलटफेर केला, या चर्चा आता महिनाभर सुरूच असणार. मात्र, यावेळी स्पध्रेच्या स्वरूपात केलेल्या बदलांमुळे अनेक ‘ट्विस्ट अ‍ॅण्ड टर्न’ पाहायला मिळाले. १९९२ नंतर पहिल्यांदाच संघसंख्या १६ वरून २४ करून युरोपियन फुटबॉल महासंघाने ऐतिहासिक पाऊल उचलले. ठरलेल्या संघांमध्ये रंगणारी चुरस पाहून कंटाळलेल्या फुटबॉलप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले. कारण या बदलामुळे लहान लहान संघांना आपली छाप पाडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार होते. फक्त त्याचा वापर ते कसे करतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. संघसंख्या आठने वाढवल्यामुळे यंदा पाच नवीन देशांना युरोत पदार्पण करता आले. तर उर्वरित तीन संघ कधी ना कधी युरोत खेळले होते. या पाच संघांमध्ये वेल्स, उत्तर आर्यलड, आइसलँड, अल्बेनिया आणि स्लोव्हाकिया या संघांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. यामध्ये वेल्स, उत्तर आर्यलड आणि आइसलँड यांनी तर धक्कादायक निकालाचे सत्र सुरू करून जगाला स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले.

पॅरिसमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर युरो स्पध्रेने फ्रान्समधील जनतेच्या दु:खांवर मायेची फुंकर मारण्याचे काम  केले. जवळपास १३० लोकांचा हकनाक बळी या हल्ल्याने घेतला आणि शेकडो जणांना जखमीही केले. त्या हल्ल्याचे सावट युरो स्पध्रेवरही होते. त्यामुळे फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीपूर्ण लढतीपूर्वी  स्टेड डी फ्रान्स स्टेडियमबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याची पुनरावृत्तीची होणार तर नाही, याची धाकधुक आयोजकांना लागली होती. पण चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करून आयोजकांनी अखेर ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. या यशासाठी त्यांची पाठ नक्कीच थोपटली पाहिजे. भारतात क्रिकेटला सणाचे स्वरूप असते, तसे जगभरात फुटबॉल ही लोकांना एकत्र आणण्याचे संधी असते. दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आणि त्या कटू आठवणीत फुटबॉलने नेमके हेच केले. त्यांनी जगाला एकजुटीचा संदेश देत दहशतवादाला सडेतोड उत्तर दिले आणि तेही अहिंसेच्या माध्यमातून. हेच फुटबॉल खेळाचे वैशिष्टय़ आहे. तरीही इंग्लंड आणि रशिया चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीने या स्पध्रेला गालबोट लावलेच. त्यावरही फ्रान्स सरकारने कठोर पावले उचलत दंगेखोर प्रेक्षकांना देशातूनच हिसकावून लावले. या दंगेखोरीला जुना इतिहास असल्याने याकडे गांर्भीयाने न पाहिलेलेच बरे. तरीही यंदाही युरो स्पर्धा ही खऱ्या अर्थाने वेगळी ठरली.

संघसंख्या वाढवल्याने हवी तितकी चुरस वाढली नसली तरी काही संघांनी बलाढय़ संघांना हतबल केले. याची सुरुवात गट साखळीतूनच झाली. प्रत्येक गटात दोन बलाढय़ आणि लिंबू टिंबू अशी रचना करण्यात आली होती. त्यामुळे अंतिम १६ मध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत जाणारे संघही निश्चित मानले जात होते. पण या गृहीत निकालाला पहिला तडा दिला तो वेल्सने. ५८ वर्षांनंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पध्रेसाठी पात्र ठरलेल्या या संघाने इंग्लंड (माजी विश्वविजेता, १९६६) आणि रशिया (माजी युरो चषक विजेता,१९६०) या दिग्गज संघांच्या ‘ब’ गटातून अव्वल स्थानासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याच गटातून स्लोव्हाकियाने आश्चर्यकारक निकालाची नोंद केली. रशियाला पराभूत करून, तर इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखून त्यांनी अंतिम १६ मध्ये स्थान पक्के केले. युरो स्पध्रेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या स्लोव्हाकियाच्या या कामगिरीने साऱ्या जगाला थक्क केले. इतर गटांतही विस्मयचकीत करणाऱ्या निकालाचे सत्र सुरूच होते. ‘ड’ गटात माजी विजेत्या स्पेनला जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाकडून मिळालेली हार, हा स्पध्रेतील सर्वात धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.

स्पध्रेत सर्वात उत्कंठा कुठल्या गटात पाहायला मिळाली असेल तर ‘फ’ गटाचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. पोर्तुगालसारख्या बलाढय़ संघाला आइसलँड व ऑस्ट्रिया या तुलनेने कमकुवत संघांनी बरोबरीवर समाधान मानायला भाग लावले. पोर्तुगालच्या या हाराकिरीमुळे त्यांचे पुढील फेरीतील प्रवेशही अनिश्चित मानला जात होता. जर तसे झाले असते, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोने नक्कीच लिओनेल मेस्सीच्या पावलावर पाऊल टाकून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली असती. नशिबाने रोनाल्डोवर तशी वेळ आली नाही आणि साखळीतील अखेरच्या सामन्यात हंगेरीला ३-३ अशा बरोबरीत रोखून पोर्तुगालने आव्हान कायम राखले. त्यातही आइसलँडने त्यांच्यासोबत तळ्यातमळ्यात हा खेळ खेळलाच. भरपाई वेळेत अ‍ॅर्नोर ट्राउस्टॅसनच्या (९०+) गोलने आइसलँडला ऑस्ट्रियावर २-१ असा विजय मिळवून दिला आणि फ गटात त्यांनी दुसऱ्या स्थानासह बाद फेरीत ऐटीत प्रवेश केला. केवळ जागतिक क्रमवारीच्या जोरावर पोर्तुगालने (४) बाद फेरी गाठली. कर्तृत्वशून्य कामगिरी असतानाही पूर्वजांच्या पुण्याईवर मिळालेले ते दान होते. याच पुण्याईच्या जोरावर नंतर मात्र पोर्तुगालने उल्लेखनीय सांघिक खेळाचा नजराणा पेश करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.

मात्र त्या तुलनेत वेल्स आणि आइसलँड यांची कामगिरी कौतुकास्पद ठरली. जागतिक क्रमवारीत अनुक्रमे २८ व २७ व्या क्रमांकावर असलेल्या या संघांनी भल्याभल्या संघांना पाणी पाजले. त्यांच्या तुलनेत पोर्तुगालला वेल्स विरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना वगळता एकाही लढतीत निर्धारित ९० मिनिटांत विजय मिळवता आलेला नाही. अंतिम फेरीतही त्यांनी अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळात विजयश्री मिळवला. आइसलँडने गट साखळीत पोर्तुगाल व हंगेरीला बरोबरीत रोखून आापली क्षमता दाखूवन दिली. उत्तम बचाव, मॅन टू मॅन मार्किंगचा खेळ आणि अचूक व्यूहरचना या जोरावर आइसलँडने स्पध्रेवर छाप पाडली. उपउपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडवर मिळवलेल्या विजयाने आइसलँडचे नाव इतिहासात नोंदवले गेले. याला काही फुटबॉल पंडित इंग्लंडचा संघ कमकुवत होता म्हणून आइसलँडचे फावले, असा तर्क लावतील. पण ते या विजयाचे खरे हकदार आहेत आणि तो हक्क त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. उपांत्यपूर्व फेरीत यजमान फ्रान्सने त्यांना धुव्वा उडविला असे आकडेवारीवरून तरी दिसते. मात्र पहिल्या हाफमध्ये ४ गोल खाऊनही मध्यंतरानंतर त्यांनी केलेले पुनरागमन यजमानांनाही अचंबित करणारे होते. त्यामुळेच पराभवानंतर फ्रान्सच्या चाहत्यांनीही आइसलँडच्या जिद्दीला टाळ्यांच्या कडकडाटात सलाम ठोकला. मायदेशातही या संघाचे विश्वविजेत्यासारखे स्वागत झाले. चषक पटकावला नसला तरी या स्पध्रेत त्यांनी बरेच काही कमावले. याची जाण आइसलँडवासीयांनाही आहे आणि म्हणूनच आपल्या संघाचे त्यांनी मोठय़ा उत्साहात स्वागत केले. उत्तर आर्यलडच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी अंतिम १६ पर्यंत मारलेली मजल हीच त्यांच्यासाठी उंच झेप आहे आणि त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी ती पुरेशी आहे.

१९५८च्या विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्यफेरीतील प्रवेश, यापलीकडे सांगण्यासारखे काहीच नसलेल्या वेल्सने नवा इतिहास रचला. पहिल्यांदा युरो स्पर्घेत खेळणाऱ्या या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तब्बल ५८ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरलेल्या या संघाने प्रस्तापितांना एकामागून एक धक्के देत अंतिम चारमध्ये स्थान पटकावले. उपांत्य फेरीत पोर्तुगालविरुद्ध विजयाचा कौल हा त्यांच्याच बाजूने लागणार, असे वाटत होते. मात्र अनुभवाची कमतरता असल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले. पोर्तुगालच्या तुलनेत वेल्सची कामगिरी ही वरचढच होती. गॅरेथ बेल, अ‍ॅरोन रॅम्सी, बेन डेव्हिस, अ‍ॅश्ले विलियम्स, हॅल-रॉबसन कानू यांनी शंभर टक्के योगदान देत संघाच्या स्वप्नवत वाटचालीत मोठा वाटा उचलला. उपांत्य लढतीत मात्र पोर्तुगालच्या रोनाल्डोसमोर त्यांना काहीच करणे शक्य झाले नाही. त्यांच्या खिलाडूवृत्तीला प्रेक्षकांनी, टीकाकारांनी आणि प्रतिस्पर्धी संघानेही दाद दिली. घरच्या प्रेक्षकांसमोर ताठ मानेने ते उभे राहू शकतील, अशी त्यांची ही कामगिरी आहे. पदार्पणातच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा त्यांचा पराक्रम इतर संघांसाठीही प्रेरणादायी आहे.

फ्रान्सने विश्वविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत स्थान पटकावले. घरच्या मैदानावर सलग १८ सामने अपराजित, यजमान म्हणून सहा स्पर्धामध्ये पटकावलेली जेतेपद, या आकडेवारीवरून आणि एकूण कामगिरीचे विश्लेषण केल्यावरही फ्रान्सच युरो चषकाचा दावेदार आहे, हे कुणीही ठामपणे सांगू शकत होते. जिरूड, ग्रिझमन, पोग्बा, पायेट यांच्या कामगिरीचा आलेख स्पध्रेगणित चढा राहिला. या तुलनेत पोर्तुगाल कुठेच दिसत नव्हते. आधी म्हणाल्याप्रमाणे पुण्याईच्या जोरावर उपउपांत्यफेरी आणि नंतर नशिबाची साथ, या बळावर त्यांची घोडदौड सुरू होती. मात्र पोर्तुगालच्या या वाटचालीला भावनिक किनार होती आणि कदाचित म्हणून त्यांनी कुणाच्या ध्यानी मनी नसताना इथवर मजल मारली. २००४ मध्ये युरो स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश, या पलीकडे पोर्तुगालकडे सांगण्यासारखे काही नव्हते. त्याच स्पध्रेत १९ वर्षांचा सडपातळ बांध्याचा एक युवक ग्रिसकडून पराभूत झाल्यानंतर ढसाढसा रडला होता आणि तो युवक आत्ता जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू बनला होता. रोनाल्डोच्या डोळ्यासमोर २००४ सालचा पराभव उभा होता आणि म्हणून त्याला जेतेपद पटकावायचे होते. पण नियतीला त्याच्या हातून हा विजय मान्य नसावा. अंतिम फेरीच्या पहिल्या सत्रात दुखापतीमुळे रोनाल्डोला मैदान सोडावे लागले. देशासाठी महत्त्वाच्या सामन्यात अशा पद्धतीने बाहेर जाण्याचे दु:ख त्याच्या डोळ्यांत दिसत होते. त्याच्या याच अश्रूंनी संघसहकाऱ्यांना बळ दिले आणि म्हणूनच फ्रान्ससारख्या उत्कृष्ट, दर्जेदार संघाला ते नमवण्यात यशस्वी ठरले. मैदानावर रोनाल्डोला योगदान देता आले नाही तरी उपचार करून तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत अवतरला आणि त्याच्या मौलिक मार्गदर्शनाचा या विजयात महत्त्वाचा वाटा ठरला.

या स्पध्रेचे विश्लेषण करायचे झाल्यास फ्रान्स हा युरो चषकाचा दावेदार होता. उत्तम संघबांधणी, योग्य व्यूहरचना आणि सांघिक ऐक्य हे फ्रान्सच्या बाजूने होते. त्या तुलनेत पोर्तुगालची वाटचाल ही रखडखडत होती. त्यामुळे हे जेतेपद खरेच आपण पटकावले आहे, याची तपासणी करण्यासाठी पोर्तुगालचे खेळाडू अजूनही स्वत:ला चिमटा काढत बसले असतील. असे असले तरी हा निकाल सर्वानी मान्य करायला हवा. ‘जो जिता वो ही सिकंदर’ असे म्हणतात ते उगीच नाही.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader