लखनौ येथे नुकत्याच झालेल्या कनिष्ठ गट विश्वचषक हॉकी स्पर्धेत आपल्या कनिष्ठ संघाने घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. हॉकीतील सुवर्णयुगाची पुन्हा आठवण करून देणाऱ्या या विजयाविषयी..

कनिष्ठ गटापासूनच व्यावसायिक वृत्तीने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया, जर्मनी यांच्यासारख्या बलाढय़ संघांच्या उपस्थितीत कनिष्ठ गटाची विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु सांघिक कौशल्यास वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची दिलेली जोड तसेच संघातील प्रत्येक सदस्याने दिलेली साथ यामुळेच भारतीय संघाने विश्वचषक जिंकला व स्वप्नवत कामगिरी केली.

लखनौ येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. घरच्या मैदानावर आजपर्यंत कोणत्याही देशास या स्पर्धेच्या इतिहासात विजेतेपद मिळाले नव्हते. भारतीय संघाने हा दुष्काळ संपविताना स्पर्धेत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान मिळविला. यापूर्वी त्यांनी २००१ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत अजिंक्यपदावर पहिली मोहोर नोंदविली होती. त्याआधी १९९७ मध्ये भारतास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर भारतीय संघाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांची पूर्ती करताना भारतीय संघाने अतुलनीय कामगिरी केली. अंतिम फेरीत बेल्जियमला तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियास पराभूत करीत भारतीय खेळाडूंनी पारंपरिक कौशल्याबरोबरच आधुनिक हॉकीचाही प्रत्यय घडविला. भारतीय हॉकी क्षेत्रास गेल्या सातआठ वर्षांमध्ये खूप उंचीवर नेण्यात सिंहाचा वाटा असलेले नरेंदर बात्रा यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना एक प्रकारे सन्मानाची पावतीच भारतीय कनिष्ठ संघाने दिली आहे. भारतात २०१८ मध्ये वरिष्ठ गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच २०२० मध्ये टोकियो येथे आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धासाठी लखनौ येथील विश्वचषक स्पर्धा भारतीय संघासाठी पायाभरणीच होती. त्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाचे विश्वविजेतेपद ही आगामी सुवर्णयुगाची नांदीच ठरणार आहे.

घरच्या मैदानावर खेळण्याचे जसे फायदे असतात तसेच त्यामध्ये काही तोटेही असतात. घरच्या मैदानावर खेळताना अनुकूल हवामान, प्रेक्षकांचा पाठिंबा, सवयीचे मैदान व खंबीर मनोधैर्य याचा फायदा यजमान देशाच्या खेळाडूंना मिळत असतो. असे जरी असले तरी काही वेळा घरच्या मैदानावर खेळताना खेळाडूंवर जास्त दडपण असते. विशेषत: अशा मैदानावर खराब कामगिरी झाली की आपोआपच जास्त प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागते. केवळ स्थानिक प्रसारमाध्यमे किंवा प्रेक्षक नव्हे तर घरातील कुटुंबीयही ताशेरे ओढण्याबाबत मागेपुढे पाहत नाहीत. अंतिम फेरीसारख्या महत्त्वपूर्ण लढतीत यजमान संघावरच जास्त दडपण असते. कारण प्रतिस्पर्धी संघ हरला तरी त्यांच्याकडे अनुकूल मैदानावर खेळलो नाहीत, अशी कारणमीमांसा असते. यजमान संघास तसे कारण देता येत नाही.

25-lp-hockey

भारतीय हॉकी क्षेत्रात गेली अनेक वर्षे उच्च कामगिरी संचालक म्हणून कार्यरत असलेले रोलँन्ट ओल्टमन्स या परदेशी प्रशिक्षकांचा भारतीय संघाच्या विजेतेपदात मोठा वाटा आहे. ते जरी कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक नसले तरी त्यांनी गेल्या सहासात वर्षांमध्ये भारतीय संघांची खूप चांगली बांधणी केली आहे. सर्वसाधारणपणे परदेशी प्रशिक्षकांबाबत भारतीय खेळाडू व संघटकांचे फारसे अनुकूल मत नसते. खेळाडू व परदेशी प्रशिक्षक यांच्यात सुसंवाद होऊ शकत नाही, अशी तक्रारही नेहमी केली जात असते. ओल्टमन्स हे मात्र त्यास अपवाद राहिले आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंची मानसिकता ओळखली आहे. त्यांच्या स्वभाव वैशिष्टय़े त्यांनी ओळखली असून त्यांना कसे शिकवायचे याची नाळ त्यांना सापडली आहे. संघातील कोणत्याही खेळाडूचे स्थान निश्चित नाही असे प्रत्येक खेळाडूच्या मनावर त्यांनी सातत्याने बिंबवले आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू आपले स्थान अधांतरी आहे असे मानून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी धडपडत असतो. त्यामुळच संघाची कामगिरी चांगली होत असते. कनिष्ठ संघातील खेळाडूंना वरिष्ठ संघात कालांतराने स्थान मिळू शकते. वरिष्ठ संघातील स्थान निश्चित करण्याबरोबरच आगामी हॉकी इंडिया लीगसाठी आपला भाव वाढविणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवीत भारतीय कनिष्ठ संघातील खेळाडूंनी आपली कामगिरी लक्षवेधक करण्यावर भर दिला होता.

कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळविणे सोपे नव्हते. साखळी गटात सातत्यपूर्ण कामगिरी करीत भारतीय संघाने बाद फेरी निश्चित केले. बाद फेरीत त्यांनी स्पेनला नमविल्यानंतर उपांत्य फेरीत भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. या सामन्यात दोन्ही संघांनी सर्वोत्तम हॉकीचा प्रत्यय घडविला. पूर्ण वेळेतील बरोबरीनंतर टायब्रेकरद्वारा भारताने कांगारूंना नमविले. त्यामध्ये सिंहाचा वाटा गोलरक्षक विकास दहिया याचा होता. त्याने पूर्ण वेळेत व टायब्रेकरमध्येही सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळेच भारतीय संघास ऑस्र्ट्ेलियाची मक्तेदारी संपविण्यात यश मिळाले. ऑस्ट्रेलियाचा हॉकी क्षेत्रात बराच बोलाबाला आहे. वरिष्ठ गटात त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने वरिष्ठ व कनिष्ठ गटात त्यांचे वर्चस्व मोडून काढले आहे. कनिष्ठ गटात जर्मनीने आतापर्यंत सहा वेळा विश्वचषक जिंकला आहे. बेल्जियमने त्यांना उपांत्य फेरीत टायब्रेकरद्वारा पराभूत करीत जर्मनीची मक्तेदारी संपविली. जर्मनी व ऑस्ट्रेलिया यांच्यासह अन्य काही देशांची हॉकीत बरीच वर्षे सत्ता होती. ही सत्ता मोडून काढण्यात भारत व बेल्जियम यांना यश मिळाले आहे.

बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात भारताची बाजू वरचढ होती. तरीही बेल्जियम संघाकडून आश्चर्यजनक कामगिरी केली जाण्याची शक्यता होती. बेल्जियमचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता व भारतास यजमानपदाचा लाभ होता. याचेच दडपण त्यांच्या खेळभांडूंनी घेतले होते. पूर्वार्धात त्यांची देहबोली त्याचाच प्रत्यय देत होती. भारतीय संघाने पूर्वार्धात त्याचा फायदा घेत दोन गोल केले. हे दोन गोल बेल्जियमच्या खेळाडूंसाठी खूपच क्लेशदायक ठरले. बेल्जियमच्या खेळाडूंना सूर गवसला, मात्र तोपर्यंत भारताचा विजय निश्चित झाला होता. पेनल्टी कॉर्नर ही गोल करण्यासाठी सुवर्णसंधी मानली जात असते. तथापि अजूनही भारतीय खेळाडूंमध्ये त्याबाबत कमकुवतपणा दिसून येत आहे. बेल्जियमने या स्पर्धेत पेनल्टी कॉर्नरद्वारा एकही गोल स्वीकारलेला नाही. हे त्यांच्या भक्कम बचावाचे प्रतीक आहे. भारतीय संघाने हा सामना किमान तीन-चार गोलांच्या फरकाने जिंकायला पाहिजे होता. मात्र उत्तरार्धात त्यांनी बराच वेळ बचावात्मक खेळावरच भर दिला होता. सातत्याने आक्रमण करणे हादेखील बचावाचा एक भाग मानला जातो. दुर्दैवाने भारतीय खेळाडूंनी उत्तरार्धात हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवीत खेळ केला नाही. सामन्याच्या शेवटच्या वीस सेकंदांमध्ये त्यांनी एक गोल स्वीकारला. हाच गोल जर अगोदर झाला असता तर कदाचित बेल्जियमने आणखी एखादा गोल करीत सामन्यास कलाटणी दिली असती. अंगावर सामना ओढवून घेणे ही भारतीय खेळाडूंची खासियतच आहे. दोन-तीन गोलांची आघाडी असतानाही सामना गमावण्याचे प्रसंग अनेक वेळा भारतीय संघावर आले आहेत. पर्यंत सामन्यावर आपली पकड ठेवण्यात भारतीय खेळाडू कमी पडतात. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी भारतीय संघाची बांधणी करताना या उणिवा दूर करण्याची आवश्यकता आहे. मेजर ध्यानचंद यांच्या काळात निर्माण केलेले सुवर्णयुग पुन्हा आणण्याची संधी भारतीय खेळाडूंना आहे. त्यासाठी दूरगामी नियोजन, स्पर्धात्मक सराव, उत्तम शारीरिक तंदुरुस्ती व भक्कम मनोधैर्य निर्माण करण्याबाबत भारतीय खेळाडूंनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com