देशाला मातब्बर क्रिकेट खेळाडू देणाऱ्या रणजी करंडक स्पर्धा या वर्षी सर्वार्थाने वेगळ्या ठरल्या. गुजरातने जेतेपदाला गवसणी घालणे, झारखंड अंतिम फेरीत पोहोचणे यासह अनेक गोष्टी या वेळी वैशिष्टय़पूर्ण होत्या.
रणजी करंडक स्पर्धेसाठी यंदाचे वर्ष फार महत्त्वाचे आणि बरेच काही देणारे ठरले. मुंबईसारख्या मातब्बर संघाला नमवत गुजरातने पहिल्यांदाच जेतेपद पटकावले. जेतेपदाची नवलाई गुजरातने अनुभवली. पहिल्यांदाच झारखंडसारखा लहान संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. रणजी स्पर्धेचे सामने पहिल्यांदाच त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रयोग करण्यात आला. यावेळची स्पर्धा चांगली रंगतदार ठरली आणि बऱ्याच सामन्यांचे निकाल लागले. लोढा समितीच्या निर्णयामुळे आता यापुढे रणजी स्पर्धेत कोणते महत्त्वपूर्ण बदल होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
गुजरातसाठी हे वर्ष अद्भुत असेच होते. स्पर्धेपूर्वी सारेच जेतेपदाचे स्वप्न पाहतात, पण ते प्रत्यक्षात उतरेल की नाही, याबाबत गुजरातच्या खेळाडूंनाही शाश्वती नसावी. पार्थिव पटेलच्या नेतृत्वाने कमाल केली. यष्टिरक्षण तर तो चांगले करत होताच, पण फलंदाजीमध्ये वेळेला तो संघासाठी धावून येताना दिसला. अंतिम फेरीचेच उदाहरण घ्या. गुजरातला विजयासाठी ३१२ धावांची गरज होती. शंभर धावांमध्येच तीन फलंदाज बाद झाले होते. या परिस्थितीत मुंबईसारखा संघ समोर असताना पार्थिव खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला. तो फक्त नांगर टाकून उभा राहिला नाही तर त्याने संघाला विजयही मिळवून दिला. अंतिम फेरीच्या पहिल्या डावातही त्याने ९० धावांची खेळी साकारल्यामुळेच गुजरातला पहिल्या डावात आघाडी घेता आली होती. आघाडीच्या जोरावर ते विजयी ठरू शकले असते. पण फक्त त्याच गोष्टीवर विसंबून न राहता गुजरातने सामना जिंकला. ही या स्पर्धेतील सर्वात सकारात्मक गोष्ट आहे. कारण आतापर्यंत रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत बऱ्याचदा कोणताही संघ हा पहिल्या डावातील आघाडी घेण्यावरच धन्यता मानायचा. पण गुजरातने एक नवीन पायंडा पाडला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गुजरात पहिल्या डावात पिछाडीवर होता. पण दुसऱ्या डावात त्यांच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी जी कामगिरी केली त्याला तोडच नव्हती. युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तर दुसऱ्या डावात सहा बळी मिळवत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
पार्थिवला यावेळी संघातील खेळाडूंची सुयोग्य साथ लाभली. एक कर्णधार म्हणून पार्थिव चांगले नेतृत्व करतच होता. पण त्याला खेळाडूंची साथ लाभल्यामुळेच गुजरातला जेतेपद पटकावता आले. प्रियांक पांचाळ हा या वर्षांत जबरदस्त फॉर्मात होता. या स्पर्धेत तो एकमेव हजारी मनसबदार. १० सामन्यांमध्ये पाच शतके, चार अर्धशतकांच्या जोरावर त्याने तब्बल १३१० धावा केल्या. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती ती नाबाद ३१०. गुजरातच्या समित गोहेलने तर नाबाद ३५९ धावांची खेळी साकारून विक्रमच केला. त्याच्या या खेळीमुळे संघाचे मनोबल कमालीचे उंचावले आणि त्यापाठोपाठ त्यांनी एकामागोमाग एक विजय मिळवायला सुरुवात केली. समितनेही या मोसमात ९१४ धावा केल्या.
मुंबईचा संघ या मोसमात पूर्वीसारखा ‘खडूस’ वगैरे नक्कीच नव्हता. धवल कुलकर्णी, अखिल हेरवाडकर आणि सिद्धेश लाड दुखापतींनी त्रस्त होते. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे दोघे देखील जायबंदी होते. त्याचबरोबर एकाही खेळाडूला स्पर्धेत सातत्य राखता आले नाही. श्रेयस अय्यर (७२५ धावा) आणि सूर्यकुमार यादव (७१५ धावा) यांनी या मोसमात प्रत्येकी सातशे धावांचा पल्ला पार केला खरा, पण त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. कर्णधार आदित्य तरेने संघाची कमान चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोदेखील कामगिरीत सातत्य दाखवू शकला नाही. अभिषेक नायरचा अष्टपैलूपणा हा शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अधिक जाणवला. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यावेळी लयीत नव्हता. त्यामुळे गोलंदाजीची कमान सांभाळण्याची जबाबदारी अभिषेकवर येत होती, हे एकप्रकारे दुर्दैवच म्हणावे लागेल. मुंबईकडे दुसरा वेगवान गोलंदाज नसावा, ही गोष्ट वाईटच. दुसरी गोष्ट म्हणजे विजय गोहिल, तुषार देशपांडे, पृथ्वी शॉसारखे चांगले युवा खेळाडू मुंबईला यावर्षी मिळाले. मुंबईचा एकही गोलंदाज पहिल्या ३५ क्रमांकांमध्ये नव्हता, कदाचित अशी बाब पहिल्यांदाच घडली असावी. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत मुंबईचा फिरकीपटू गोहिल हा संयुक्तरीत्या ३६ व्या स्थानावर होता. गेल्या काही मोसमांत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत शार्दुल पहिल्या पाच जणांमध्ये नक्कीच असायचा. तो या मोसमात संयुक्तरीत्या ३६ व्या स्थानावर फेकला गेला. मुंबईसाठी ही फार वेदनादायी गोष्ट असेल. पण मुंबई क्रिकेट असोसिएशन या गोष्टीकडे लक्ष देणार का, हा कळीचा मुद्दा आहे. मुंबईने वेगवान गोलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांना घेऊन एक योजना आखली आहे, त्यामधून नेमके किती वेगवान गोलंदाज मुंबईला मिळाले किंवा भविष्यात मिळतील, याचे उत्तर संघटनेने द्यायला हवे. मुंबईची संघटना सर्वात जास्त स्थानिक स्पर्धा खेळवत असल्याच्या गमजा मारत फिरते, पण त्यांच्या रणजी संघाच्या दयनीय अवस्थेचे काय? याचा विचार त्यांनी सर्वप्रथम करायला हवा.
झारखंडसारख्या लहान शहरातून महेंद्रसिंग धोनीसारखा जगज्जेता कर्णधार भारताला मिळाला खरा, पण त्याच्या संघाने रणजी स्पर्धेत यापूर्वी कधीही लक्षवेधी कामगिरी केलेली नव्हती. पण या वर्षी शाहबाज नदीमच्या नेतृत्वाच्या जोरावर झारखंडने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. नदीमने कर्णधाराला साजेशी कामगिरीही केली. या मोसमात सर्वाधिक बळी मिळवण्याचा मान नदीमने पटकावला, या मोसमात त्याने ५६ बळी मिळवले. यामध्ये एका डावात पाच बळी मिळवण्याची किमया त्याने चार वेळा साधली, तर सामन्यात दहा बळी दोनदा मिळवले. त्याचबरोबर इशांक जग्गी आणि इशान किशन यांनी झारखंडच्या फलंदाजीची बाजू समर्थपणे पेलवली. इशांकने या मोसमात ८९० तर इशानने ७९९ धावा केल्या. या वर्षांतील कामगिरीमुळे त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल, याचा फायदा त्यांना पुढच्या मोसमात नक्कीच होऊ शकतो.
भारतीय संघात जाण्याचा मार्ग आयपीएल स्पर्धेतून जातो, असे सध्या म्हटले जाते. पण भारताला करुण नायरसारखा दुसरा त्रिशतकवीर गवसला तो रणजी स्पर्धेतूनच. या मोसमात डावखुरा जिगरबाज फलंदाज युवराज सिंगकडून चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय संघात पुनरागमन करण्याचे युवराजचे लक्ष्य होते. त्यासाठी युवराजने रणजी स्पर्धेचा मार्ग निवडला. या स्पर्धेत त्याने पाच सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन शतके आणि अर्धशतकांच्या जोरावर ६७२ धावा जमवल्या, यावेळी त्याची सरासरी होती ती ८४.०० एवढी.
त्रयस्थ ठिकाणी रणजी स्पर्धा खेळवण्याचा प्रयोग यावर्षी करण्यात आला आणि तो सपशेल अपयशी ठरला. कारण एकाही सामन्याला गर्दी पाहायला मिळाली नाही, रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीकडेही चाहते जास्त फिरकले नाहीत. सध्याची पिढी ही आयपीएलच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. त्यांना रणजी स्पर्धेचे महत्त्व तेवढे वाटत नसावे. त्यामुळे वर्षभरापूर्वी जेव्हा रणजी सामने घरच्या मैदानावर व्हायचे तेव्हा हातावर मोजण्याइतकेच प्रेक्षक उपस्थित असायचे. ही प्रेक्षकसंख्या वाढायला हवी, यासाठी बीसीसीआयने प्रयत्न करणे गरजेचे होते. पण त्रयस्थ ठिकाणी सामन्यांचे आयोजन केल्यामुळे चाहत्यांची संख्याही रोडावली. त्रयस्थ ठिकाणी खेळल्यामुळे संघांना घरच्या मैदानाचा, खेळपट्टीचा फायदा होणार नाही, ही गोष्ट मान्य. पण स्पर्धेचा सर्वागिण विचार बीसीसीआयने करायला हवा.
लोढा समितीमुळे बीसीसीआय आणि स्थानिक संघटनांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. सर्वच संघटनांमधील संस्थाने खालसा झाली आहेत. एक राज्य एक मत, ही लोढा समितीची सर्वात महत्त्वाची शिफारस आहे. या शिफारशीमुळे मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यापैकी एकालाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे ही शिफारस स्थानिक संघटनांसाठी अडचणीची आहे. पण लोढा समितीने यापुढे एक राज्य, एक संघ अशी शिफारस केली तर काय होईल, याचा अंदाज लावता येत नाही.
एकंदरीत, या रणजीच्या मोसमात बऱ्याच नव्या गोष्टी घडल्या, त्या आनंददायी आणि सकारात्मक आहेत. त्यामुळे ही नवलाई चिरंतन रहावी, एवढीच आशा दर्दी क्रिकेटप्रेमी करत असतील.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com