रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकला हरियाणा सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बुधवारी केली. रिओहून बुधवारी सकाळी साक्षी हरियाणात आली. बहादूरगड येथे राज्य सरकारने स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी मुख्यमंयांनी साक्षीला २.५ कोटी रूपयांचा चेक प्रदान केला.
पदक पटकावल्यानंतर प्रथमच हरियाणा येथे आलेल्या साक्षीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी साक्षीने चाहत्यांच्या प्रोत्साहनामुळेचे आपल्याला यश मिळाल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी साक्षी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तसेच ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती चौथी महिला खेळाडू ठरली. या पूर्वी वेटलिफटर कर्णम मल्लेश्वरी (२०००, सिडनी), बॉक्सिंगपटू एम. सी. मेरीकोम (२०१२ लंडन), बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल (२०१२, लंडन) यांनी पदक मिळवून दिले आहे. २३ वर्षीय साक्षीने २०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्य तर आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते.
यापूर्वी हरियाणा सरकारने अभिनेत्री परिणिता चोप्राला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली होती. परंतु हे वृत्त निराधार ठरले होते. त्यावेळी महिला व बाल विकास कविता जैन यांना याबाबत खुलासा करावा लागला होता.

Story img Loader