सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत भारतात पहिल्यांदा ‘डीआरएस’चा अवलंब होत आहे. वास्तविक आपल्या अनुभवी क्रिकेट खेळाडूंनी ‘डीआरएस’ तंत्रज्ञानाला विरोध केला होता. पण त्या विरोधामागची कारणं नीट समजून न घेताच आता त्याचा पुन्हा वापर सुरू झाला आहे.

खेळ हा पूर्वी फक्त मनोरंजनासाठी खेळला जायचा. कालांतराने खेळामध्ये व्यावसायिकता आली. त्यानंतर खेळ अधिक व्यावसायिकतेकडे झुकू लागला. गोलंदाजीमध्ये चेंडूचा अचूक टप्पा. फलंदाजीमध्ये अचूक फटका, त्यासाठीचे पदलालित्य, त्यासाठीचे टायमिंग, ताकद, या साऱ्यांचे अचूक यांत्रिक मिश्रण व्हायला सुरुवात झाली. क्षेत्ररक्षणाच्या जागाही अचूक व्हायला लागल्या. हे सारे यांत्रिक होत असले तरी यामध्ये यंत्र मोठय़ा प्रमाणात वापरले जात नव्हते. चाहत्यांना त्याचा अंदाजही नव्हता. सारेच अचूकतेच्या जवळ जात असताना पंचांचे निर्णय काहींना चुकीचे वाटू लागले. सारे काही यांत्रिक होत असताना पंचांच्या निर्णयाबाबतही अचूकता यायला हवी, हे ठरवले गेले आणि पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याची प्रणाली म्हणजेच ‘डीआरएस’ सर्वासमोर आले. पण त्यानंतर खेळात किती तांत्रिक गोष्टींची, तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी, हा प्रश्न ऐरणीवर आहे.

वर्ष २००८. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार होता आणि प्रायोगिक तत्त्वावर या मालिकेत ‘डीआरएस’ वापरण्याचे ठरवले गेले. दोन्ही संघांसाठी हा नवीनच अनुभव होता. पण ‘डीआरएस’ कसा वापरावा याचा अभ्यासच भारताने केला नव्हता. त्यामुळे नेमका ‘डीआरएस’ कधी वापरावा आणि कधी नाही, याचा योग्य निर्णय घेणे भारतीय संघाला जमले नाही. तब्बल २१ ‘डीआरएस’पैकी फक्त एकच निर्णय भारतासाठी यशस्वी ठरला, तर दुसरीकडे श्रीलंकेा संघ ४० टक्के ‘डीआरएस’च्या निर्णयामध्ये अचूक ठरला होता. भारताचा तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा ‘डीआरएस’चा पहिला बळी ठरला. त्यानंतर भारताने ‘डीआरएस’चा धसकाच घेतला.

‘डीआरएस’मध्ये हॉक-आय, हॉट स्पॉट, स्निकोमीटर, बॉल ट्रॅकिंग या गोष्टींचा अवलंब केला जातो. पण तंत्रज्ञान एवढे प्रगत असताना या गोष्टींपैकी एकही गोष्ट शंभर टक्के अचूक निर्णय देताना दिसत नाही. हॉक-आयमध्ये चेंडू कुठून आला, कुठे पडला आणि कुठे जाणार हे दाखवले जाते. पण यामध्ये चेंडू किती अंशांमध्ये फिरून कुठे जाऊ शकतो, याचे आकलन तंत्रज्ञानाला करता कसे येऊ शकते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हॉट स्पॉटमध्ये चेंडू नेमका कुठे लागला, पॅडवर किंवा बॅटवर हे दाखवले जाते. काही वर्षांपूर्वी व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने हॉट स्पॉटबाबत एक प्रयोग करून पाहिला आणि हे तंत्रज्ञान किती फसवे आहे, हे त्याने दाखवून दिले. बॅटवर जर ग्रीस लावले तर हॉट स्पॉटचा काहीही उपयोग होऊ शकत नाही, हे लक्ष्मणने दाखवून दिले आणि हॉट स्पॉटवरचा लोकांचा विश्वास उडाला. स्निकोमीटरमध्ये चेंडू बॅटला लागला आहे की नाही हे दाखवले जाते, तर बॉल ट्रॅकिंग सिस्टीममध्ये चेंडूच्या एकंदरीत प्रवासाचा अभ्यास केला जातो. सध्याच्या घडीला या दोन गोष्टींवरच लोकांचा विश्वास आहे.

भारताने श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘डीआरएस’सा विरोध केला होता. अगदी महेंद्रसिंग धोनीनेही. कारण या तंत्रज्ञानावर त्याचाही विश्वास नव्हता. पण तो कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि भारताने ‘डीआरएस’ अवलंब करण्याची संधी साधली. यासाठी फक्त धोनीची निवृत्ती हे कारण नक्कीच नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी अनिल कुंबळे हे आयसीसीच्या क्रिकेट समितीवर होते. त्या वेळी त्यांनी ‘डीआरएस’च्या संदर्भात काही माहिती मागवून त्यावर काम केले होते. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षपद स्वीकारल्यावर कुंबळे यांनी कसोटी कर्णधार कोहली आणि बीसीसीआय यांना ‘डीआरएस’बद्दल माहिती देत, हे तंत्रज्ञान किती चांगले आहे हे सांगत स्वीकारण्यास भाग पाडले किंवा गळी उतरवले, हे ते जाणो. सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत भारतात पहिल्यांदा ‘डीआरएस’चा अवलंब होत आहे. या मालिकेच्या राजकोटच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावातील पहिल्याच बळीनंतर ‘डीआरएस’चा विषय चघळला गेला. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पंचांनी त्याला बाद दिले. पण त्याला हा निर्णय योग्य वाटत नव्हता. तो पहिलाच सामना खेळणारा आणि मैदानात त्याचा सहकारी असलेला असीब हमीदला याबाबत विचारले. तो याबाबत स्पष्ट मत देऊ शकला नाही. त्याचा हा पहिलाच सामना होता. तो गोंधळलेला असू शकेलही. पण कुकला या वेळी ‘डीआरएस’ वापरणे उचित वाटले नाही आणि तो तंबूत परतला. पण त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने रिप्ले पाहिल्यावर कुक नाबाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर हमीदला पंचांनी बाद दिल्यावर मात्र त्याने ‘डीआरएस’चा वापर करण्याचे ठरवले आणि त्याचा तो निर्णय चुकला. ‘डीआरएस’चा अवलंब करीत तो बाद असल्याचेच दिसून आले. ‘डीआरएस’ नेमका कसा वापरला जावा, हादेखील अभ्यास यापुढे संघांना करावा लागेल.

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका मालिका सुरू होती. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ फलंदाजी करत होता. त्यावेळी फिरकीपटूला मोठा फटका मारण्याच्या नादात तो ‘क्रिस’ सोडून पुढे आला आणि चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जोरदार अपील केले आणि पंच अलीम दार यांनी त्याला बाद ठरवले. आपण बाद नसल्याची हमी स्मिथला होती, त्यामुळे त्याने ‘डीआरएस’चा अवलंब करण्याचे ठरवले. त्यावेळी ‘स्निकोमीटर’मध्ये चेंडू स्मिथच्या बॅटला लागल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पण पंचांचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून देत स्मिथ अखेर बाद असल्याचेच सांगण्यात आले. त्यावेळी मैदानात स्मिथ तर भडकलाच, पण माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नने ‘डीआरएस’वर खडसून टीका केली. जर पंचांचा निर्णय डावलून आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यावरही चुकीचे निर्णय दिले जात असतील तर वॉर्नचे त्यामध्ये काही चुकले नाहीच. वॉर्नच्या पिढीतील भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह साऱ्याच खेळाडूंनी ‘डीआरएस’ला विरोध केला होता. या अनुभवी खेळाडूंकडे ‘डीआरएस’ला विरोध करण्याची योग्य कारणेही होती. पण ही पिढी निवृत्त झाल्यावर ‘डीआरएस’चे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

‘तंत्रज्ञान हे पंचांच्या मदतीसाठी असायला हवे, त्यांचा निर्णय बदलण्यासाठी नाही,’ असे चोख मत ‘डीआरएस’बाबत पंच सायमन टॉफेल यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. तंत्रज्ञानाचा सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये एवढा सर्रास वापर केला जात आहे की, मैदानावर पंचांना का ठेवावे, हा प्रश्न पडायला लागला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करायला हवाच, पण ते शंभर टक्के अचूक व्हायला हवे. पण ‘डीआरएस’बाबत हवे तसे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले नाही. तंत्रज्ञानाच्या जोरावर खेळ अधिक यांत्रिक झाला आहे. अचूकतेच्या मागे लागून खेळाचा आत्मा हरवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानानुसार बदल व्हायला हवा, त्याला कुणाचाच विरोध नसावा. पण त्यामुळे खेळाला बाधा होऊ नये.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader