न्यूयॉर्कमध्ये झालेल्या यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धाचे वैशिष्टय़ म्हणजे नव्या विजेत्यांचा उदय. प्रदीर्घ कालावधीनंतर रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे यांनी नव्हे तर नव्या खेळाडूने जेतेपदाचा चषक उंचावला. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सचा झंझावात अँजेलिक कर्बरने रोखला.
ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिसविश्वाचा मानबिंदू. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा वर्षांतली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा. न्यू यॉर्कमध्ये यंदा रंगलेल्या टेनिस मैफलीचे वैशिष्टय़ म्हणजे नव्या विजेत्यांचा झालेला उदय. प्रदीर्घ कालावधीनंतर रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे यांच्याव्यतिरिक्त नव्या खेळाडूने जेतेपदाचा चषक उंचावला. उपजत गुणवत्तेला सातत्याची जोड देणाऱ्या वॉवरिन्का आणि कर्बर यांनी नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली आहे. भारतीयांसाठी आश्वासक फारसं काही नाही. परंतु दोन आठवडे घरबसल्या दर्जेदार टेनिसची पर्वणी झाली हे नक्की!
वॉवरिन्काची बाजी
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ काळ वावरत असलेल्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचला नमवत अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या पहिल्या तर कारकीर्दीतील तिसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले. भक्कम शरीरयष्टी, खास ठेवणीतला बॅकहँड, भरपूर वेळ चालणाऱ्या सामन्यांसाठी लागणारी शारीरिक कणखरता यामुळे वॉवरिन्काला हरवणे नेहमीच कठीण असते. मात्र सातत्याचा अभाव, एकाग्रता हरवल्यामुळे खेळातली अचूकता हरपणं आणि मानसिकदृष्टय़ा कणखर नसल्याने वॉवरिन्काचे अनेक विजय प्रतिस्पध्र्यानी हिरावून घेतले आहेत. भारतात चेन्नई येथे होणाऱ्या एकमेव एटीपी स्पर्धेची अनेक जेतेपदं वॉवरिन्काच्या नावावर आहेत. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच या जेतेपदांवर मक्तेदारी राखणाऱ्या त्रिकुटाच्या दबदब्यातही वॉवरिन्काने स्वत:चे असे स्थान निर्माण केले. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी असा त्याचा ग्रँड स्लॅम स्पर्धातला प्रवास असे. जेतेपदाच्या इतक्या समीप येऊनही वॉवरिन्का उपेक्षितच राहत असे. मॅग्नस नॉर्मन या गुरूच्या मार्गदर्शनाखाली खेळताना वॉवरिन्काने जेतेपदाची कमाई केली. शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या खेळात वॉवरिन्काने ३१व्या वर्षी पटकावलेले जेतेपद कौतुकास्पद आहे. दिग्गजांना टक्कर देण्यासाठी स्वत:ची क्षमता वाढवून अतिरिक्त प्रयत्न करणे आवश्यक असते. अमेरिकन खुल्या स्पर्धेत वॉवरिन्काने प्रत्येक लढतीत स्वत:ला सिद्ध केलं. न्यू यॉर्कमधल्या उष्ण आणि आद्र्र वातावरणात तीन ते चार तासांचा सामना खेळणं आणि जिंकणं सोपं नाही. पण वॉवरिन्काने जिद्द जोपासली. यंदा जोकोव्हिचचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास निवांत असाच झाला. दुखापतीमुळे प्रतिस्पध्र्यानी माघार घेतल्यामुळे अवघे सात तास कोर्टवर व्यतीत करून जोकोव्हिच अंतिम फेरीत पोहोचला. दुसरीकडे वॉवरिन्काने अंतिम फेरीपर्यंत जवळपास १८ तास कोर्टवर व्यतीत केले होते. वॉवरिन्काची प्रत्येक लढत पूर्ण झाली. उपांत्य फेरीत जपानच्या केई निशिकोरीविरुद्धच्या लढतीत तर वॉवरिन्काचे कौशल्य पणाला लागले. आळसावलेला वाटणारा आणि लय गवसण्यासाठी वेळ घेणारा वॉवरिन्का ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावू शकेल का याविषयी टेनिसतज्ज्ञांना खात्री नव्हती. प्रत्येक व्यक्तीचं जगण्याचं एक तत्त्व असतं. स्वत:च्या मर्यादांची जाणीव असलेला माणूस मोठी झेप घेऊ शकतो. वॉवरिन्काच्या डाव्या हातावर प्रसिद्ध साहित्यकार सॅम्युअल बेकेट यांचं वाक्य टॅटू केलं आहे. ‘एव्हर ट्राइड, एव्हर फेल्ड. नो मॅटर. ट्राय अगेन. फेल अगेन. फेल बेटर’. वॉवरिन्काच्या कारकीर्दीला हे वाक्य चपखलपणे लागू होतं. फरक एवढाच की सातत्याने प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या वॉवरिन्काच्या नावावर आता तीन ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत. फळाची अपेक्षा न धरता कर्म करत राहणे आपले काम या आपल्या संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वॉवरिन्का चिवटपणे लढत राहिला. तिशीनंतरचा काळ टेनिसपटूंसाठी खडतर होत जातो. शरीराच्या हालचाली मंदावू लागतात, दुखापतींनी वेढा दिलेला असतो, प्रतिस्पध्र्याना तुमच्या खेळातल्या उण्या गोष्टींची माहिती झालेली असते. पण वॉवरिन्का तिशीनंतर झळाळून निघाला आहे. पराभवाच्या असंख्य चटक्यांतून पोळलेला वॉवरिन्का आता विजेता आहे. फेडरर, नदाल, जोकोव्हिचप्रमाणे खेळलेली प्रत्येक स्पर्धा जिंकायला मी दिग्गज नाही असे वॉवरिन्का स्पष्ट करतो. मी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. कोण काय म्हणतंय याकडे माझं लक्ष नसतं ही वॉवरिन्काची मनोवृत्ती त्याच्या जिंकण्याचं गुपित आहे. त्याच्या यशाने दुसऱ्या फळीतल्या उपेक्षित खेळाडूंना प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.
कर्बरची कमाल!
महान खेळाडू सेरेना विल्यम्सचा अपवाद वगळता महिला टेनिस सातत्यपूर्ण असातत्यासाठी ओळखले जाते. प्रत्येक स्पर्धेगणिक नवीन रंगीबेरंगी पोशाख, त्याला साजेशी आभूषणं, पादत्राणे यासाठी महिला टेनिस प्रसिद्ध आहे. प्रतिभाशाली खेळाडू असूनही सातत्याची जोड देता न आल्याने मानांकित महिला खेळाडूंना प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागणं हेही नित्याचं. सेरेना विल्यम्सने मात्र गेले दशकभर जेतेपदे, विक्रम आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान यांच्यावर मक्तेदारी राखली. मात्र अन्य खेळाडूंना सेरेनाच्या निम्म्याइतके सातत्यही जपता आले नाही. मात्र यंदाच्या वर्षांत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने सेरेनाकडून प्रेरणा घेत ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये आपल्या नावाचा दबदबा राखला. सेरेनालाच नमवत अँजेलिकने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. विम्बल्डन स्पर्धेतही अँजेलिकने अंतिम फेरी गाठली होती. भन्नाट सूर गवसलेल्या अँजेलिकने अमेरिकन स्पर्धेतही धडाकेबाज खेळ करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीपर्यंत अँजेलिकने एकही सेट न गमावता आपल्या प्रभुत्वाची प्रचीती दिली. अंतिम लढतीत खणखणीत सव्र्हिस आणि ताकदवान फोरहँडच्या फटक्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कॅरोलिन प्लिसकोव्हाला नमवत अँजेलिकने जेतेपदाची कमाई केली.
कठोर व्यावसायिक खेळ, प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास करून ठरवलेली रणनीती, मॅरेथॉन लढतीला साजेशी शारीरिक कणखरता या गुणवैशिष्टय़ांच्या बळावर अँजेलिकने जेतेपद आपलेसे केले. सातत्य या जर्मन संस्कृतीच्या विशेषणाला जागत कर्बरने यंदाच्या वर्षांतल्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई केली. वर्षभरातील ग्रँड स्लॅम आणि अन्य स्पर्धामधील सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर अँजेलिकचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब झाले. दोन ग्रँड स्लॅम जेतेपदे आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान या दुहेरी यशासह कर्बरने सेरेनाची सद्दी संपुष्टात आणली आहे.
या यशासाठी अँजेलिकने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. गेल्याच वर्षी वर्षांतील पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अँजेलिकला सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरं जावं लागलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल झाल्यापासून चार वर्षांत ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिचा असा पराभव कधीच झाला नव्हता. पण हार क्रीडापटूंच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, हे मनावर बिंबवून तिने अँटवर्प, दुबई इथल्या स्पर्धा खेळल्या. पण तिचे प्राथमिक फेरीतूनच पॅकअप झाले. अनपेक्षित अशा पराभवांच्या मालिकेने अँजेलिकच्या मनावर विपरीत परिणाम झाला. मोठय़ा मेहनतीने तिने जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये धडक मारली होती. सलग तीन स्पर्धातील सुमार कामगिरीमुळे क्रमवारीतून अव्वल दहामधून तिची घसरण झाली. सगळे डावपेच अयशस्वी ठरत होते. मन रिझवण्यासाठी पोलंडमधल्या मूळ गावीही गेली. तिने टेनिससाठी कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. कौटुंबिक सोहळ्यांना फाटा दिला होता. हे सगळं ज्यासाठी केलं त्याच खेळात असा कटू अनुभव आल्याने अँजेलिक सैरभैर झाली. याच अगतिकतेने तिने दोन इमेल केले. एक होता अमेरिकेतल्या नेवाडे इथल्या टेनिस अकादमीचे प्रमुख डॅरेन काहील यांना. शिबिरादरम्यान टेनिस कोर्टच्या उपलब्धतेसाठी विचारणा करणारा तो मेल होता. दुसरा इमेल केला थेट स्टेफी ग्राफ. जिला आदर्श मानून कारकीर्दीला सुरुवात केली अशा स्टेफीलाच मेल केला. अँजेलिकच्या शब्दातलं सच्चेपण जाणवल्याने स्टेफीने थेट फोन केला. मार्गदर्शनासाठी कधी आणि कुठे भेटायचं असं विचारलं. महान खेळाडू असूनही स्टेफीच्या नम्रपणाने अँजेलिक भारावली. पुढचे तीन दिवस अँजेलिकने स्वत:ला स्टेफीच्या हवाली केलं. तिच्या प्रत्येक बारीकसारीक प्रश्नांना स्टेफीने उत्तर दिलं. अँजेलिक गुणवान होतीच; पण मनात आणि मेंदूत तयार झालेला अडथळा दूर करणाऱ्या गुरूची आवश्यकता होती. स्टेफीच्या रूपात अँजेलिकला तो गुरू गवसला. अस्वस्थता दूर झाली आणि निरभ्र आकाश साद घालू लागलं. पायाभूत पातळीवर प्रशिक्षणात माहीर टोरबेन बेल्टझ यांच्या कायमस्वरूपी मार्गदर्शनाखाली अँजेलिकने खेळायला सुरुवात केली. स्टेफीचे आश्वासक शब्द, बेल्ट्झ यांचे सखोल मार्गदर्शन आणि अँजेलिकच्या अथक मेहनतीचा परिणाम वर्षभरातच दिसून आला. वर्षभरापूर्वी ज्या स्पर्धेतून तिला सलामीच्या लढतीतून परतावे लागले होते. त्याच स्पर्धेचे जेतेपद वर्षभरात तिने नावावर केले. जोरकस आणि अचूक फटके अँजेलिकचे वैशिष्टय़ आहे. स्वत:ची सव्र्हिस राखण्यासाठी आणि प्रतिस्पध्र्याची सव्र्हिस भेदण्यासाठी कोर्टवर र्सवकष वावर अनिवार्य असतो. अफलातून तंदुरुस्तीच्या जोरावर संपूर्ण कोर्टवर वावर अँजेलिकची खासियत आहे. एखाद्या गुणासाठी जिवाचे रान करण्याची तिची वृत्ती अंतिम लढतीतही प्रत्ययास आली. सामन्यादरम्यान नकारात्मक विचारांची गर्दी झाल्याने कर्बरने कारकीर्दीत अनेक सामने गमावले आहेत. मात्र योग्य मार्गदर्शकांमुळे कणखर झालेल्या अँजेलिकने अजोड मानसिक कणखरता सिद्ध करत जेतेपद पटकावले. प्रदीर्घ काळानंतर महिला टेनिसमध्ये सेरेनासदृश सातत्य अँजेलिकच्या रूपाने अनुभवायला मिळते आहे.
फेडरर, नदाल, मरेविना…
आधुनिक टेनिसचे शिलेदार म्हणजे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल. गेले दशकभर या द्वयीने ग्रँड स्लॅम जेतेपदांवर वर्चस्व राखले. या दोघांना टक्कर देत नोव्हाक जोकोव्हिच नावाचा तारा उदयास आला. वाढतं वय, दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे फेडरर आणि नदाल यांची जेतेपदांवरची हुकमत कमी होत गेली. त्याच वेळी शारीरिक व्याधींवर अनोख्या उपचारपद्धतीद्वारे मात करत जोकोव्हिचने जेतेपदांची टांकसाळच उघडली. जोकोव्हिचचा दबदबा कायम असतानाच इंग्लंडची आशा असलेल्या अँडी मरेने ग्रँड स्लॅम जेतेपद पदार्पण केले. सुरुवातीला फेडरर आणि नदालमध्ये विभागल्या जाणाऱ्या जेतेपदांमध्ये जोकोव्हिच हा नवा भागीदार वाढला. मरेचीही भर पडली. मात्र हे चौघेही ग्रँड स्लॅम स्पर्धाची किमान उपांत्य फेरी गाठतातच. यामुळे जेतेपद या चौघांपैकी कोणा एकाकडेच जातं. १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या मात्र तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी आतूर रॉजर फेडररने दुखापतींच्या ससेमिऱ्यामुळे यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाइतकंच खेळभावना जोपासणारा खराखुरा जंटलमन फेडरर खेळणार नसल्याने जगभरातल्या त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. तिशी ओलांडल्यानंतरही फेडरर लीलया किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत असे. यंदाच्या अमेरिकन स्पर्धेत फेडररची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली. दुखापतींनीच हैराण केल्याने राफेल नदालला बालेकिल्ल्यात अर्थात लाल मातीच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेतून आणि त्यानंतर विम्बल्डन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मात्र झुंजार वृत्तीच्या नदालने दुखापतींना टक्कर देत रिओ ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांसह दिमाखदार पुनरागमन केले. जुना नदाल परतला असं वाटत असतानाच नदालला अमेरिकन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. लंडनपाठोपाठ रिओमध्येही सुवर्णपदकावर कब्जा करणारा मरे जोकोव्हिचला आव्हान देणार असे चित्र होते. मात्र आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये आशियाई झेंडा रोवणाऱ्या जपानच्या केई निशिकोरीने मरेला नमवण्याची किमया केली. प्रदीर्घ कालावधीनंतर फेडरर, नदाल आणि मरे ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळताना दिसणार नाहीत.
साकेतरूपी आशा, बाकी निराशा
आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या साकेत मायनेनीने यंदाच्या अमेरिकन स्पर्धेत पात्रता फेरीचा खडतर टप्पा पार करत मुख्य फेरी गाठली. ग्रँड स्लॅम स्पर्धेत जगभरातल्या अव्वल खेळाडूंमध्ये साकेतने मिळवलेले स्थान प्रशंसनीय होते. दुहेरी प्रकारात भारतीय खेळाडू नेहमीच दमदार प्रदर्शन करतात. मात्र एकेरी प्रकारात आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे याची जाणीव प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धा करून देते. साकेतने मुख्य फेरी गाठत आश्वासक सुरुवात केली. सलामीच्या लढतीत साकेतसमोर चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लीचे आव्हान होते. अटीतटीचा ही लढत पाचव्या सेटपर्यंत गेली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये साकेतच आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत प्रवेशापासून अवघे काही क्षण दूर होता. मात्र शरीराने साथ सोडली. पायात गोळे आल्याने साकेतच्या हालचालींवर मर्यादा आल्या. त्यासाठी त्याने उपचारही घेतले. मात्र त्याने फरक पडला नाही. चिवट तंदुरुस्तीसाठी चेक प्रजासत्ताकचे खेळाडू ओळखले जातात. प्रचंड उष्ण आणि आद्र्र वातावरणातही जिरीने चिवटपणे खेळ करत दुखापतींनी बेजार साकेतवर मात केली. जगातल्या अव्वल खेळाडूला नमवण्याची नामी संधी साकेतकडे होती, मात्र तंदुरुस्तीच्या कारणास्तव साकेतचा पराभव झाला. दुहेरी प्रकारात नवीन साथीदारांसह खेळणारे सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा आणि लिएण्डर पेस यांना प्राथमिक फेऱ्यांतूनच गाशा गुंडाळावा लागला.
यंदाचे विजेते
पुरुष एकेरी – स्टॅनिसलॉस वॉवरिन्का
महिला एकेरी – अँजेलिक कर्बर
महिला दुहेरी – बेथानी मॅटेक सँड्स आणि ल्युसी साफारोव्हा
मिश्र दुहेरी – मेट पॅव्हिक आणि लौरा सिगमंड
पुरुष दुहेरी – ब्रुनो सोरेस आणि जेमी मरे
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com