‘सर, आज तो चुकला हे खरंय; पण एरवी तो एक चांगला मुलगा आहे.’ तुमच्या त्या शब्दांनी जाणवलं केवढा विश्वास दाखवला होतात तुम्ही माझ्यावर, आणि तेही माझ्या चुकीवर पांघरूण न घालता! तुमचा खूप अभिमान वाटला होता आणि दुसरीकडे जबाबदारी या शब्दाचा अर्थ नव्याने गवसला होता बाबा.’’ वडिलांनी पाठवलेल्या पत्राला मुलानं दिलेलं हे उत्तर.
प्रिय बाबास,
तुम्ही मला लिहिलेलं पत्र (प्रसिद्धी १४ नोव्हेंबर) वाचलं. त्या पत्राने मला पुन्हा एकदा भूतकाळात नेलं. तेरा वर्षांचा होतो मी तेव्हा.. दु:ख, खिन्नता या भावनांविषयी तुम्ही जे सांगितलं होतं ते सगळं आठवलं. एकदा बाथरूममध्ये पाय घसरून जोरात पडल्यामुळे मी रडत बसलो होतो; तेव्हा माझ्याजवळ येऊन तुम्ही म्हणाला होतात, ‘रडणं ही अत्यंत स्वाभाविक क्रिया आहे.’ आणि मग मला जवळ घेऊन, दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून द्यायला मला मदत केली होतीत.. आज मी १९ वर्षांचा आहे, पण तेव्हा तुम्ही समजावून सांगितलेल्या गोष्टी अगदी काल-परवा सांगितल्यासारख्या माझ्या लक्षात आहेत.
‘‘अश्रूंच्या मुळाशी शरीराला किंवा मनाला झालेली वेदना किंवा जखम कारणीभूत असते. ती दाबून टाकू नये. देव आपल्याहीपेक्षा खूप हुशार आहे. म्हणूनच बाळा त्याने आपल्याला डोळ्याखाली दोन अश्रुग्रंथी दिल्या आहेत’’, असं तुम्ही म्हणाला होतात. त्यावर मी तुम्हाला विचारलं होतं की, ‘‘मग इतरांना रडताना पाहून आपण अस्वस्थ का होतो? लगेच त्यांचं रडणं थांबवायला का धावतो?’’ माझ्या या प्रश्नावर किंचित हसून तुम्ही म्हणाला होतात, ‘‘माणूस हसत असेल तर आपण त्याचं हसणं थांबवतो का? मग रडणं थांबवायलाच का धावतो? रडण्याचा अधिकार इतरांनाही आहेच ना, त्यांच्याही डोळ्याखाली अश्रुग्रंथी आहेत..’’ असं म्हणून तुम्ही हसत हसत मला टोमणा मारला होतात. पण मला आवडलेलं तुमचं सर्वात चांगलं वाक्य कुठलं होतं माहितेय.. ‘‘जे लोक रडायला लाजत नाहीत किंवा अश्रूंना लपवत नाहीत तेच लोक मनसोक्त आणि सुंदर हसू शकतात. जे लोक आपलं दु:ख किंवा वेदनेला लोकलज्जेची तमा न बाळगता आणि त्याची
लाज वाटून न घेता स्वीकारतात ना तेच लोक मोकळेपणाने, खुलेपणाने हसण्याचा आनंद घेऊ शकतात.’’ तुमचं हे वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलंय.
अब्राहम लिंकनने त्यांच्या मुलाच्या वर्गशिक्षिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, ‘आपल्या अश्रूंची कधी लाज वाटून घेऊ नकोस हे तुम्ही माझ्या मुलाला अवश्य शिकवा.’ मी जेव्हा लिंकन याचं हे वाक्य वाचतो ना तेव्हा मला नेहमी तुम्ही सांगितलेली ती दोन वाक्यं आठवतात. एक म्हणजे वर लिहिलेलं आणि दुसरं म्हणजे ‘दु:ख ही सकारात्मक भावना आहे आणि नैराश्य ही त्याची नकारात्मक बाजू आहे.’
तुम्ही मोठे असूनही कधीच अश्रूंची लाज बाळगली नाही किंवा डोळ्यातून पाणी येईल म्हणून ते जबरदस्तीने लपवायचा प्रयत्न केला नाहीत. आजोबा गेले तेव्हा अश्रूंना वाट करून द्यायला तुम्ही मागे-पुढे पाहिलं नाही. त्यांना अखेरचा निरोप देताना तुम्ही सर्वासमक्ष रडला होतात ते मला आजही आठवतंय. त्या वेळी लोक काय म्हणतील असा विचार करून तुम्ही रडणं थोपवलं नाहीत. उलट त्या वेळी तुम्हाला रडताना पाहून तुमचे इतर डॉक्टर मित्र अस्वस्थ झाले होते आणि काय बोलावं ते त्यांना सुचत नव्हतं.
माझ्या शाळेतील बाई एकदा पुस्तकातील एक धडा शिकविताना अचानक वर्गात रडू लागल्या. बाईंनी वर्गात रडणं मला अजिबात आवडलं नव्हतं. आम्ही मुलांनी त्यांना बालिश ठरवलं होतं, पण तुम्ही आम्हाला म्हणाला होतात, ‘शिक्षक सर्वसामान्यांसारखा असणं चांगलंच. तुमच्या शिक्षिकेला रडू आलं हे त्या बाई सर्वसामान्य असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे धडा शिकविताना भूतकाळातील एखादी घटना आठवल्यामुळे त्यांना आलेलं रडू हे स्वाभाविक आहे.. त्यासाठी त्यांना मूर्ख ठरवायचं काहीच कारण नाही.’’ त्या दिवशी बाईंच्या यजमानांची पुण्यतिथी होती म्हणून त्यांना भावना अनावर झाल्या हे आम्हाला नंतर कळलं. त्या दिवशी मी एक धडा शिकलो की, रडणं ही खरोखरच अत्यंत स्वाभाविक आणि सर्वसामान्य भावना आहे.
माझी आई असो किंवा मग इतर कुणाची आई असो.. या आई मंडळींना अगदी सहज, केव्हाही आणि कुठेही रडू येतं. पण बाबा मंडळींना मी क्वचितच रडताना पाहिलंय. मला आता माहितेय की, रडणं हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाहीये आणि अश्रू दाबून टाकण्यापेक्षा ते वाहून गेलेले बरे; अन्यथा त्या ओझ्याखाली दाबून आपल्याच प्रकृतीला त्रास होतो. बाबा मंडळींना वाटतं की, ते जास्त सक्षम आहेत म्हणून ते रडत नाहीत वगैरे. पण मला आठवतंय, आमच्या शाळेत पालक सभेला जेव्हा वडील मंडळी यायची ना, तेव्हा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यासारखा त्यांचा चेहरा असायचा. हे लोक रडायला विसरले आहेत म्हणून त्यांचे चेहरे असे दिसताहेत असं निरीक्षण तुम्ही नोंदवलं होतं. जी माणसं आपल्या भावनांना स्वीकारतात आणि त्या अनुभवतात ती माणसं आतून शांत आणि समाधानी असतात, पण जी माणसं प्रत्येक वेळी आपल्या दु:खाला, अश्रूंना दाबून ठेवतात त्यांना सतत एक अस्वस्थता आतून पोखरत असते.
मी माझ्या मित्रांना अभिमानानं सांगतो की, मला कधी एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर ‘तुझ्यामुळे माझी मान खाली गेली’ असं माझे बाबा मला कधीच म्हणत नाहीत. त्या वेळी मलाही वाईट वाटलेलं असायचं, पण तुम्ही कधीच माझा आत्मविश्वास ढासळू दिला नाहीत.. उलट अशा वेळी बाबा तुम्ही नेहमी मला आत्मविश्वास वाढायला मदत करीत आला आहात. आजही मला तुमच्या डोळ्यात माझ्याविषयीचा आत्मविश्वास दिसतो.
माझा चुलतभाऊ, तुमचा पुतण्या- त्याचं ब्रेकअप झालं तेव्हा सगळ्यात आधी तुमच्याकडे धावत आला होता आणि तुमच्यासमोर बसून त्याने मन मोकळं केलं होतं. मध्यंतरी आमच्या एका मित्राचाही असाच ब्रेकअप झाला तेव्हा तुमची भूमिका मी निभावली आणि खरंच त्या मित्राला खूप बरं वाटलं.. त्याला रडण्यासाठी माझा खांदा मिळाला. थोडय़ा वेळाने तो बराच शांत झाला.
परीक्षेत कॉपी करताना पकडला गेल्याने घरी जायला घाबरत असलेल्या एका मुलाला तुम्ही एकदा आपल्या घरी आणलं होतं. त्याच्या मनात भलतेसलते विचार घोळत होते. भीती आणि दु:ख एकत्र येऊ शकतात, पण त्याबरोबर शरमेची भावनाही कधी कधी येते. तुम्ही त्याच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांना समजावलं तेव्हा तो मुलगा रडायचा थांबला. भीतीला जर योग्य पद्धतीने हाताळलं तर भीतीमुळे उद्भवलेले दु:ख कमी होऊ शकतं हे मला तेव्हा कळलं.
आमच्यासारख्या किशोरवयीन मुलांचे मूड्स सारखे वर-खाली होत असतात. कधी कधी आम्ही खूप आनंदात असतो, पण काही वेळेस कोणतेही कारण नसताना दु:खी चेहरा करून बसतो. आम्ही कधीच अखंड आनंदी नसतो किंवा अखंड दु:खी नसतो किंवा सतत उडय़ा मारण्याच्याही मूडमध्ये नसतो. म्हटलं ना बाबा, आमचा मूड सारखा बदलत असतो. मूड जाणं किंवा मूड चांगला असणं हे आमच्या बाबतीत स्वाभाविकपणे घडत असतं.
तुम्हाला आठवतंय, एकदा शाळेच्या सहलीदरम्यान मी आणि माझ्या मित्राने शिक्षकांचं ऐकलं नाही म्हणून प्राचार्यानी तुम्हाला शाळेत बोलावून घेतलं होतं. ‘‘माझ्या मुलाने शिक्षकांच्या आज्ञेचा अनादर करून नियमांचं उल्लंघन केलं म्हणून तुम्ही त्याच्यावर जरूर योग्य ती कारवाई करा’’, असं तुम्ही प्राचार्याना सांगणार याची मला कल्पना होती. मला वाईट वाटलं. पण तुमचे पुढचे शब्द होते, ‘सर, आज तो चुकला हे खरंय; पण एरवी तो एक चांगला मुलगा आहे.’ तुमच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आले होते. डोळे पाण्याने एवढे भरून आले होते की, काय सांगू? केवढा विश्वास दाखवला होतात तुम्ही माझ्यावर आणि तेही माझ्या चुकीवर पांघरूण न घालता! एकीकडे तुमच्यासारखे वडील मिळाल्याचा खूप अभिमान वाटला होता आणि दुसरीकडे जबाबदारी या शब्दाचा अर्थ नव्याने गवसला मला बाबा. माणसाला जेव्हा दु:ख होतं तेव्हा चॉकलेट न मिळाल्यावर लहान मुलं जशी रडतात ना तसं त्यानं रडावं असं तुम्ही म्हणता. माझं तेव्हा काहीसं तसंच झालं होतं.
ज्येष्ठ हॉकीपटू धनंजय पिल्ले यांनी कधीच आपले अश्रू लपवले नाहीत.. मग ते दु:खाचे असो की आनंदाश्रू. पण तुम्ही मला हेही सांगितलं होतं, की जर कुणी माणूस सारखा रडत असेल तर मात्र सावधपणे त्याच्याकडे पाहायला हवं. कारण त्याच्या रडण्यामागे नैराश्य असू शकतं. नैराश्य ही नकारात्मक बाजू असून त्यासाठी वेळीच मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. तुम्ही सांगितलेल्या एका हिंदी म्हणीची आठवण झाली, ‘जो बह गया वो पानी है, जो रह गया वो जहर है.’
लव्ह यू बाबा!
कणाद
शब्दांकन – मनीषा नित्सुरे-जोशी harish139@yahoo.com