सारंग साठय़े, लेखक
पुण्याच्या ‘बी.एम.सी.सी’ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकणाऱ्यांचा एक ठरलेला प्रवास असतो आणि मी त्याच मार्गाने जात होतो. याच काळात इंटरनेटचे युग आले आणि सगळे जगच बदलले. हा प्रवास मला खोटा वाटायला लागला. मनात अनेक विचार होते. सतत अस्वस्थता होती. पण हे सर्व मांडता येत नव्हते. तेव्हा ती अक्कलही नव्हती. त्यामुळे चिडचिड व्हायची. कारण आपण आहोत त्या पलीकडेसुद्धा एक वेगळे जग आहे. पण आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नव्हते याचा ताण यायचा. महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मित्र करत होते म्हणून ‘सी.ए’च्या परीक्षेला बसलो. एखाद्या कार्यालयात कुणाचेही खाते, व्यवहार सांभाळत बसायचे नाही हे ठरवले होते. गणित माझ्या सर्वात आवडता विषय होता. तरीही त्या विषयात नापास झालो. त्या वेळी जाणीव झाली की हे आपल्याला करायचे नाही. या परिस्थितीत आई-वडील समजूदार असल्याने त्या तणावातून बाहेर पडलो. त्यामुळे कुठे थांबायचे हे कळायला हवे. एकदा कुठे थांबायचे हे कळले की आयुष्याचे बरेच प्रश्न सुटतात. मी खूप चिडचिडा होतो. आपली तत्त्वे आणि अन्य गोष्टींना फार महत्त्व द्यायचो. इतरांनी त्याचे पालन केले नाही तर गुन्हा मानायचो. त्यामुळे त्रस्त व्हायचो. पण नंतर माझ्या आयुष्यात सुनील सुखटनकर, विजय तेंडुलकर असतील अशी काही मान्यवर मंडळी आली. त्यांना पहिल्यांदा भेटून असे वाटले की, त्यांच्याही मनात अनेक गोष्टी आहेत. लेखनाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्या विचारांना वाट करून देतात. आपल्या आजूबाजूच्या माणसांना अनुभवले तरीही ताणमुक्तीची तान मिळतेच. काम करून, मेहनत घेऊनही माझे पहिले चार चित्रपट प्रदर्शितच झाले नाहीत. आयुष्यातली महत्त्वाची चार वर्षे गेली. २३ ते २५ या वयात खूपच ताण होता. आज भूतकाळाकडे मागे वळून पाहिल्यानंतर जाणवते की तेव्हाच मी लिहायला लागलो होतो. यातून नवीन गोष्टी समोर आल्या. तुम्ही तणावाला वेळ दिल्यावर ताणसुद्धा तुम्हाला योग्य ठिकाणी नेतो. खूपच ताण आला तर कुटुंबीयांकडून, मित्रांकडून मदत घ्यावी. विपश्यनेसाठीही मी गेलो होतो. दहा दिवस मौन धरून स्वत:ला अनुभवायचे असते.
मला त्याचा चांगला अनुभव आला. आता विपश्यना करत नाही पण काहीच शाश्वत नाही हे एकदा स्वीकारल्यावर सगळेच सोपे होते ही गोष्ट कायमची शिकलो.
शब्दांकन – सौरव आंबवणे