मकरंद जोशी

राकट, कणखर डोंगरांचा प्रदेश असलेल्या महाराष्ट्राच्या निसर्ग संपदेचा कणा म्हणजे सोळाशे किलोमीटर क्षेत्रात पसरलेला सह्य़ाद्री. या सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर कोरलेल्या रस्त्यांमधील वळणावळणाचे घाट भटक्यांना नेहमीच खुणावतात. नभ उतरू आलं की कोसळणाऱ्या जलधारांशी स्पर्धा करत या घाटांमधून धबधबेही वाहू लागतात आणि त्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागतात. पावसाळ्यात अशी हाऊसफुल्ल गर्दी खेचणारा घाट म्हणजे कोल्हापूरकडून सावंतवाडीकडे जाताना लागणारा आंबोलीचा घाट.

सावंतवाडीकडून वरती या किंवा कोल्हापूरकडून खाली उतरा, आंबोली त्याच्या घनगर्द अरण्याने आणि वळणावळणांवर ओसंडणाऱ्या जलधारांनी पावसाळ्यात तुम्हाला चिंब भिजवून टाकतो. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत धबधब्यांची कमतरता नाही. पण ‘मल्टीस्टार’ चित्रपटांतही जसा अमिताभ सर्वात भारी ठरतो, तसा आंबोलीतील धबधब्यांच्या माळेत सर्वात उठावदार ठरतो तो पारपोली गावाजवळचा मोठा धबधबा. पारपोलीलगत असला, तरी हा धबधबा आंबोली धबधबा म्हणूनच ओळखला जातो आणि त्यामुळे शासकीय स्तरावर पर्यटन केंद्र म्हणून मिळणारे फायदे पारपोलीऐवजी आंबोलीला मिळतात, असा इथल्या ग्रामस्थांचा आक्षेप आहे.

पण ऐन पावसाळ्यात गोव्यापासून पुण्यापर्यंतचे जे पर्यटक या जलधारांमध्ये भिजायला येतात त्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था इथल्या गावकऱ्यांनी चोख केली आहे. जलधारांमध्ये भिजून भिजून थंडी वाजायला लागली की वाफाळता चहा आणि गरमागरम वडे भजी तयारच असतात. झालंच तर निखाऱ्यांवर खरपूस भाजलेली  कणसे किंवा शेंगाचा मेवाही मिळतो. या मोठय़ा धबधब्यावर मनसोक्त भिजून झाल्यावर मंडळींचा मोर्चा वळतो आंबोलीच्या वेशीवर असलेल्या ‘नांगरतास’ धबधब्याकडे. चिंचोळ्या फटीतून झेपावणारा हा धबधबा नीट पाहाता यावा म्हणून त्याच्या जवळ व्ह्य़ूइंग गॅलरी तयार केली आहे आणि त्याच्या धारेसमोर एक छोटासा पूलही बांधलेला आहे. या धबधब्याच्या प्रवाहाने कातळावर नांगराने तास धरावा तशा रेषा निर्माण झाल्या आहेत आणि उन्हाळ्यात धबधब्याचे पाणी आटल्यावर त्या स्पष्ट दिसतात, म्हणून हा नांगरतास धबधबा! या धबधब्याकडे जाताना राखणदाराचे स्थान लागते, हा जागृत राखणदार आंबोलीचा रक्षक आहे अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

आंबोलीला गेल्यावर आवर्जून भेट द्यायलाच हवी असे ठिकाण म्हणजे हिरण्यकेशी नदीचा उगम. आंबोलीत एका गुहेत उगम पावून हिरण्यकेशी नदी पुढे वाहात जाऊन कर्नाटकात घटप्रभा नदीला मिळते. या उमगस्थानी शिवशंकराचे मंदिर आहे, भोवतालचा परिसर देवराई म्हणून शतकानुशतके जपलेला आहे, त्यामुळे या अरण्यात आंबोलीचे वन्य धन सुरक्षित आहे. आंबोलीच्या उंचीमुळे तिथून दिसणारे विहंगम दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत असले तरी कावळेसादच्या दरीचा देखावा नजरेत मावत नाही. आता या ठिकाणी प्रतिबंधक कठडा उभारून पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. कावळेसादचे वैशिष्टय़ म्हणजे इथे वाऱ्याच्या झोतांनी उलटे उडणारे धबधबे पाहायला मिळतात. असेच भान हरपून टाकणारे दृश्य पाहायला मिळते ते महादेवगड पॉइंटवरून. सावंतवाडीच्या संस्थानिकांनी बांधलेल्या या किल्ल्याचे आज अवशेषच उरले आहेत, पण इथे खालच्या दरीतून वर येणारे धुके आणि ढग अनुभवता येतात. याशिवाय शिरगांवकर पॉइंट, सनसेट पॉइंट अशा खास पर्वतीय स्थळांवर असणारे पॉइंट आहेतच.

आंबोली हे जगातील ‘इको हॉट स्पॉट’मध्ये गणले जाते. इथल्या नाजूक आणि संवेदनशील निसर्गाची जपणूक आपणच करायला हवी. त्यामुळे प्लास्टिक वा अन्य मानवनिर्मित कचरा होणार नाही, वन्यजीवांचा अधिवास उद्ध्वस्त होणार नाही, वनसंपत्तीचा ऱ्हास होणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी.

जैवविविधतेचे केंद्र

गेल्या काही वर्षांमध्ये आंबोलीला जाणाऱ्यांमध्ये फक्त धबधब्यात न भिजता इथल्या वैविध्यपूर्ण जैवविविधतेचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्याही वाढली आहे. मलबार ग्लायडिंग फ्रॉग’सारखा अनोखा उभयचर, हिरव्यागार रंगाचा ‘मलबार पिट व्हायपर’, महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू असलेले ‘ब्लू मॉर्मन’, तानाजीच्या गोष्टीतली घोरपड, आपल्या झळाळत्या रंगछटांनी लक्ष वेधून घेणारा ‘खैरेज ब्लॅक शिल्ड टेल साप’ याबरोबरच ‘कंदीलपुष्प’ आणि ‘डान्सिंग लेडी’सारखी नाजूक रानफुले आंबोलीच्या निसर्ग खजिन्याला संपन्न करतात. तुम्ही नशीबवान असाल तर प्रकाशवंती म्हणजे एका प्रकारच्या बुरशीमुळे प्रकाशणारे लाकूडही पाहायला मिळू शकते. मात्र आंबोलीच्या जंगलात जळवाही आहेत आणि विषारी सापही त्यामुळे माहीतगाराशिवाय या जंगलात फिरायचे धाडस करू नका.

कसे पोहोचाल?

कोकण रेल्वेवरील सावंतवाडी हे जसे जवळचे रेल्वे स्थानक आहे तसेच कोल्हापूरचे रेल्वे स्थानकही सोईचे आहे. ऐन पावसाळ्यात जाणार असाल तर आधी आरक्षण करून निवासाची सोय करायला विसरू नका.

makarandvj@gmail.com