निलेश अडसूळ, मानसी जोशी
‘ऐसा लाभा जो चुकला, तुका म्हणे वाया गेला’ तुकाराम महराजांच्या या उक्तीप्रमाणे अद्वितीय आनंद देणाऱ्या वारीचा लाभ झाला नाही तर जीवन व्यर्थ आहे, असे मानले जाते. हजारो वर्षांची परंपरा असणारी आषाढवारी आजही त्याच उत्साहात सुरू आहे. डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, कलाकारांची संख्या जास्त आहे. प्रत्येकाची वारीत सामील होण्याची प्रेरणा वेगवेगळी आहे. भक्तीसह सामाजिक उपक्रमांना वारीतून सुरुवात झाली आहे..
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी सांगितलेली जीवनमूल्ये वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान घराघरात पोहचावे यासाठी ‘शांतीब्रह्म एकनाथ महाराज मिशन’ या संस्थेने ऑनलाइन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम सुरू केला आहे. आज प्रत्येक जण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जगाशी जोडलेला आहे. त्याच माध्यमाचा वापर करून या संस्थेने हजारो तरुणांना एकत्र करून घरबसल्या वारकरी संप्रदायाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. अभ्यासक्रमाची माहिती आणि परीक्षा देता येतात. तीन वर्षांचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. याअंतर्गत एकूण नऊ परीक्षा होतात. शिवाय विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रभरातील अनेक तरुण ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या वारीत जोडले जात आहेत. http://santeknath.org/eknath/index.php या संकेतस्थळाद्वारे आपणही या परीक्षेत सामील होऊ शकता.
जेजुरीनंतर वारी!
गेल्या काही वर्षांपासून जेजुरी फोटोग्राफी नेटकऱ्यामध्ये प्रसिद्ध होत आहे. त्याचप्रमाणे वारीत केल्या जाणाऱ्या छायाचित्रणाला समाजमाध्यमांवर भलतीच प्रसिद्धी मिळत आहे. समाजमाध्यमे, ऑनलाइन संकेतस्थळे आणि यूटय़ूबवर वारीचे छायाचित्र, चित्रफिती आवर्जून पाहिल्या जातात. त्यामुळे छायाचित्रकारांना आणि चित्रफिती बनवणाऱ्या कलाकारांना विशेष मागणी आहे. नोकरीतून सुट्टी काढून काही पत्रकार, छायाचित्रकार वारीचे अनुभव टिपण्यासाठी जात आहेत. हल्ली फेसबुक, इंस्टाग्राम या समाजमाध्यमांवर कीर्तनाचे थेट प्रक्षेपण केले जाते.
व्यवस्थापनाची वारी
‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ या संतांच्या शिकवणीला सार्थ ठरवण्यासाठी अक्षय भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘अक्षयवारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे १० हजार लोकांपर्यंत वारीचे तपशील पोचविण्याचे काम केले जाते. कामाच्या वा व्यावसायाच्या निमित्ताने वारीला येऊ न शकलेल्या, परंतु वारीची ओढ असलेल्या प्रत्येकापर्यंत वारी पोचविण्याचे काम ते करतात. केवळ वारीच नव्हे, तर वर्षभर लोकांना समाजमाध्यमातून अभंग पाठवून त्याचे मराठीसह इंग्रजी भाषेतही निरुपण केले जाते. वारी जीवन घडवण्याचे केंद्र आहे. एकमेकांना सावरणे, तडजोडी करत चालत राहणे आणि आलेल्या संकटावर मात परत लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचे बळ वारी देते. लोक ेंल्लंॠेील्ल३ शिकायला लाखो रुपये खर्च करतात, परंतु लाखोंचे ेंल्लंॠीेील्ल३ करायला शिकवणारी ही वारी आहे. वारीत सामील झालेले तरुण वारीत चालणाऱ्या आजीआजोबांच्या पायाला तेल लावताना पाहून ही वारी अशीच अखंड राहील, अशी भावना मनात येते. वारकरी युवा मंच आणि महाएन्जिओ फेडरेशन यांच्या वतीने यंदा वारीत हलक्या वजनाचे आणि पायांना आराम देणारे बूट अनेक गरजूंना वाटण्यात आले. वारीच्या महिना-दोन महिने आधी तरुण कीर्तनकारांनी महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात जाऊन प्रबोधनाचे कार्य केले.
वैद्यकीय सेवा
परभणी येथील गंगाखेड गावात राहणाऱ्या तरुण मुला-मुलांनी सवंगडी कट्टा या समूहाची स्थापना केलेली आहे. गंगाखेड येथून संत जनाबाईंची पालखी रवाना होते. वारीच्या निमित्ताने हजारो वारकरी यात सामील होतात. सवंगडी कट्टय़ाच्या माध्यमातून आम्ही वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवतो. त्यासाठी काही डॉक्टरांची मदत घेतली जाते. वारकऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, पडसे यांसारखे आजार होत असतात. तसेच अनवाणी चालत असल्याने पायांना भेगा पडतात. यावर योग्य तो औषधोपचार सवंगडी कट्टय़ाच्या माध्यमातून केले जाते. वारकऱ्यांचा वारीचा प्रवास सुखकर व्हावा हा यामागचा उद्देश आहे. मी गंगाखेड येथे बळीराजा विद्यालयात कलाध्यापक या पदावर कार्यरत आहे. वारीवर मी काही लघुपट चित्रित केले आहेत. लघुपटातून संत जनाबाई यांचे कार्य लोकांपर्यंत मांडायचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचे गोपी मुंडे म्हणाले.
नाचू कीर्तनाचे रंगी..
परभणीतील नितीन सावंत गेल्या आठ वर्षांपासून वारीत नित्यनेमाने सहभागी होत आहे. वारीच्या वाटेत येणाऱ्या गावागावात जाऊन तो कीर्तन करत आहे. कीर्तन करताना संतसाहित्याची उदाहरणे सांगून समाजात जनजागृती करण्याचे काम हाती घेऊन वारकरी संप्रदायाची शिकवण त्याने स्वत:त रुजवल्याचे दिसून येते. स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, जातीयवाद, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, स्वच्छता अभियान याचबरोबर आरक्षणासारखे वास्तववादी विषय तो कीर्तनामधून मांडत आहे. गावकऱ्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत त्यांना सामाजिक समस्यांबद्दल जागृत करत आहे. फेसबुकवर राष्ट्रजागृती वारकरी परिषद या नावाने त्याचे पेज असून यूटय़ूबवर मानवमुक्ती मिशन या चॅनेलवर त्याची कीर्तने सर्वासाठी उपलब्ध आहेत. जून महिना सुरू झाल्यावर गावातील दिंडीच्या कामाचे व्यवस्थापन करण्यात त्याचा पुढाकार असतो. आषाढी एकादशीच्या महिनाभर आधी कीर्तनाचे विषय निश्चित करण्यात येतात. त्यासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन कोणत्याही विषयाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेतली जाते. ग्रामीण भागात माझे कीर्तन ऐकून लोक भारावून जातात. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. असे नितीन सावंत याने सांगितले.
भाव भोळा मनीचा..
मी इचलकरंजी येथील डीकेएससी महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेत शिकत असून गेली दोन वर्षे वारीत सहभागी होत आहे. पुणे ते दिवेघाट या मार्गावरील वारीचे चित्रण माझ्या कॅमेऱ्यात टिपले आहे. वारीचे वातावरण, रिंगण, वारकऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव मला कॅमेऱ्यात बंदिस्त करायला आवडतात. खास महाविद्यालयातून सुट्टी काढून मी वारीत छायाचित्रण करण्यासाठी येतो. वारीचे दृश्य विलोभनीय असते. तसेच प्रत्येक वर्षांत वेगळी छायाचित्रे आणि वेगळे अनुभव मिळाल्याने अधिकाधिक छायाचित्रकार मित्रांना मी वारीत सहभागी होण्याचा सल्ला देतो, असे शरद पाटील यांनी सांगितले.
धा धा तिरकीट धा धा..
मी पुणे, आळंदी भागातील तरुण वारकऱ्यांना वाद्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम करतो. आतापर्यंत तबला, टाळ, झांजा, मृदंग, पखवाजाचे प्रशिक्षण पाचशेहून अधिक तरुणांना दिले आहे. अनेक वर्षांपासून वारीतील कीर्तनात साथसंगत करत आहे. मी पुणे विद्यापीठातून संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेतल्याने संगीताची रुची होती. याचा उपयोग कीर्तनात वाद्याची संगत होऊन करावा असे वाटले. ही एकप्रकारे पांडुरंगाची माझ्या हातून घडणारी सेवाच आहे. घरातील सर्व सदस्य वारकरी असल्याने आपणही वारीत सहभागी व्हावे अशी आवड निर्माण झाली. तरुणांना वाद्यांच्या प्रशिक्षणासोबतच वारीतील कीर्तनात वादन करण्याची संधी देतो. या निमित्ताने मुलांना वारी अनुभवता येते, असे सुदर्शन हडपसर म्हणाला.