अभिलाषा म्हात्रे, आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळाडू असल्याने ताण हा नेहमीच असतो. खेळत असताना प्रतिस्पध्र्यावर मात करण्यासाठी रचलेली व्यूहरचना योग्यपणे मार्गी लावण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाते, तेव्हा सहाजिकच शारीरिक श्रमासोबत मानसिक श्रमही होतात. यामुळे ताण येतोच. त्याचप्रमाणे पराभवानंतर खेळात केलेल्या चुकांचा विचारही एखाद्या खेळाडूसाठी ताणवर्धक ठरू शकतो. त्यामुळे खेळ कोणताही असला तरी, खेळाडूला ताणाला तोंड द्यावेच लागते. मात्र, ज्याप्रमाणे उत्कृष्ट खेळ करून अपयशावर मात करते त्याचप्रमाणे प्रत्येक ताणाला सामोरे जाऊन त्यावर मात करण्यावर माझा विश्वास आहे. कबड्डी खेळ हा माझा श्वास आहे. हा खेळ मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो. या खेळात बुद्धीसोबत शारीरिक ताकदीची मोठय़ा प्रमाणावर गरज असते.

कोणत्याही खेळाच्या प्रत्येक डावाची कसरत करताना यश-अपयशाचा एक ताण हा सतत असतो. ज्यावेळी कबड्डीचा सामना असतो त्यावेळेस मी ताण दूर करण्यासाठी मैदानावर प्रवेश करण्याआधी माझे आवडते गाणे गुणगुणते कारण त्यातून माझा ताण हलका होतो.

कधी कधी खेळानिमित्त अनेक दौरे होतात. यावेळेस ताण दूर करण्यासाठी मी चित्रपट पाहून माझे मन रमवते. एखादा सामना आम्ही हरलो आणि सामना संपल्यावर खोलीत आल्यावर खूप निराशा येते. यावेळेस येणारा ताण हलका होणे महत्त्वाचे असते. यावेळी माझे प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘निराशा सोड आणि सामना जिंकण्यासाठी खेळू नकोस तर प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी खेळ’ हे प्रशिक्षकांनी सांगितलेले वाक्य लक्षात ठेवून मी माझा प्रत्येक खेळ खेळते. कबड्डीत एखादा डाव चांगला केला की प्रेक्षकांमधून येणाऱ्या टाळ्या माझा ताण अधिक हलका करतात. ताण दूर करण्यासाठी मी परिपूर्ण झोप घेते. प्रत्येकानेच ताण घालवण्यासाठी स्वत:ची आवडती गोष्ट केल्यास ताणाचे उत्तम व्यवस्थापन होते.