अमित्रियान पाटील

राजवाडे अँड सन्स, मन्या, सत्या आणि आगामी ‘आसूड’ या चित्रपटातून तसेच अनेक जाहिरातींमधून प्रकाशझोतात आलेल्या अमित्रियान पाटील हा त्याच्या हॉट व्यक्तिमत्त्वामुळे मोठा चाहतावर्ग मिळवून आहे.

माझं महाविद्यालयीन शिक्षण अकोला येथील शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये झालं, आणि त्यानंतर पोस्ट ग्रेज्युएशन इन जाहिरात आणि पी. आर. मार्केटिंग मुंबईत के. सी. कॉलेजमध्ये केलं. माझं अकोल्याच कॉलेज खूप शिस्तबद्ध वातावरणातलं होतं. मी ज्यांच्यात रमायचो तो मित्रांचा गट अभ्यासाहून अधिक काही तरी करणारा होता. त्यामुळे कॉलेजमध्ये काही तरी वेगळं करू या, असा विचार आमच्या मनात आला. त्या वेळी आम्ही दहा-पंधरा जणांनी एकत्र मिळून कॉलेजमध्ये ‘ट्रेडिशनल डे’ साजरा करायचे ठरवले. छान पारंपरिक पोशाख घालून सर्वाना अचंबित करून सोडायचे, हा डोक्यात विचार होता. मात्र घडले वेगळेच. संपूर्ण मित्रांमध्ये मी सोडून कोणीच पारंपरिक वेश घालून आलेले नव्हते. अख्ख्या कॉलेजात मी एकटाच कुर्ता-पायजमा घातलेला होतो. सारे जण माझ्याकडे असे काही बघत होते, की कोणी तरी परग्रहावरचा माणूस कॉलेजात आलाय! खूपच बावरून गेलो होतो त्या वेळी मी. पण हेही समजले की, स्वत:चा वेगळेपणा सिद्ध करण्यात मी यशस्वी झालोय. ते रसायन माझ्यात आजही आहे जे मला भूमिका निवडताना कायम उपयोगी पडतं.

कॉलेजच्या सांस्कृतिक चळवळीत मी नेहमीच अग्रेसर असायचो. टेक्निकल डे असो किंवा इंटरटेनिंग डे असो मी नेहमी सगळ्यात पुढे. कॉलेजच्या महोत्सवासाठी, छोटय़ा मोठय़ा कार्यक्रमांसाठी गरज असते ती प्रायोजकाची. आजही कित्येक विद्यार्थी प्रायोजकासाठी दारोदार हिंडतात. मीदेखील माझ्या कॉलेजविश्वात असे प्रायोजक मिळविण्यासाठी खूप ठिकाणी भटकलोय. दुकानांच्या मालकांना भेटी देणे, इव्हेंटची माहिती देणे, बैठका घेणे असे बरंच काही. मला आठवतेय की, अकोल्यात शेवटच्या वर्षांला असताना मी प्राचार्याकडे अ‍ॅन्युअल डेला डी.जे.ची मागणी केली होती. आमच्या प्राचार्य सरांनी त्या वेळी ‘डी.जे. काय असतो?’ असा सवाल मला केला होता. अर्थात, त्या वेळी डीजे हा प्रकार अकोल्यात कोणाला माहीत नव्हता. त्या वर्षी पहिल्यांदाच आमच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये डी. जे. हा प्रकार मी आणला.

कॉलेजात माझा मित्रांचा मोठा गट होता. आम्ही खूप धम्माल करायचो, शिवाय तितका अभ्यासही करायचो. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्यास इन्सेन्टिव्ह मार्क्‍स मिळतात, आणि त्याचा फायदा फायनलला होत असतो. त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी आमचा एक म्युझिक बॅण्ड तयार केला होता. वेगवेगळ्या कॉलेज उपक्रमांमध्ये आमचा हा बॅण्ड आम्ही घेऊन जायचो. मला चांगलं गिटार वाजवता यायचं, मात्र बाकी पक्के इंजिनीअर्स होते, त्यामुळे जमेल तसे प्रत्येक जण काँबो, ट्रेंगल वाजवायचे.

कॉलेज हायवेलगतच होतं. त्यामुळे तिथे खाबूगिरीला भरपूर चान्स होता. मी बाईकवरून कॉलेजला जायचो आणि तिथल्या ढाब्यावर जाऊन बसायचो. अर्थात त्या वेळी पॉकेटमनीही काही जास्त नसायचा. त्यामुळे ‘कॉन्ट्री’ करून आम्ही आलू पराठा, डाल तडका अस बरंच काही वन बाय टू करून खायचो. कोणाकडे जास्त पैसे असतील तर चिकनवरदेखील ताव मारायचो. अकोल्यात तरीवालं जेवण मिळतं, छान तिखट आणि झणझणीत रस्सा असलेलं ते जेवण खाण्याची मज्जा काही औरच! सेव-सब्जी, सेव-टमाटर असं बरंच काही आम्ही फस्त करायचो. इंजिनीअरिंग कॉलेज असल्यामुळे माझ्या कॉलेजमध्ये रॅगिंग खूप व्हायचं. ‘थ्री इडियट्स’मध्ये जे किस्से पाहिले आहेत, अगदी तसं किंवा त्याच्यापेक्षाही गंभीर रॅगिंग व्हायचं. मी या रॅगिंगच्या विरोधात खूप आवाज उठवला. पहिल्या वर्षांला असताना वरच्या वर्गातल्या एकाने मर्यादा ओलांडल्या. त्याने आमच्या वर्गातील मुलींचं रॅगिंग घेतलं. तेव्हा मी आणि माझ्या ग्रुपने आवाज उठवला. पहिल्यांदाच ज्युनिअर विद्यार्थ्यांची फळी मी वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांविरोधात उभारली होती. काही कालावधीनंतर सर्व सिनीयर आमच्या जिवाभावाचे मित्र बनून गेले. बाकी दंगेही खूप केले. व्यवस्थापनाशी भांडताना काच फोडली आहे, पण तो कॉलेजमधील चळवळीचा एक भाग होता.ट्रिपची संकल्पना आमच्या डोक्यात मज्जा-मस्ती अशी होती, पण आम्हाला तिचे एका आश्रमात घेऊन गेले. तिथे खाण्यापिण्यापासून सगळी बंधने होती. मुला-मुलींना वेगळं राहायला होतं, कुठे बाहेर जाण्यास मज्जाव होता. त्यामुळे आम्ही एकदा बंडखोरी करून, रात्री त्या आश्रमात गुपचूप पार्टी केली होती. आमची ही पार्टी दुसऱ्या दिवशी चांगलीच अंगावर आली.अकोल्याच्या कॉलेजचा शेवटचा दिवस माझ्यासाठी दुसरा जन्मच म्हणावं लागेल. कारण, शेवटचा पेपर होता, आणि मला मुंबईत यायला मिळणार होतं. त्यामुळे मी खूप खूश होतो. इंजिनीअरिंग डिग्री पूर्ण करण्याचं वचन मी जे बाबांना दिलं होतं ते पूर्ण होणार होतं. कारण त्यानंतर माझा मार्ग मोकळा होणार होता. या आनंदाच्या भरात मी माझ्या मित्राबरोबर ८० च्या स्पीडने बाइक चालवत कॉलेजला जात होतो. इतक्यातच समोरून एक ट्रक आला, गाडी स्लिप झाली. गाडी जमिनीलगत घासत इतक्या पुढे गेली की माझं डोकं आणि ट्रकचं चाक अवघं १५-१६ सेंटीमीटर इतक्या जवळ होतं. याहून अजून पुढे गेलो असतो, तर कदाचित माझ्यासोबत काही तरी भीषण घडलं असतं. कॉलेजचा तो शेवटचा दिवस आजही अंगावर काटा आणतो.

शब्दांकन :  मितेश जोशी