सुयश टिळक

खरं तर मला वैद्यकीय शाखेला जायचं होतं. पण ‘मेडिकल सायन्स’साठी माझा गोव्यातील एका महाविद्यालयात क्रमांक लागला. घर पुण्यात आणि शिक्षणासाठी गोव्यात जाणं घरच्यांना पटलं नाही. शिवाय गोव्यासारख्या ठिकाणी गेल्यावर मी सभ्य मुलांसारखा अभ्यास पूर्ण करेन, याची खात्री त्यांना नव्हती. त्यामुळे जे काही करायचं ते इथेच कर, असा दमच घरच्यांनी मला भरला. मग ‘एन्व्हायर्न्मेंटल सायन्स’ घेऊन पुण्याच्या एका टेक्निकल कॉलेजमध्ये दाखल झालो. याचदरम्यान नाटकं पाहण्याचं वेड लागलं. कॉलेजमध्ये नाटकाचा ग्रूप होता. पण तिथं पक्षपातीपणा खूप होता. सीनियर विद्यार्थ्यांची मक्तेदारी असल्यानं त्या ग्रूपमध्ये माझं मन रमत नव्हतं. त्या वेळी नाटकासाठी आदर्श महाविद्यालय म्हणून फग्र्युसन महाविद्यालयाचं नाव गाजत होतं. आपणही फग्र्युसनला प्रवेश घ्यावा, असं वाटू लागलं आणि आधीच्या कॉलेजमधून एक वर्षांचा ‘ड्रॉप’ घेतला. आई-बाबांना हा निर्णय अजिबात पटला नव्हता. पण त्यांनी विरोध केला नाही. ‘तू यापुढे जे करशील, ते तुझ्या जबाबदारीवर कर’ या शब्दांत त्यांनी माझ्या निर्णयाला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. मीही पुढे मला जे हवं तेच केलं आणि सुदैवानं सगळं सुरळीत होत गेलं.

फग्र्युसन कॉलेजचा पहिला दिवस खूप गमतीशीर गेला. काही तरी वेगळं करायचं हे डोक्यात घेऊनच मी कॉलेजमध्ये एंट्री केली होती. त्यादिवशी मी फग्र्युसन कॉलेजच्या मोठय़ा सर्कल मध्ये पूर्ण वेळ बसून काढला. फग्र्युसन कॉलेजच्या इतिहास मोठा आहे, त्याची वास्तूदेखील ऐतिहासिक आहे. पहिल्याच दिवशी या महाविद्यालयानं मला आवारातच खिळवून ठेवलं. अख्खा दिवस मी कॅम्पसमध्येच बसून होतो. नवीन मित्रही जोडले. त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं की, मी सायन्सचा विद्यार्थी असलो तरी, मला भेटलेली सगळी मुलं आर्ट्सची होती. सायन्सचा एकही विद्यार्थी त्या दिवशी मला भेटला नाही.

फग्र्युसन कॉलजेच्या आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी एकटाच विज्ञान शाखेचा मुलगा होतो. बाकीचे मित्र मला यावरून नेहमीच छेडायचे. पण नाटकांबद्दलची माझ्या आवडीचं त्यांना कौतुक वाटायचं. आमचा सराव हॉल आणि विज्ञान शाखेची इमारत यांत खूप अंतर असायचं. त्यामुळे अभ्यासक्रमातील जनरे, सबमिशन किंवा महत्त्वाचे लेक्चर करून नाटकाच्या सरावाला जाताना माझी चांगलीच दमछाक व्हायची. पण विज्ञान शाखेतील मित्र मला नोट्स पुरवायचे. ‘सबमिशन’ही करून द्यायचे. शिक्षकांनीही कधी ‘नाटक का करतोयस’ म्हणून अडवले नाही. उलट प्रसंगी मला मदतही केली.

मी जनरल सेक्रेटरीच्या निवडणुकीला उभा होतो, तेव्हाचा हा मजेशीर किस्सा. मी निवडून आलो की, आपल्याला हवं ते करता येणार नाही, अशी माझ्या काही मित्रांना भीती होती. त्यामुळे त्यांनी मला ‘निवडणुकीला उभा राहू नकोस,’ असं धमकावलं होतं. पण थोडय़ा वेळातच ते सगळे परत आले आणि मला म्हणाले की, तूच ‘जीएस’ हो. पण आमच्या या मागण्या पूर्ण कर. याचं कारण शोधलं तेव्हा कळलं की, त्या वर्षी जनरल सेक्रेटरीसाठी एक मुलगीदेखील उभी होती. ही मुलगी निवडून आली असती तर, त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नव्हत्या. म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला. आजही ते माझे चांगले मित्र आहेत. मी कॉलेजचा ‘कल्चरल सेकेट्ररी’देखील होतो. त्यामुळे विविध विभागांची मुलं मला भेटायची, त्यांच्या कल्पना मांडायची. कॉलेजच्या कट्टय़ावर आम्ही ‘अ‍ॅडव्हेंचर क्लब’ चालवायचो. तीसुद्धा एक धमाल होती.

कॉलेजमध्ये जितकी नाटय़वलयात धमाल केली आहे. तितकीच धमाल खाबूगिरीत केली आहे. प्रियदर्शिनी (पी.डी.) मध्ये खूप छान अंडा-राइस मिळायचा, तो खाण्यासाठी आम्ही मित्र तिथे जायचो. जास्तीत जास्त वेळ मी कॉलेजमध्येच असल्यामुळे पी.डी.ला पडीक असायचो. त्यानंतर रुपालीची स्ट्राँग फिल्टर  कॉफी म्हणजे माझे जीव की प्राण. तसेच गुडलक कॅफे आणि शर्वरीची कांदा भजी आमची फेव्हरेट होती. वैशालीमध्ये खूप गर्दी असायची, त्यामुळे आम्ही सुट्टीच्या वेळेत तिथे जायचो. शिवाय, दुर्गा कॉफी शॉपची कोल्ड कॉफीसुद्धा आमच्या मेन्यूत असायचीच. कॉलेजचा शेवटचा दिवस कसा होता ते आजही सांगता येणार नाही. कारण कॉलेजचं आणि माझं नातं अजूनही संपलेलं नाही. मी पुण्यात असेन आणि मला जेव्हाही वेळ मिळेल  तेव्हा मी कॉलेजला जाऊन येतो. कॉलेजचा अखेरचा दिवस माझ्यासाठी खूप भावुक करणारा होता. मला आठवतंय एक विद्यार्थी या नात्याने माझे कॉलेजमधून पाय निघत नव्हते. मी कॉलेजचा माजी विद्यर्थी ही नवी ओळख निर्माण होणार होती. आयुष्यातले बरेच क्षण मी या ठिकाणी कंठित केले होते. त्यामुळे तिथून बाहेर पडणं मला अवघड गेलं होतं. कारण त्यानंतर सगळेच मित्र सुटणार होते, जागा सुटणार होती. शिवाय तीन वर्षँ कॉलेजचं नाव कसं मोठं होईल यासाठी आम्ही जी धडपड केली होती, ते सारं आता संपणार होतं. पण, काहीही झालं तरी फग्र्युसनचा मी अविभाज्य घटक आहे, आणि कायमच राहीन.

शब्दांकन : मितेश जोशी