डॉ. अविनाश भोंडवे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अ‍ॅनोरेक्सिया नव्‍‌र्होसा’ हा आहाराशी संबंधित एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. हा त्रास विशेषकरून १४ ते १७ वयोगटातल्या मुलींमध्ये जास्तकरून आढळतो. आपण अगदी सडपातळ हवे, पोटाचा घेर अजिबात नको. ‘झिरो साइझ शरीर’ असावे अशा कल्पनेने त्या कमालीच्या भारून गेलेल्या असतात. त्यामुळे आपले वजन खूप वाढेल, या भीतीने त्या खाणे-पिणे सोडून देतात. दिवसेंदिवस उपाशी राहणे, फक्त पाणी किंवा फळांचा रस पिऊन राहणे अशा सवयी त्यांना जडतात. प्रौढांमध्ये किंवा लहान मुलांतही या आजाराचे रुग्ण आढळतात. आजमितीला जगातील पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या आजारात संख्येने हा तिसऱ्या क्रमांकाचा आजार आहे.

काही विशेष बदल

* वजन कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात व्यायाम करणे.

*  खाल्ल्यानंतर मुद्दाम उलटी करून अन्न बाहेर काढणे.

* वजन कमी करण्यासाठी जुलाबाच्या, लघवी जास्त होण्याच्या किंवा हार्मोन्सच्या गोळ्या वैद्यकीय सल्ला नसतानाही वापरणे.

धोक्याची लक्षणे :

*  मानसिक औदासिन्य, चिंता, चिडचिडेपणा

*  हाडे, नखे ठिसूळ होत जाणे.

*  केस खूप गळू लागणे.

*  चेहरा पांढुरका दिसणे.

*  वारंवार चक्कर येणे.

कारणे :

*  अ‍ॅनोरेक्सिया नव्‍‌र्होसा होण्याचे असे एकच कारण नसते, पण मानसिक, शारीरिक आणि आजूबाजूच्या वातावरणाचा एकत्रित परिणाम त्यात दिसून येतो. काही युवतींमध्ये तारुण्याच्या सुरुवातीस पौगंडावस्थेतील शारीरिक आणि मानसिक बदल या आजाराचे प्रवर्तक कारण (ट्रिगर फॅक्टर) बनतात.

*  सर्वसामान्यपणे कौटुंबिक वातावरणात सुंदर दिसणे, मोहक दिसणे याबाबत जास्त आग्रह असू शकतो. आपण इतर कोणाहीपेक्षा जास्त आकर्षक दिसावे असा स्पर्धात्मक भावही असू शकतो.

*  याच्या जोडीला कुटुंबातील वादविवाद, कौटुंबिक कलह, शैक्षणिकदृष्टय़ा उच्च कामगिरी होण्याचा दबाव, कुटुंबातील किंवा मित्र-मैत्रिणीतील एकमेकांशी असलेले संबंध असे घटकही कारणीभूत ठरतात.

*  काही कुटुंबांतच खाण्यापिण्याबाबत काही गैरसमजुती असतात, वेळप्रसंगी आहाराबाबत काही विकृत कल्पनाही असतात. त्यामुळे या आजारामागे जनुकीय किंवा आनुवंशिक कारणे असण्याची शक्यताही मानली जाते. मात्र बालपणात आलेले अपमानास्पद अनुभव विशेषत: बाह्य़ स्वरूपातल्या सौंदर्याबाबत होणारी टीका टिप्पणी यामुळे बारीक राहून सुंदर दिसण्याची मनीषा निर्माण होते.

गंभीर परिणाम :

*  हिमोग्लोबिनच्या प्रमाणात घट, जीवनसत्त्वांचा अभाव आणि त्यामुळे होणारे आजार

*  हृदयाचे ठोके अनियमित पडण्याचा आजार होणे (अ‍ॅरिदमिया)

* मूत्रपिंडाचे विकार

*  यकृताचे आजार

*  गर्भाशयाचे आजार

*  कर्करोग

*  अनियमित मासिक पाळी

लक्षणे

* शरीर कृश असूनही अत्यंत सीमित आहार घेणे.

* अकारण सबबी देत जेवणाची नित्य टाळाटाळ करणे.

* कॅलरीजचा विचार करूनच खाणे.

* जेवण न करता जेवण झाल्याचे खोटे सांगणे.

* अचानक, वजन कमी होणे. काही काळापूर्वी व्यवस्थित वजन असलेली व्यक्ती हाडांचा सापळा दिसणे.

* वजन खूप जास्त असल्याचा भ्रम असणे.

* आपण खूप आकर्षक दिसावे अशा स्वप्रतिमेच्या अतिआहारी जाणे.

* सतत स्वत:चे शरीर जाड झालेय का या शंकेने आरशात निरखणे.

* शरीर, रंगरूप याबद्दल अस्वस्थ असणे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anorexia nervosa symptoms causes and treatment zws