शलाका सरफरे
कॉर्पोरेट ग्राहकांकडून रांगोळी कलाकारांना अधिक नफा मिळतो. कॉर्पोरेट कार्यालये, दांडिया पटांगण, नवरात्र मंडळांकडून या काळात देवीची विविध छटा रांगोळीतून मांडण्यासाठी रांगोळी कलाकारांना निमंत्रित केले जाते, असे रांगोळी कलाकार धीरज लाड सांगतो.
एकाने सजायचं आणि दुसऱ्यानं सजवायचं ही संस्कृती पूर्वापार आहे. पण हे सजणं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून असेल तर उत्साहाला उधाणच! निव्वळ कपडे नव्हे, तर चेहऱ्याची ठेवण आकर्षक ठेवण्यासाठी धडपडणारे गरबा-रासदांडियातील ‘नर्तक’ सजवण्यातल्या खास कलाकारांना आंमत्रित करतात. सध्या असा गरबा खेळणाऱ्यांसाठी ‘मेकअप आर्टिस्ट, टॅटू आर्टिस्ट कार्यरत आहेत. स्वत:ची कला समाजमाध्यमांवर ‘व्हिडीओ’ वा ‘पोस्टर’च्या माध्यमातून पोहोचवत आहेत. नऊ दिवसांच्या सजण्याचा सोहळा उत्तरोत्तर रंगताना अर्थार्जनही होत आहे.
‘अक्षर’स्थापना
नवरात्रीत देवीच्या मूर्तीचे प्रमाण तुलनेने कमी असते. घरोघरी घटस्थापना केली जाते. त्यामुळे घटाला साजेशी अशी सजावट करण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा वेळी भिंतीवर वा घटाच्या आजुबाजूला मंत्रपुष्पांजली लिहिलेले पोस्टर, नवदुर्गेची विविध रूपे चित्र स्वरूपात मांडण्यासाठी अक्षर कलाकारांची गरज भासते. नेहमीच्या सजावटीपेक्षा काहीतरी वेगळ ग्राहकांना देण्यासाठी ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’वर हस्तकलाकार, अक्षर कलाकार कलेच्या चित्रफिती टाकतात. या माध्यमातून त्यांना ग्राहक उपलब्ध होत असल्याचे ठाण्यातील अक्षर कलाकार संजीवनी सावंत सांगते. अक्षर साजावटीसाठी या कलाकारांना अगदी दोन हजार रुपयांपासून मोबदला दिला जातो, असे संजीवनी सांगते.
व्यग्र कलाकार नि नर्तकही
पूर्वी घरच्या घरी गणेशोत्सव वा नवरात्रीची सजावट केली जात होती. पण नवरात्रीला वेश-रंगभूषेसाठी तितका वेळ काढला जात होता. परंतु दांडियासाठी नर्तन करणाऱ्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कमी कालावधीत साधणे शक्य नसते. म्हणूनच कलाकार मंडळींनी ही गरज ओळखून समाजमाध्यमावरून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. येणाऱ्या नऊ दिवसांच्या कालावधीत नवा रोजगार मिळवू पाहात आहेत. त्यामुळे दोघेही व्यग्र असल्याचे पाहायला मिळणार आहे.
‘टॅटू’नं गोंदलं..
सर्वाहून अधिक वेगळा पेहराव, मेकअप, आणि नृत्य प्रकार अशी अनेकांची जंत्री असते. याशिवाय टॅटू काढणेही गरबाप्रेमी पसंत करतात. नवरात्र उत्सवाच्या काळात हातावर, दंडावर, पाठीवर, मानेवर अशा विविध ठिकाणी रंगबेरंगी टॅटू काढून गरबा खेळतात. दांडिया खेळणारे पात्र, केवळ गरब्याच्या काठय़ा किंवा देवीची प्रतिमा टॅटूद्वारे काढली जाते. यामध्ये अॅक्रॅलिक आणि ग्लिटर रंगाचा वापर केला जातो. टॅटूच्या आकारावर पैसे आकारले जातात. काही नृत्य संस्थांकडून नऊ दिवसांसाठी अशा टॅटू कलाकारांना नियोजित केले जाते. तसेच मोठमोठय़ा गरबा आयोजकांकडूनही या कलाकारांसाठी मागणी असल्याचे मुलुंड येथील टॅटू आर्टिस्ट किशन रावल सांगतो.
वर्षभर वाढदिवस, समारंभांच्या माध्यामातून लहान-मोठी कामे करणाऱ्या या कलाकारांना नवरात्र उत्सवात कमाई करण्याची चांगली संधी मिळते. आपली कला समाजमाध्यामांवरून प्रसारित केल्यामुळे तरुणांना या कलाकारांना संपर्क करणे सहज शक्य होते. पुढील नऊ दिवसांसाठी काही दिवसांपासून अनेक मंडळे संपर्क करत असल्याचे किशन याने सांगितले. सजावटकार, रंगभूषाकार, टॅटूकलाकार यासारख्या विविध कलाकार उत्सवांच्या काळात समाजमाध्यमांवरून आपली कला प्रसारित करून उत्तम अर्थार्जन करतात.
रंग माझा वेगळा.
गरबाप्रेमी बाजारात कपडे दागिन्यांच्या खरेदीसाठी असते. मात्र या कपडय़ांवर साजेशी अशी रंगभूषा करणे म्हणजे वेळकाढू काम मानले जाते. कार्यालयातून लवकर घरी येऊन गरब्याच्या मैदानात हजेरी लावणारे अनेकजण छानच दिसण्यावर अधिक भर देत असतात.
अशा वेळी अनेक गरबा समूह नऊ दिवसांसाठी हे काम रंगभूषाकारांना देतात. गरबा खेळताना रंगगभूषेच्या माध्यमातून चेहऱ्याची ठेवण उठावदार दिसावी अशा रंगभूषेची मागणी तरुणी करतात, असे ठाण्यातील रंगभूषाकार गायत्री देवकोटा म्हणाली.
गरबा नृत्य करताना प्रचंड ऊर्जा खर्ची होते. घामामुळे रंगभूषा खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी यंदा अॅक्वा मेकअपचा ट्रेण्ड इन असल्याचे गायत्री सांगते. अशा प्रकारचा मेकअपवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. गरबा खेळणाऱ्यांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. तसेच गरब्याच्या प्रांगणात प्रकाशयोजना असल्याने चेहरा उठावदार दिसण्यासाठी ग्लिटर रंग आणि भडक रंगाचा मेकअप वापरला जातो. नवरात्र उत्सवांच्या मेकअपसाठी एका दिवसाचे ५०० ते १००० रुपये एवढा मोबदला या रंगभूषाकारांना दिला जातो. समाजमाध्यम हा यासाठी अतिशय उत्तम मार्ग ठरला आहे. यामुळे या काळात रंगभूषेसाठी ग्राहकांची मोठी गर्दी कलाकारांच्या दारी लागलेली असते.