ते धमाल दिवस..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माटुंग्यातील डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून मी बीकॉम केलं आणि नंतर पोदार महाविद्यालयातून एमकॉम पूर्ण केलं. रुपारेलचा पहिला दिवस आता नीटसा आठवत नाही. पण वेगळं वातावरण, नवीन चेहरे, आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवतानाची भीती यामुळे काहीसा गांगरून गेलो होतो. अर्थात कॉलेजला येण्याचा आनंद होताच.

रुपारेलचा कॅम्पस इतका अप्रतिम आहे की, कोणीही तेथे पाऊल ठेवताच त्याच्या प्रेमात पडतो. सुरुवातीला सगळे लेक्चर बसायचो. पण नंतर नाटकाच्या चमूत दाखल झालो आणि लेक्चरना दांडी मारू लागलो. माझ्यासाठी कॉलेज म्हणजे पूर्णवेळ नाटकाला वाहिलेले शिक्षण होते. याची नांदी अकरावीपासूनच झाली. चेतन दातार आमच्या कॉलेजचा दिग्दर्शक होता. सचित पाटील, दीपक राजाध्यक्ष, सुमित राघवन अशी मंडळी नाटकाच्या ग्रुपमध्ये होती. त्या वेळी माझा यांच्याशी काहीच संबंध नव्हता. मला चांगलच आठवतय, आम्ही एक वर्ष सेंट झेव्हियर्सच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी झालो होतो. तेव्हा एक भन्नाट कहाणी घडली. मी आणि मेघा मठकर, आम्ही दोघांनी दोन पात्री एकांकिका बसवली होती. आम्ही अगदीच नवखे असल्यामुळे नियमांची काहीच कल्पना नव्हती. आम्ही फॉर्म भरून द्यायला शेवटची पंधरा मिनिटे असताना तिथे पोहोचलो. फॉर्म भरत असताना तिथला आयोजक म्हणाला, नाटकात किमान तीन पात्रे अनिवार्य आहेत. तिसरे पात्र कुठून आणायचे या पेचात आम्ही पडलो. एक पुरुष, एक स्त्री आणि त्यांचे कावळ्याशी संभाषण असे आमचे नाटक होते. मग ऐन वेळी आमच्या सहायक दिग्दर्शकाला कावळा बनवला आणि तिसरे पात्र तयार केले. परंतु हे सर्व सोपस्कार पार पडेपर्यंत आमची फॉर्म भरण्याची वेळ निघून गेली. आयोजकाने तुम्ही नाटक सादर करू शकणार नाही, असे सांगितले. त्याला आम्ही खूप विनवण्या केल्या, तरी तो ऐकेना. अखेर त्याला मनवून आम्ही परीक्षकांना भेटण्याची विनंती केली. त्या एकांकिकेचे परीक्षक होते आमच्याच कॉलेजचा दिग्दर्शक चेतन दातार व दिवंगत विनय आपटे. त्यांना भेटून आम्ही आमची अडचण सांगितली आणि अखेर आम्हाला आमचे नाटक सादर करण्याची परवानगी मिळाली. पण स्पर्धक म्हणून नाही. आमच्या एकांकिकेनंतर पुरस्कार जाहीर झाले. त्यात पहिला पुरस्कार कोणत्याच एकांकिकेला मिळाला नाही. सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री पुरस्कारही कोणालाच मिळाला नाही. स्टेजवरूनच परीक्षकांनी आम्हाला सांगितले, की तुम्ही कितीही अभ्यास चांगला केला तरीसुद्धा वेळेत पेपर देणे सुद्धा खूप गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही या स्पर्धेत आता गणले जात नाहीत, त्यामुळे तुम्हाला बक्षीस मिळत नाही. माझ्यासाठी हा पहिलाच एकांकिकेचा वेगळा अनुभव होता. या पाहिल्याच अनुभवातून मी बरेच काही शिकलो. त्यानंतर चेतनने मला कॉलेजमधील नाटकाच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. मग मी आयएनटीला एकांकिका केली, ज्यात सुमित राघवन, सचित पाटील, दीपक, शीतल क्षीरसागर, दीपाली विचारे, मानसी केळकर होते.

मी जरी नाटय़वर्तुळात असलो तरी माझा कॉलेजचा ग्रुप नाटय़वर्तुळातील नव्हता. माझे कॉलेजमधील मित्र म्हणजे सुयश पटवर्धन, हर्षद जोशी, संदीप महाडिक, सुरेश बेडेकर आणि वैभव जोगळेकर. त्यांचा एकांकिकेशी तसा संबंध नव्हता, पण माझ्या निमित्ताने त्यांचाही कधी तरी संबंध यायचाच. सकाळी सातचे कॉलेज असायचे, मी नऊ वाजता थेट कँटीनमध्ये जायचो. बऱ्याचदा गप्पांचा विषय नाटकाचाच असायचा. माझे दोन मित्र दादरलाच राहत असल्याने दुपारी जेवायला त्यांच्या घरी जायचो आणि संध्याकाळी कॉलेजच्या जिमखान्यात एकांकिकेच्या तालमी रंगवायचो. रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही तिथेच असायचो. परीक्षेच्या दोन महिने आधी हे सर्व बंद व्हायचे. आणि मग सुरू व्हायचा अहोरात्र अभ्यास. आमचे अभ्यासू मित्र आम्हाला अभ्यासात मदत करायचे. विशेषत: सुयश. आणि तेही मित्राच्या घरी दादरला. मित्रांच्या सहकार्यामुळेच मी न चुकता फर्स्ट क्लास मिळवला, तोही काठावर. त्याच्या पुढे मात्र मी कधीच गेलो नाही.

आम्ही युथ फेस्टिवलला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो. पण तालमीसाठी वेळ देता येत नसे. एकदा असेच चार-पाच स्पर्धामध्ये भाग घेतल्यामुळे एका स्किटची तयारीच करता आली नाही. त्या वेळी आदेश बांदेकर आमची एकांकिका बसवायचे. स्पर्धेच्या आदल्या रात्री ते आमची तयारी कितपत झाली, हे बघायला आले आणि त्या ‘स्किट’ची आमची काहीच तयारी नव्हती. रात्रभर आम्ही तालीम केली. सकाळी ट्रेनमध्येही आम्ही वाक्य पाठ करत होतो आणि तिथे जाऊन आम्ही माती खाल्लीच. बाकीच्या सगळ्या स्पर्धामध्ये आम्ही पहिले होतो. फक्त आमचे हेच ‘स्किट’ फसले होते.

पोदारमध्ये गेलो तेव्हा प्रकाश बुद्धिसागर पोदार कॉलेजच्या एकांकिका बसवत. मी फॉर्म भरत असताना तो नेमका तेथे भेटला. त्यामुळे फॉर्म भरून थेट जिमखान्यात गेलो. दोन दिवसांनी ‘युथ फेस्टिवल’ची एकांकिका होती. त्यांनी मला त्यात भाग घेण्यात सांगितले. मी लगेचच तयारीला लागलो आणि नाटक सादर केले.  कॉलेजमध्ये मी माझा बराच वेळ एकांकिकेतच घालवला. कॉलेजमध्ये एकदा आम्हीच दंगा घातला होता. ट्रेडिशनल डेच्या दिवशी आमच्या ग्रुपने ठरवले होते, की जरा ‘दंगा’ करू या. आम्ही सगळे वारकरी बनून आलो होतो. धोतर, झब्बा, फेटे असा आमचा पेहराव होता आणि झांजा घेऊन रुपारेलच्या एका गेटपासून दुसऱ्या गेटपर्यंत आम्ही ‘ज्ञानोबा माऊली’ म्हणत पूर्ण कॉलेज दणाणून सोडले होते. आज इतक्या वर्षांनी ‘दादा एक गूड न्यूज आहे’ या नाटकाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा कॉलेजच्या आठवणींना उजाळा देता आला.

शब्दांकन –  मितेश जोशी

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about college memorial collage
Show comments