अर्चना जोशी
बाजारात अनेक उत्पादने टय़ूबमधून विकली जातात. वापरून झाल्यावर या टय़ूब आपण टाकून देतो. त्यांची झाकणे गोळा करून स्वच्छ करून ठेवलीत, तर त्यांचा उपयोग गृहसजावटीसाठी करता येतो. या झाकणांपासून छोटय़ा कुंडय़ा कशा तयार करता येतील आणि त्यांचा उपयोग गृहसजावटीसाठी कसा करावा, हे जाणून घेऊया.
साहित्य
लहान-मोठय़ा आकाराची झाकणे, हिरव्या रंगाचे कागद, साधी सेलोटेप, स्केचपेन, गम, कात्री.
कृती :
* बुचाच्या आकाराप्रमाणे गडद आणि फिक्या हिरव्या कागदाच्या जाड व रुंद पट्टय़ा कापाव्यात.
* पट्टीच्या अध्र्यापर्यंत बारीक आणि जवळ जवळ कापा.
* आतील बाजूस फिका हिरवा आणि बाहेरील बाजूस गडद हिरवा रंग दिसेल, अशा प्रकारे गुंडाळी तयार करा.
* झाकणाच्या आत ही हिरव्या कागदांची गुंडाळी चिकटवा.
* झाकण बाहेरून सुशोभित करा.
* खूप मोठे झाकण असल्यास त्याचा काटे-चमच्यांचे घर म्हणून वापर करता येईल.
* इतर छोटय़ा झाकणांच्या कुंडय़ा आजूबाजूला ठेवून सजावट करता येईल.
* अशाच पद्धतीने विविध आकारांची झाडे, फुले तयार करता येतील.
* घरातील लहान मुलेदेखील या कुंडय़ा तयार करू शकतात.