नाशिक म्हटलं म्हणजे पर्यटकांच्या नजरेसमोर एक धार्मिक नगरी आणि कुंभमेळ्याचं ठिकाण उभं राहतं. कुणाला चलनी नोटांचा छापखाना, कुणाला लढाऊ  विमान कारखाना आठवतो तर कुणाला कांदा उत्पादक जिल्हा दिसतो. या जिल्ह्यात अनेक धरणेही आहेत. द्राक्षोत्पादक नाशिकची हल्ली वाईनसिटी म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. गिर्यारोहकांना सह्याद्रीतील गड-किल्ले आठवतात. या सगळ्याबरोबरच नाशिकमध्ये अनेक वनस्थळेही आहेत.

वन विभागाने स्थानिकांच्या सहकार्यातून, त्यांचे वास्तव्य न हलवता त्या परिसरातील वन, पशू-पक्षी आणि पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी ‘संरक्षित वन क्षेत्र’ निर्माण केली आहेत. राज्यातला असा पहिला प्रकल्प म्हणजे नाशिक वन परिक्षेत्रातील ‘बोरगड संरक्षित क्षेत्र’. वन विभागाबरोबर ‘नेचर कन्झव्‍‌र्हेशन सोसायटी ऑफ नाशिक’ या संस्थेच्या अविरत प्रयत्नांनी हा भाग घनदाट अशा अरण्यात परिवर्तित झाला आहे. नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या बोरगड-देहेरी किल्ला समूहाच्या पायथ्यापासून वर ३५० हेक्टर विस्तृत क्षेत्रफळाचे राखीव वन पसरलेले आहे. तिथे रीठा, शिवान, खैर, आवळा, साग, जांभूळ, आंबासह सुमारे ७६ प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती, विविध ऋतूंत फुलणाऱ्या ४२ पेक्षा अधिक प्रकारच्या पुष्पप्रजाती आढळतात. बिबटय़ा, कोल्हा, लांडगा, तरस, रान मांजर, उद मांजर, ससा, वानर, मुंगुस, विविध सर्प प्रजाती आदी वन्यप्राण्यांचीही रेलचेल दिसते. या क्षेत्रात भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरापासून ते गवताळ पक्ष्यांपर्यंत साधारणपणे ६२ प्रजातींचे वन्य पक्षी पाहायला मिळतात. शेजारी असलेल्या रामशेज किल्लय़ाच्या कडय़ामध्ये गिधाडांनी घर केले आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेले हे पक्षी इथे पुन्हा वास्तव्यास आले आहेत. स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांपैकी काळटोप कस्तुर, सवान रातवा, शृंगी घुबड, विशालकाय बोनोलीचा गरुड, देव ससाणा किंवा छोटा नारझिनक, अमूर ससाणा, निरनिराळ्या प्रकारचे वटवटय़ा, विविध रंगांचा सातभाई, नारिंगी डोक्याचा कस्तुर, पांढऱ्या पोटाचा अंगारक, दगडी झुडपी लावा आदी पक्षी येथे हजेरी लावतात. निसर्गप्रेमी, वनपर्यटक, पक्षी-प्राणी प्रेमी, जिज्ञासू मंडळींसाठी ‘बोरगड संरक्षित क्षेत्रा’ची भेट ही एक पर्वणीच ठरते.

अंजनेरी

गिर्यारोहकांत अंजिनेरी किल्ला प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून त्याला महत्त्व आहे. पण यापलीकडे हे एक राखीव वनक्षेत्रही आहे, हे मात्र फार कोणाला माहीत नसते. यांमुळे शेकडो दुर्मीळ वनस्पतींचे हे आगार आहे. यावर अनेक पक्षी, प्राणी आणि सरिसृप आढळतात. इथे ‘सेरेपेजिया अंजनेरीका’ हे दुर्मीळ फूल आढळते. स्थानिक भाषेत त्याला ‘लहानी खुरपुडी’ असे म्हटले जाते. २००६ मध्ये या फुलाचे शास्त्रीय विश्लेषण केले गेले. २.५ ते ३.५ सेंटी मीटरचे हे फूल पिवळट-हिरव्या रंगाचे दिसते. त्याच्या खाली नलिका असून ती १.२ ते १.५ सेंटी मीटरची असते. आतून जांभळट रंगाची आणि हलकीशी वक्राकार असते. वरच्या बाजूला मुकुटाच्या आकारात पाच पाकळ्या असतात. त्या टोकावर एकमेकांना चिकटलेल्या असतात. हे फूल फक्त पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंतच दिसते. पावसाळ्यातील धुके आणि दमट वातावरणातच हा फुलोरा फुलतो. या प्रजातीचे फूल इतर कुठेही अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. अंजिनेरी पर्वतावर या झाडांची संख्या फक्त शंभराच्या आसपास आढळली. पठारावरील मर्यादित क्षेत्रावर आणि अगदी अत्यल्प संख्येत ही फुले आढळतात. त्यामुळे ते लुप्त होणाऱ्या प्रजातींमध्ये गणले जाते.

याव्यतिरिक्त येथे नांदूर मध्यमेश्वर हे ‘पक्षीतीर्थ’ देखील आहे. गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावरील या अभयारण्यात नानाविध प्रजातींचे पक्षी आढळतात.

ममदापूर

भारतीय उपखंडाची प्रमुख ओळख असलेल्या कुरंगवर्णीय काळविटांचे ममदापूर संरक्षित वन क्षेत्र हे नंदनवनच आहे. नाशिक वन विभाग आणि ग्रामपरिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून ‘ममदापूर संवर्धन राखीव’ हे काळविटांसाठीचे विशेष संवर्धन क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश अशा परिसरात साडेपाच हजार हेक्टर एवढे विस्तृत क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. यात साधारण २५ पेक्षा जास्त ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. पर्यटनपूरक अनेक सोयीसुविधांनी हे काळवीट क्षेत्र सुसज्ज करण्याचे काम सुरू आहे. मृगक्रीडा प्रत्येकाला भावतात. २०१० मध्ये केलेल्या गणनेनुसार येथे दोन हजार ७१५ हून अधिक काळवीट आहेत. या परिसरात लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, उद मांजर, ससा, मुंगुस, साळींदर इत्यादी वन्यजीवही आढळतात. गवताळ माळरानावरील पक्षीजीवन समृद्ध आहे.

sudarshan.kulthe@gmail.com

Story img Loader