जिराफ हा सध्याच्या जगात वेगळ्याच ग्रहावरून आलेला प्राणी भासतो. त्याची लांब मान, उंची यामुळे हा प्राणी सर्वाच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. त्याची सुंदर कातडी आणि अंधश्रद्धा यामुळे या प्राण्यांची शिकार होते. नैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्यांची पत्नी बेट्टीज हे त्यांचे संवर्धन करत आहेत. त्यांनी स्थापन केलेले जिराफ केंद्र पाहायलाच हवे, असे आहे. तिथे जिराफांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहता येते.

नैरोबी शहरात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्यांची पत्नी बेट्टीज यांनी १९७९ मध्ये अफ्रिकन फंड फॉर एन्डेन्जर्ड वाईल्ड लाइफ (एएफएडब्लू) ही संस्था स्थापन केली. रोचेल्ड जिराफ या संकटात असलेल्या जातीचे संवर्धन हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यावेळी फक्त १२० रोचेल्ड जिराफ उरले होते. जॉक आणि बेट्टीने पाच वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी त्यांचे संवर्धन आणि संरक्षण केले. त्यामुळे जिराफांची संख्या वाढून १५०० झाली.

जिराफांचे केवळ संरक्षण आणि संवर्धन करून ते थांबले नाहीत तर जिराफाबद्दल केनियातील आणि जगभरातील मुलांना आणि मोठय़ा माणसांना माहिती व्हावी, त्यांना जवळून पाहण्याची, खाऊ  घालण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी त्यांच्या लॅगाटामधील जागेत जिराफ केंद्राची स्थापना केली.

रोज सकाळी ९ वाजता जिराफ केंद्र उघडते. खास तयार केलेल्या लाकडी डेकवर आपल्याला नेले जाते. वाटेत बादल्यांमध्ये जिराफांचे खाद्य म्हणून खास बनवलेल्या बोटाच्या आकाराच्या काडय़ा ठेवलेल्या असतात. लाकडी डेकच्या गॅलरीत उभे राहिले की जंगलातून येणारे जिराफ दिसतात. मग आपल्या हातातील काडय़ा आपण जिराफांना भरवू शकतो.

आम्ही उभे होतो त्या ठिकाणी सलमा नावाची सात वर्षांची जिराफ आली. आपल्या लांब जिभेने ती आमच्या हातातल्या काडय़ा ओढून पोटात ढकलायला लागली. इतर तृणभक्षक प्राण्यांप्रमाणे जिराफही आधी पटापट खाऊन घेतो आणि नंतर रवंथ करत बसतो. जिराफासारख्या उंच आणि मोठा प्राण्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्याची संधी जिराफ सेंटरमुळे मिळाली.

काही लोकांनी त्या काडय़ा आपल्या तोंडात धरून जिराफांना भरवल्या. त्याला ‘जिराफ किस’ म्हणतात. जिराफाला भरवताना खाली पडलेल्या काडय़ा खाण्यासाठी तिथे रानडुकरे जमली होती. खाली पडलेल्या काडय़ा ती पटापट संपवत होती.

गॅलरीच्या आतल्या बाजूला जिराफ माहिती केंद्र आहे. या ठिकाणी जिराफाबद्दल इत्थंभूत माहिती मिळते. अफ्रिका खंडात तीन प्रकारचे जिराफ आढळतात. मसाई जिराफ, रोचेल्ड जिराफ आणि रेटिक्युलेटेड जिराफ. यातील मसाई जिराफ आणि रोचेल्ड जिराफ हे केनियाच्या दक्षिण भागात आढळतात. तर रेटीक्युलेटेड जिराफ वाळवंटी प्रदेशात आढळतात.

त्यांच्या अंगावरच्या खुणांवरून (पॅटर्न) त्यांच्यातील फरक ओळखता येतो. मसाई जिराफाच्या अंगावर चांदणीसारख्या आकाराच्या खुणा असतात तर इतर दोन प्रकारच्या जिराफांच्या अंगावर चौकोनी खुणा असतात. त्यातही रोचेल्ड जिराफाच्या अंगावर ब्लड स्पॉट्स असतात. त्यामुळे ते वेगळे ओळखता येतात.

जिराफ हा शांत प्राणी आहे. कळपातील श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नरांमध्ये जी मारामारी होते त्यात ते एकमेकांच्या मानेला विळखा घालून डोक्याने टक्कर देतात आणि यात हरलेला नर माघार घेतो. अशा शांत प्राण्याचीही कातडीसाठी शिकार केली जाते. काही आदिवासी जमातींत जिराफांची शिकार केल्यास स्वर्ग प्राप्त होतो अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे आजच्या काळात अशा प्रकारच्या जिराफ सेंटरची आवश्यकता आहे. मसाई माराला हल्ली भारतातून बरेच पर्यटक जातात. त्यांना एक दिवस नैरोबीत मुक्काम करावा लागतो. त्यांनी जिराफ सेंटर आणि एलिफंट ऑर्फनेज सेंटर ही दोन्ही ठिकाणे आवर्जून पाहावीत.

अवघी सात हाडे..

जिराफाच्या मानेपासून शेपटीपर्यंत फक्त ७ हाडे असतात त्यावर या लांबलचक मानेचा डोलारा उभा असतो. जिराफाच्या पायाचे हाड तिथे ठेवलेले आहे. या मजबूत आणि जड हाडाचा धसका त्याच्यावर हल्ला करणारे प्राणी घेतात. जिराफाची एक अचूक लाथ त्या प्राण्याला कायमची जायबंदी करू शकते.

कसे पोहोचावे?

जिराफकेंद्र हे केनियाची राजधानी असलेल्या नैरोबी शहरापासून ५ किमीवरील लँगाटा या भागत आहे. नैरोबीत उबर टॅक्सीज आहेत त्यांनी किंवा खासगी गाडीने या ठिकाणी जाता येते.

वेळ- सकाळी ९ ते दुपारी ३

जाण्यास योग्य काळ – वर्षभर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amitssam9@gmail.com