गोव्याच्या दर्यात सापडणारी दर्याची दौलत अर्थात ‘सीफूड’ यासाठीच जगभरातील नागरिक खास गोव्यात येतात. त्यातही काही ठरावीक परदेशी पाहुणे तर वर्षांतून एकदा हमखास गोवा सहलीवर येतात. या वेळी खायचं कुठे हा प्रश्न सतावतोच. पण ‘नोवोटेल’ हे त्यावर उत्तर असते. कारण ‘नोवोटेल’ची विशिष्ट खाद्यशैली हे त्याचे प्रमुख कारण.
‘नोवोटेल गोवा श्रेम’ आणि रिसॉर्ट या दोन्ही वास्तूंमध्ये मिळून सात खानपानाची ठिकाणे आहे. ताजेपण हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़. ब्रेड, पॅनकेकसुद्धा प्रत्येक दिवशी इथल्या बेकरीत तयार होतात. इथल्या सर्व पदार्थामध्ये गोव्याची खास चव आहे. गोव्यातील व्हिनेगर वेगवेगळ्या स्वादांमध्ये उपलब्ध असते. हे व्हिनेगर गोव्यातील घराघरांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवून साठविलं जातं. त्यामुळे इथल्या जेवणाला वेगळा स्वाद हमखास असतो. खोबरेल तेल हे त्यातील एक वैशिष्टय़. गोव्याच्या आहारात खोबरेल तेल प्रमुख जिन्नस आहे, असे मुख्य शेफ सिद्धार्थ नरोन्हा यांनी सांगितले.
नोवोटेलच्या स्वयंपाकघरामध्ये एकूण सात स्थानिक शेफ कार्यरत आहेत. येथील प्रसिद्ध ‘सारस्वत थाळी’ नोवोटेलमध्ये मिळते. मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाचा मिलाफ असलेल्या या सारस्वत थाळीमधली मेन्यूही तितकाच आकर्षक आहे. शाकाहार आणि खेकडा आणि रेड स्निपरचा रस्सा, कोळंबीचा झणझणीत रस्सा आणि तळलेला किंग मासा असा सारस्वतचा मेन्यू असतो. शेवटी गोडात इथला खास बिबिंका पदार्थ.
कोलची कडी हा इथला पारंपरिक न्याहारीचा पदार्थ. घरांमध्ये पूर्वी रात्रीचे राहिलेले माशाचे सार किंवा आमटी सकाळी चांगली गरम करून आटवायची आणि ती पावासोबत न्याहरीच्या वेळी खायची. मोठय़ा बनपावात कडीचा घट्ट सार ओतला जातो. यासोबत गोव्याचा खास तांबडा भात आणि कडीतला माशाचा तुकडा अशा रीतीने हा पदार्थ सजवला जातो.
नोवोटेलच्या स्वयंपाकघराचे एक वैशिष्टय़ म्हणजे इथे दर शुक्रवारी शेफच्या मदतीने इथले कोणतेही दोन कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवितात. यामध्ये अगदी सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते व्यवस्थापकीय संचालकही सहभागी असतात. इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये एक नातं निर्माण व्हावं, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सियादो (आराम) कॅफे असं या उपक्रमाचं नाव आहे. याशिवाय हॉटेलमधील विविध प्रकारच्या पाककृती घडाव्यात यासाठी शेफच्या स्पर्धा घेतल्या जातात. तसेच काही वेळा बाहेरच्या ठिकाणी जाऊन तिथले खाद्यप्रकार शिकण्याची संधी दिली जाते. म्हैसूरपाक विथ चीज हा पदार्थ असाच एक प्रयोग आहे. जेवणानंतरची स्वीट डिश असणारा हा पदार्थ जिभेवर सोडला की तरंगतच राहतो आणि त्याची चव संपूच नये असं वाटायला लागतं. अशा प्रयोगशील अनुभवांमधूनच अनेक नवीन पदार्थ जसे घडत गेले तसे स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली ज्याचं नाव आहे द स्क्वेअर इथेही अनेक बदल घडत गेले. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांनी सुचविलेल्या गोष्टी (फीडबॅक) अमलात आणण्याकडेही आमचा कल असतो, असे खाद्य आणि पेय विभागाचे प्रबंधक जोशुआ मॅस्करेनिअस यांनी व्यक्त केले.