अर्चना जोशी
सध्या सणवार सुरू असल्यामुळे प्रसादासाठी पंचखाद्य लागतेच. त्याच्या बियांचा पुनर्वापर कसा करता येईल ते आज पाहू या. या बियांपासून शुभेच्छापत्र तयार करू या.
साहित्य :
पिस्त्याची साले, खजूर किंवा खारीकेच्या बिया, अॅक्रेलिक रंग, ब्रश व रंगकामाचे साहित्य, रंगीत कागद, सुतळ, हिरवी क्रेप टेप, गम (फेव्हिबँड), झिगझॅग व साधी कात्री, जाड हँड्मेड कागद (जुन्या पत्रिका किवा पिशव्यांचा जाड कागद) इत्यादी.
कृती
* पिस्त्याची टरफले एका आकाराची मापात बघून घ्या. त्याच्या ३-४ मोठय़ा टरफलांचे एक फूल तयार करा.
* अॅक्रेलिक रंगाने साल रंगवा व नीट वाळू द्या.
* इतर बियांची आकर्षक पद्धतीने रचना करा व अॅक्रेलिक रंगाने रंगवा.
* सर्व फुले एकत्र करून गुच्छ तयार करा व हँड्मेड कागदावर (जुन्या पत्रिका किंवा पिशव्यांचा जाड कागदही वापरता येईल) गमने चिकटवा.
* उरलेल्या भागात गवताच्या काडय़ा दाखवण्यासाठी हिरवी क्रेप टेप, सुतळ चिकटवा.
* रंगीत कागदाची पाने झिगझ्ॉग कात्री किंवा साध्या कात्रीने कापा आणि चिकटवा.
* एखाद्याचे आभार व्यक्त करणारे पत्र किंवा शुभेच्छापत्र म्हणून ही कलाकृती वापरता येईल. लिफाफा सुशोभित करण्यासाठीही हीच पद्धत वापरता येईल.