शनिवार
नगरच्या दक्षिणेला पाथर्डीला जाताना वाटेत करंजी घाट लागतो. तो उतरल्यावर देवराई गाव आहे. तिथून वृद्धेश्वरला जावे. गर्भगिरीच्या पायथ्याचा रम्य परिसर पाहावा. वृद्धेश्वर मंदिर, घंटा आणि परिसर पाहावा. परिसरात नदीकाठची काही समाधी मंदिरे पाहावीत. तिथून ११ कि.मी. वर असलेल्या मढीला जावे. श्रीकानिफनाथांच्या समाधीचे ठिकाण येथे आहे. महाराणी येसूबाईने छत्रपती शाहूंची सुटका व्हावी म्हणून हे मंदिर बांधल्याचे सांगतात. नवनाथांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग इथे मूर्तीरूपाने जिवंत केलेले दिसतात. जवळ श्रीमच्छिंद्रनाथ समाधी आहे. ते पाहून पुढे पाथर्डीला मुक्कामी जावे.
रविवार
पाथर्डीच्या दक्षिणेला १२ कि.मी. वर मोहटादेवीचे मंदिर आहे. ही देवी म्हणजे संपूर्ण नगर जिल्ह्याचे कुलदैवत. पूर्वीचे जुने मंदिर पडून आता टोलेजंग अतिभव्य मंदिर बांधलेले आहे. प्रशस्त पार्किंग, मोठा प्रदक्षिणा मार्ग, मार्गावर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. मंदिर टेकडीवर असल्यामुळे उंचावरून सभोवताल फार सुंदर दिसतो. तिथून निघावे आणि परत पाथर्डी मार्गे उत्तरेकडे आव्हाणे गावी जावे. इथे महाराष्ट्रातील एकमेव निद्रिस्त गणपतीचे मंदिर आहे. गाभाऱ्यात जमिनीखाली २ फुटावंर स्वयंभू गणेशमूर्ती आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली.
ashutosh.treks@gmail.com