शनिवार

गोदावरीच्या काठावर वसलेले प्राचीन नंदीतट म्हणजे नांदेड हे मराठवाडय़ातले एक महत्त्वाचे शहर आहे. शिखांचे अमृतसर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे पवित्र ठिकाण. गुरू गोविंदसिंग हे शिखांचे दहावे गुरू. त्यांनी इथेच पवित्र ग्रंथ गुरुग्रंथसाहिब याची स्थापना गुरू म्हणून केली. सुप्रसिद्ध सचखंड श्री हुजूर साहिब या गुरुद्वाराला भेट द्यावी. भव्य-दिव्य बांधकाम, कमालीची स्वच्छता आणि प्रसन्नता अनुभवता येते. नंतर नांदेडच्या दक्षिणेला ६५ कि.मी. वर असलेल्या मुखेडला जावे. इथले दाशरथेश्वर मंदिर पाहावे. हे कल्याणी चालुक्यांच्या काळचे अत्यंत देखणे मंदिर आहे. मंदिरावर नृत्य करणाऱ्या सप्तमातृका कोरलेल्या आहेत. तसेच ज्येष्ठा किंवा अलक्ष्मीची मूर्ती कोरलेली आहे. अशी मूर्ती महाराष्ट्रात इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही.

रविवार

नांदेडच्या वायव्येला ६५ कि.मी. वर असलेल्या औंढा नागनाथला जावे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले हे शिल्पसमृद्ध शिवमंदिर आहे. वेरुळच्या खालोखाल इतके शिल्पकाम याच मंदिरावर पाहायला मिळेल. शिवाची विविध रूपे, तसेच अनेक देवदेवतांचे अंकन या मंदिरावर केलेले आहे. मुख्य शिवपिंड जमिनीखाली गाभाऱ्यात आहे. तिथे जाताना समोर विष्णूची अत्यंत देखणी मूर्ती काचेच्या आवरणात ठेवलेली दिसते.

ashutosh.treks@gmail.com